कोळसा खाणींच्या लिलावासाठी मंगळवारी पार पडलेल्या पहिल्या फेरीत वेदांता समूहाने तब्बल १४ खाणींसाठी बोली लावत आघाडी घेतली आहे. एकूण २३ खाणींसाठीच्या या प्रक्रियेत आदित्य बिर्ला, अदानी आणि जिंदाल समूहानेही सहभाग नोंदविला.
उद्योजक अनिल अगरवाल प्रवर्तित वेदांता समूहाने विविध १४ कोळसा खाणींसाठी २५ निविदा भरल्या. समूहातील काही उपकंपन्यांमार्फत ही बोली लावण्यात आल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. पहिल्या टप्प्यातील ही प्रक्रिया तांत्रिक बोलींसाठीची होती.
आदित्य बिर्ला समूहाने ८ कोळसा खाणींसाठी १५ निविदा दाखल केल्या. तर नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील अ‍ॅन्ड पॉवर लिमिटेडने ६ खाणींसाठी तब्बल १३ निविदा भरल्या. अदानी समूहानेही सहा बोलींद्वारे आपला सहा कोळसा खाणी ताब्यात घेण्यातील रस दाखविला. छत्तीसगढमधील गेअर पाल्मानेही १६ निविदा भरल्या आहेत. बाल्को, हिंदाल्को, जेएसपीएल, मॉनेट इस्पात, सेसा स्टरलाइट, शारदा एनर्जी अ‍ॅन्ड मिनरलमार्फत त्या सादर करण्यात आल्या. झारखंडमधील पर्बतपूर सेंट्रलने जेएसडब्ल्यू स्टीलच्या वतीने केवळ एकच निविदा भरली.
१९९३ पासूनचे २०४ कोळसा खाणींचे लिलाव सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१४ मध्ये रद्द केले होते. पैकी पहिल्या टप्प्यात होत असलेल्या २३ कोळसा खाणींमध्ये १५०० दशलक्ष टन कोळसा साठा आहे. यंदाच्या प्रक्रियेत कोणतीही विदेशी कंपनी सहभागी झाली नाही. तसेच यापूर्वी अदा करण्यात आलेल्या जीएमआर, जीव्हीके, अनिल धीरुभाई अंबानी, लँको या खाण मालकांनी यंदाच्या प्रक्रियेत भाग घेतला नाही.