शासकीय तसेच संस्थात्मक ग्राहकांना सुरक्षा सेवा पुरविण्याच्या क्षेत्रात झायकॉम इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम्सचा पुनप्र्रवेश झाला आहे. श्नायडर इलेक्ट्रिकसोबत झालेल्या ना-स्पर्धा कराराचा कालावधी संपल्याच्या पाश्र्वभूमीवर झायकॉमचा हा प्रवेश निश्चित झाला आहे.
६.९ अब्ज रुपये मूल्याची आघाडीची सुरक्षा व्यवसाय असलेली झायकॉम ही कंपनी मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहे. २०१०मध्ये झायकॉमने आपला प्रकल्प व्यवसाय श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाला २२५ कोटी रुपयांना विकला होता. झायकॉमने त्या वेळी श्नायडरसोबत ना-स्पर्धा करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराची मुदत मे २०१४ला संपल्याने झायकॉमला या क्षेत्रात पुन्हा प्रवेश करता आला आहे.
सुरक्षेची वाढती गरज आणि सुरक्षा अधिक कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने येत्या काळात अनेक सरकारी संस्था, शाळा आणि संस्थांकडून सीसीटीव्ही अणि इतर देखरेख उपकरणे खरेदी केली जाण्याचे प्रमाण वाढेल, अशी अटकळ आहे. यापूर्वी सुरक्षाविषयक उत्पादन शाखेत कार्यरत असलेली झायकॉम आता सेवा शाखेतही अग्रेसर आहे.
शासकीय आणि संस्थात्मक ग्राहकांना सुरक्षा सेवा पुरवणारे हे क्षेत्र विस्तारल्याने झायकॉम येत्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढण्याची शक्यता आहे. संबंधित व्यवसाय पुनप्र्रवेशातून झायकॉमने अनेक गोष्टी साध्य करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. याबाबत झायकॉमचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक प्रमोद राव म्हणाले की, येत्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रांमध्ये विपुल संधी प्राप्त होणार आहेत. आम्ही विविध प्रकल्पांकरिता निविदा भरण्यास उत्सुक असून निविदा प्रक्रिया तसेच अंमलबजावणीकरिता वेळ लागत असल्याने चालू वर्षांकरिता कोणतेही लक्ष्य बाळगलेले नाही.