04 March 2021

News Flash

वित्त-वेध : गुंतवणुकीचे ग, म, भ, न.. : चक्रवाढ व्याज

दैनंदिन जीवनामध्ये चक्रवाढ व्याज या अतिशय प्रभावी हत्याराची आणि त्याच्या वापराची किती गरज आहे याची अनेकांना कल्पनाही नसते. आणि त्यामुळेच बहुतांश गुंतवणुकदार त्यांच्या गुंतवणुकीबाबतच्या निर्णयात

| April 29, 2013 12:23 pm

दैनंदिन जीवनामध्ये चक्रवाढ व्याज या अतिशय प्रभावी हत्याराची आणि त्याच्या वापराची किती गरज आहे याची अनेकांना कल्पनाही नसते. आणि त्यामुळेच बहुतांश गुंतवणुकदार त्यांच्या गुंतवणुकीबाबतच्या निर्णयात फसलेले दिसतात. ज्याला चक्रवाढ व्याजाची समज नाही तो परिपूर्ण गुंतवणूकदार होऊच शकत नाही….
असे म्हटले जाते की आजपर्यंत जगात जन्माला आलेल्यांपकी सर्वात बुध्दीमान व्यक्ती कोण असेल तर अल्बर्ट आईनस्टाईन आणि त्या प्रज्ञावंत व्यक्तीच्या मते आजवरचा गणितशास्त्रातील सर्वात मोठा आविष्कार म्हणजे चक्रवाढ व्याज. शालेय जीवनात अनेकांच्या बाबतीत डोकेदुखी ठरलेल्या या विषयाबाबत पुढील आयुष्यात ‘याच्या तावडीतून सुटलो रे बाबा’ असे म्हणत हुश्श करायचे आणि पुन्हा ढुंकूनही पाहायची इच्छा होत नाही. दैनंदिन जीवनामध्ये चक्रवाढ व्याज या अतिशय प्रभावी हत्याराची आणि त्याच्या वापराची किती गरज आहे याची अनेकांना कल्पनाही नसते. आणि त्यामुळेच बहुतांश गुंतवणुकदार त्यांच्या गुंतवणुकीबाबतच्या निर्णयात फसलेले दिसतात.  
एका उच्चशिक्षीत परिचित व्यक्तीला त्याच्या विमा विक्रेत्याने २०१२च्या मार्च महिन्यात एकाच दिवशी त्या व्यक्तीच्या ६४ व्या वर्षांपासून ते ८५व्या वर्षांपर्यंत दरवर्षी एकापाठोपाठ एक मॅच्युअर होईल अशा २२ पॉलिसी विकल्या (की गळयात मारल्या?). उद्देश होता त्याच्या निवृत्तीपश्चात दरवर्षी पुरेशी रक्कम त्याला प्राप्त होईल आणि तो वृध्दापकाळातील आíथक समस्येमधून मुक्त होईल. एक छानपकी ‘कॅश प्लो’ही त्याने बनवून दिला होता. अर्थातच त्या उच्चशिक्षित व्यक्तीने परताव्याचा दर काय पडतो त्याचा विचार केला नाही. जेव्हा तो दर वार्षिक ५.५%  ते ६% च्या आसपास आहे हे त्याच्या निदर्शनात आणून दिले, तेव्हा आपण किती मोठी चूक केली आहे, हे त्याच्या लक्षात  आले. त्याने पॉलिसी घेण्यापूर्वी हे गणित मांडले असते तर प्रीमियमपोटी कंपनीकडे जमा केलेली सुमारे पावणेदान लाख रुपयांची रक्कम वाचली असती.
चक्रवाढ व्याजाचे सूत्र अगदी साधे आणि सोपे आहे. जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळत जाते आणि गुंतवणुकीची रक्कम झपाटयाने वाढते. या क्रियेला दीर्घावधीची जोड मिळाली तर विश्वास बसणार नाही अशी फलप्राप्ती होते. कालावधी जितका जास्त तितकी संहितासंचिताच्या प्रक्रियेचा (creation of corpus) वेग जास्त.
याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण पाहूया.
द.सा.द.शे. ८% दराने १०,००० रुपये ठेव स्वरूपात गुंतविले आहेत. म्हणजे एका वर्षांचे व्याज होते ८०० रुपये. चक्रवाढ व्याजाचे सोप्या पद्धतीने मापन करायचे झाल्यास, १०,००० गुणिले १.०८ असे गणित करता येईल. म्हणजे पहिल्या वर्षअखेर जमा होतील १०,८०० रुपये. या व्याजापोटी जमा झालेल्या ८०० रुपयांच्या रकमेवरही दुसऱ्या वर्षांत ८ टक्के दराने व्याज मिळते आणि दुसऱ्या वर्षांनंतर एकूण रक्कम होते ११,६६४ रुपये (१०८०० गुणिले १.०८). दुसऱ्या वर्षी प्राप्त झालेले निव्वळ व्याज ८६४ रु. म्हणजे पहिल्या वर्षीपेक्षा ६४ रु.जास्त. ही जास्तीची रक्कम मिळविण्यासाठी कोणतेही कष्ट पडत नाहीत. ती आपोआप प्राप्त होते. वरकरणी ही रक्कम क्षुल्लक वाटते. पण ती रक्कमही पुढीलवर्षी आणखी व्याज मिळवून दते आणि तिसऱ्या वर्षांअखेरची गंगाजळी होते १२,५९७.१२ रुपये (११६६४ गुणिले १.०८) तिसऱ्या वर्षांच्या व्याजाची निव्वळ रक्कम होते ९३३.१२ रु.पहिल्या वर्षांच्या व्याजाच्या तुलनेत जास्तीची रक्कम १३३.१२ रु. अनेक वर्ष हे चक्रवाढ व्याजाचे चक्र चालू राहिले तर कल्पनेच्या पलिकडची गंगाजळी तयार होते.
चक्रवाढ व्याजाच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या बाबतीत काय परिणाम होतो ते एका उदाहरणाने समजून घेऊया.
राम आणि श्याम हे दोन समवयस्क मित्र. पैकी राम वयाच्या २५ व्या वर्षांपासून दरसाल १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीला सुरुवात करतो. धरून चालूया की गुंतवणुकीवर त्याला वार्षिक ८ टक्के चक्रवाढ व्याजाने परतावा प्राप्त होतो. तो वयाच्या ४५व्या वर्षांपर्यंत सातत्याने ही गुंतवणूक चालू ठेवतो. त्यांनतर नवीन गुंतवणूक बंद करतो. परंतु जमा झालेल्या गंगाजळीला गुंतवणुकीतच ठेवतो. श्याम जरा बिनधास्त टाईपचा असतो. ‘कल को किसने देखा है यार, आज तो जी लो’ टाईपचा आणि त्यामुळे गुंतवणूक म्हटले की त्याचे उत्तर असते ‘नो चान्स!’ वयाच्या तिसाव्या वर्षी त्याला वस्तुस्थितीची जाणीव होते आणि तो गुंतवणुकीचा विचार करायला लागतो. रामप्रमाणे तोही दरवर्षी १०,००० रु.ची गुंतवणूक सुरूकरतो (व्याजाचा दर ८ टक्के). तो ही गुंतवणूक वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत करतो.
या उदाहरणामध्ये रामच्या बाबतीत एकूण गुंतवणुकीची रक्कम होते २,००,००० रु. (रु.१०,००० गुणिले २० वर्षे) आणि श्यामची रक्कम होते २,५०,०००रु. (रु.१०,००० गुणिले २५ वर्षे). तथापि रामच्या खात्यामधील गंगाजळी होते ९,८७,९६६.५० रु. आणि श्यामची जमा रक्कम होते ७,३१,०५९.४० रुपये. रामने श्यामपेक्षा २०टक्के कमी रक्कम गुंतवून सुध्दा ५५व्या वर्षी त्याची गंगाजळी श्यामपेक्षा सुमारे २५टक्के जास्त होते. चक्रवाढ व्याजाच्या प्रक्रियेला जास्त वेळ दिला तरच ही किमया होऊ शकते.
आणखी एक उदाहरण पाहूया म्हणजे चक्रवाढ व्याजाचे महत्त्व जास्त स्पष्ट होईल. प्रकाशने आज गुंतवणुकीला सुरुवात केली आणि दर महिना १०० रु. प्रमाणे ४० वष्रे पसे गुंतविले. श्रीकांतने २० वर्षांनंतर गुंतवणुकीला सुरुवात केली आणि मासिक २०० रु. २० वष्रे गुंतवणूक केली. या दोघांचीही गुंतवणुकीची एकूण रक्कम ४८,००० रु. अशी सारखीच. जर दोन्ही गुंतवणुकांचा व्याजाचा दर १० टक्के गृहीत धरला तर प्रकाशची गंगाजळी होते ६,३२,४०८ रु. आणि श्रीकांतची रक्कम होते १,५१.८७४ रु. प्रकाशने व्याजाच्या प्रक्रियेला दुप्पट वेळ दिला त्यामुळे त्याची गंगाजळी श्रीकांतपेक्षा सुमारे चौपट झाली.
वरील उदाहरणामध्ये प्रकाश आणि श्रीकांतच्या बाबतीत अनुक्रमे ४० वर्षांसाठी मासिक १०० रु. आणि २० वर्षांसाठी मासिक २०० रु. ऐवजी वार्षकि १२०० रु. आणि २४०० रु. अशी गुंतवणूक गृहित धरली तरी दोघांचीही गुंतवणुकीची एकूण रक्कम तितकीच म्हणजे ४८,००० रुपयेच होते. परंतु  प्रकाशच्या खात्यात ४० वर्षांनंतर ५,३१,१११ रु. (६,३२,४०८ रु. ऐवजी) जमा हातात आणि श्रीकांतचे होतात १,३७,४०८ रु. (१,५१.८७४ रु. ऐवजी)
अनेक गुंतवणूकदार निवृत्तीनंतरच्या काळासाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यात स्वत:चे घर घेण्यासाठी, अशा अनेक कारणांसाठी नियोजन करतात. त्यांच्यासमोर काही वित्तीय ध्येय असते. परंतु नुसतेच ध्येय असून त्याची पूर्ती होत नसते. त्यासाठी गुंतवणुकीच्या योग्य पर्यायाची गरज असते आणि तो पर्याय निवडण्यासाठी चक्रवाढ व्याजाची जाण (आणि भाववाढीच्या भस्मासूराची दक्षता) आवश्यक असते. ६ टक्के किंवा ८ टक्के परताव्याने हे साध्य होत नाही. मुलांच्या शिक्षणाचेच म्हणाल तर त्याच्या जन्मापासून ६ टक्के परतावा दर असलेल्या मुलांसाठीच्या विमा पॉलिसी घेतल्या तर हेतू साध्य होत नाही. कारण शिक्षणामधील भाववाढ वार्षकि १०% च्या आसपास आहे. खरी गरज आहे ती त्या पॉलिसीपासून मिळणाऱ्या रकमेच्या परताव्याचा हिशोब मांडता येण्याची. माझ्या मते तर ज्याला चक्रवाढ व्याजाची समज नाही तो परिपूर्ण गुंतवणूकदार होऊच शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 12:23 pm

Web Title: compound interest
टॅग : Arthvrutant,Investment
Next Stories
1 पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी सुरक्षित..
2 ‘घट’णावळीवर तूट!
3 इक्विटी, डेट की सोने?
Just Now!
X