|| कौस्तुभ जोशी
चीन जगातील एक आघाडीचा निर्यातदार देश आहे, चीनच्या चलनाचे मूल्य कमी झाल्यामुळे किंबहुना जाणीवपूर्वक पाडले गेल्यामुळे चीनला निर्यातीत फायदा होत आला आहे. चीनला हा फायदा न व्हावा यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवून नवे संकट उभे केले आहे. जागतिक व्यापार युद्धाचा भडका शांत न होण्यामागे हा घटक आहे..
देशाच्या चलनाचा आंतरराष्ट्रीय चलनाशी असलेला संबंध म्हणजेच विनिमय दर. सध्या प्रचलित असलेली विनिमय दर ठरवण्याची पद्धत म्हणजे चलनाचे बदलते दर किंवा बाजारप्रणीत चलनाचा दर (फ्लेक्सिबल रेट्स). यात चलनाचा दर ठरवण्याचा अधिकार रिझव्र्ह बँकेचा नसून एखाद्या चलनाची बाजारात किती मागणी आहे व त्या चलनाचा किती पुरवठा आहे यातील गणितावर ठरतो. मात्र कधीकधी चलन दराला रिझव्र्ह बँक जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून नियंत्रित करते. एखाद्या देशाच्या चलनाचा दर आहे त्यापेक्षा जाणीवपूर्वक पाडायचा किंवा जाणीवपूर्वक कमी करायचा याला चलनाचे ‘अवमूल्यन’ अथवा चलनाचे ‘ऊध्र्वमूल्यन’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ, एक डॉलर म्हणजे ६५ भारतीय रुपये असे चलनाचे मूल्य असेल तर ते जाणीवपूर्वक ७० रुपये करण्यात आले. याचा अर्थ रुपयाचे अवमूल्यन झाले. म्हणजे आपला रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत केला गेला.
मग अवमूल्यन का करायचे?
जर एखाद्या देशाचे व्यापार खाते तोटय़ात असेल. दीर्घकाळात आयात अधिक आणि निर्यात कमी असेल तर व्यापारात तूट निर्माण होते. अशावेळी चलनाचे अवमूल्यन केल्यास त्याचा परिणाम असा होतो की, आयात महाग होते आणि निर्यात अधिक फायदेशीर होते. समजा डॉलरचा दर ६५ रुपयांवरून ७० रुपये झाला तर आयात केलेल्या वस्तू अधिक महाग होतील आणि कदाचित आयात केलेल्या वस्तू महाग झाल्यामुळे देशांतर्गत तयार झालेल्या वस्तूंना मागणी वाढेल आणि देशी उत्पादकांचा फायदा होईल. ज्या वस्तू निर्यात केल्या जातील त्यांच्यामुळे अधिक फायदा होईल, आपल्या चलनाचे मूल्य कमी झाल्यामुळे निर्यात केलेल्या वस्तू परदेशात स्वस्त होतील आणि त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. भारताने नवीन आíथक धोरण १९९१ साली अमलात आणले त्यावेळी चलनाचे अवमूल्यन केले होते.
अवमूल्यन आणि व्यापार युद्ध
वर्ष २०१५ पासून चीनने आपल्या चलनाचे अमेरिकी डॉलरबरोबर असलेले मूल्य ठरवून कमी करायला सुरुवात केली आहे. परिणामी, जागतिक व्यापार युद्धाला एका अर्थी खतपाणी मिळाले आहे. चीन जगातील एक आघाडीचा निर्यातदार देश आहे, चीनच्या चलनाचे मूल्य कमी झाल्यामुळे चीनला निर्यातीत फायदा होणार असला तरीही तो न व्हावा यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवून नवे संकट उभे केले आहे. चीनला आपली ढासळणारी अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतिपथावर नेण्यासाठी निर्यात वाढवणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी चलनाचे अवमूल्यन हा उपाय जरी योग्य वाटला तरीही त्यात व्यापार युद्ध भडकण्याचा धोका आहे.
अमेरिकी सरकारने चीनच्या व्यापार नीतीला शह देण्यासाठी चीनवरून येणाऱ्या मालावर कर लादायला सुरुवात केली तर पुनश्च चीनकडून अवमूल्यन केले जाऊ शकते!
(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)
joshikd28@gmail.com