मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवत प्रवाहाला अनुसरत, गुरुवारी स्थानिक बाजारात गेल्या सलग दोन सत्रांत नवीन शिखरस्थानी झेप घेणाऱ्या निर्देशांकांनी उसंत घेत माघार दर्शविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३०.१२ अंशांनी (०.३७ टक्के) घसरून ६१,७५०.६० वर स्थिरावला. दिवसभरात तो ३३७.४५ अंशांनी घसरून ६१,६४३.२७ वर गडगडला होता. बुधवारी सेन्सेक्सने ६२ हजारांपुढील पातळीला गवसणी घालून, ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद नोंदविला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ६५.७५ अंशांनी (०.३६ टक्के) घसरून १८,३४३.९० वर विश्राम घेतला. आशियात इतरत्र प्रमुख बाजार घसरणीसह बंद झाले. दुपारच्या सत्रात युरोपातील बहुतेक भांडवली बाजारात घसरणीसह व्यवहार सुरू होते, तर बुधवारी अमेरिकेतील बाजाराने नकारात्मक कल दर्शविला होता. त्या परिणामी सत्रारंभापासूनच, स्थानिक बाजारात नरमाईचे वातावरण होते. गुरुवारी ब्रेंट क्रूड ०.४६ टक्क्यांनी घसरून पिंपामागे ९२.४३ डॉलरवर व्यापार करत होते. तर रुपयाही डॉलरमागे तब्बल ३८ पैशांनी गडगडला.