29 May 2020

News Flash

छोटय़ांच्या बाजाराची, मोठी झेप!

सेन्सेक्स-निफ्टी या मुख्य निर्देशांकांची भरधाव दौड सुरू आहे. चालू २०१४ सालात त्यांनी २६-२७ टक्क्यांची वाढ दाखविली आहे, पण याचदरम्यान ‘बीएसई एसएमई आयपीओ’ निर्देशांकाची ८००-९०० टक्क्यांची

| November 10, 2014 07:26 am

सेन्सेक्स-निफ्टी या मुख्य निर्देशांकांची भरधाव दौड सुरू आहे. चालू २०१४ सालात त्यांनी २६-२७ टक्क्यांची वाढ दाखविली आहे, पण याचदरम्यान ‘बीएसई एसएमई आयपीओ’ निर्देशांकाची ८००-९०० टक्क्यांची वाढ फारशी चर्चेत नाही. उमद्या परताव्याची पर्यायी गुंतवणूक ठरत असलेल्या या छोटय़ा कंपन्यांच्या बाजाराकडे छोटय़ा गुंतवणूकदारांचे लक्ष जाणे आवश्यक आहे. आजवर अनेक सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) कंपन्यांसाठी भांडवली बाजारातील प्रवेश सुकर करण्यात अर्थात त्यांच्या ‘एसएमई मंचा’वरील भागविक्री प्रक्रियेत र्मचट बँकर व सल्लागाराची भूमिका निभावणाऱ्या ‘पँटोमाथ अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिसेस’चे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांच्याशी झालेल्या बातचितीतून छोटय़ा गुंतवणूकदारांना हा बोध निश्चितच होईल.

* दोन्ही शेअर बाजारात कार्यरत झालेल्या एसएमई मंचाचा प्रारंभिक प्रवास खूपच उत्साहवर्धक आहे, यापुढे म्हणजे नजीकच्या वर्ष-सहा महिन्यांत स्थिती कशी असेल?
– मुंबई शेअर बाजारात ‘बीएसई एसएमई मंचा’ची सुरुवात १३ मार्च २०१२ रोजी झाली, त्यानंतर एनएसईवर हा विशेष मंच सुरू झाला. बीएसईवर सध्या ७७ कंपन्या, तर एनएसईवर ६ कंपन्या अशा ८३ कंपन्या आजवर सूचिबद्ध झाल्या आहेत. याशिवाय भागविक्रीविना सूचिबद्धता मिळविणाऱ्या इन्स्टिटय़ूशन ट्रेडिंग (आयटीपी) मंचावर २० कंपन्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे या १०० कंपन्यांचे बाजारमूल्य १०,००० कोटींपल्याड सध्या गेले आहे. दोन वर्षेही पुरी झाली नसताना मिळालेला हा प्रतिसाद या बाजारमंचाबद्दल संबंधित वर्गात प्रचंड आस्था असल्याचे दर्शवितो. मुख्य शेअर बाजारात नव्या कंपन्यांकडून खुली भागविक्री (आयपीओ) जवळपास थंडावली होती त्या काळात हे घडून येणे विलक्षणच म्हणायला हवे. आज आमच्यासारख्या र्मचट बँकर्सकडून ज्या प्रमाणात ‘सेबी’कडे प्रस्ताव दाखल होत आहेत, ते पाहता पुढच्या सहा महिन्यांत बाजाराचा हा एसएमई मंच सध्याच्या ८३ वरून १२५ कंपन्यांपर्यंत फुललेला सहजपणे दिसून येईल.

* आज बहुतांश बँकांनीही सूक्ष्म, लघू व मध्यम कंपन्यांना कर्जवितरणात हात आखडते घेतले आहेत, अशा काळात गुंतवणूकदारांकडून १० हजार कोटींचे भांडवल या कंपन्यांनी उभे करणे, हा या क्षेत्राला भेडसावणाऱ्या भांडवलाच्या चणचणीच्या समस्येवर ठोस उताराच म्हणता येईल. खरेच छोटय़ा कंपन्यांना निधीचे बळ देणारा हा उत्तम पर्याय बनेल काय?
– या मोठय़ा फेरबदलाची संकल्पना करीतच या बाजाराची निर्मिती झाली. पण संकल्पना प्रत्यक्ष वास्तवात यायला थोडा वेळ द्यावाच लागेल. या बाजारात येणाऱ्या कंपन्यांचे आकारमान खूपच छोटे असते आणि अर्थात त्यांना हव्या असलेल्या निधीची मात्राही कमीच असते. तरी काही प्रमुख अडथळे आहेत. एकतर या बाजारात ‘रिटेल’ वर्गवारीतील छोटय़ा गुंतवणूकदारांना संधी नाही. कारण किमान गुंतवणूकच एक लाखांच्या घरात जाणारी आहे. दुसरीकडे अनेक संस्थागत गुंतवणूकदार, त्यांच्या धोरणात्मक मर्यादेमुळे वा अन्य काही कारणाने या कंपन्यांच्या भागविक्रीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे रिटेलही नाही आणि इन्स्टिटय़ूशनल अथवा फंडांकडून गुंतवणूक नाही. त्यामुळे ज्या कंपनीच्या प्रवर्तकांचे मोहोळ मोठे आहे आणि कंपनीशी वर्षांनुवर्षे संलग्न मंडळी जसे पुरवठादार, वितरक, विक्रेते यांच्याकडूनच या भागविक्रीतून निधी उभा राहतो. ‘सिदबी’सारख्या एसएमईच्या प्रोत्साहनासाठी स्थापित संस्थांकडून भागविक्री पूर्वी आणि दरम्यानही अलीकडे काही कंपन्यांत गुंतवणूक झाली आहे. पुढे जाऊन हा प्रघात अन्य बडय़ा संस्थागत गुंतवणूकदार आणि उच्चसंपदाप्राप्त (एचएनआय) गुंतवणूकदारांपर्यंत विस्तारला जाईल, अशी आम्ही अपेक्षा करीत आहोत.

* एसएमई मंचावर सूचिबद्धतेचा एक फायदा म्हणजे या कंपन्यांचा कारभार सुधारेल, पण बरोबरीनेच ‘सेबी’च्या नियमनांच्या पालनाचे बंधनही येईल, जे कदाचित जाचकही ठरेल?
– या कंपन्यांवर सार्वजनिक कटाक्ष येईल आणि त्या जबाबदारीने कारभार हाकतील, हा फायदा आहेच. ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ ज्याला म्हटले जाते तो आकृतिबंध किमान स्वरूपात या कंपन्यांना अंगीकारणे क्रमप्राप्त ठरेल. दीर्घकालीन व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक बाबी जसे स्वतंत्र संचालकांची नियुक्ती, ऑडिट कमिटी वगैरेची सक्ती आता तर कुटुंबाकडून चालविल्या जाणाऱ्या अथवा पिढीजात सुरू असलेल्या पारंपरिक उद्योगांसाठी गरज म्हणून भासू लागली आहे. नियमनाच्या जाचकतेच्या मुद्दय़ाची मात्र ‘सेबी’ने आधीच काळजी घेतली आहे. मोठय़ा शेअर बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत या मंचावरील कंपन्यांना सूचिबद्धतेसंबंधी नियमात बरीच शिथिलता दिली गेली आहे. विशेषत: खर्चीक ठरणारी अनुपालने, जसे दर तिमाहीला आर्थिक ताळेबंदांची वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्धी, वार्षिक अहवालाची छपाई वगैरेतून त्यांना सूट देण्यात आली आहे.

* आज हजारो कोटींचे बाजारमूल्य असलेल्या कंपनीचे शे-पाचशे-हजार रुपये गुंतवूनही समभाग मिळविता येतात, म्हणजे त्या कंपनीत व्यक्तिगत गुंतवणूकदाराला मालकी मिळविता येते. त्याउलट कुणा एसएमई कंपनीच्या चार-पाच कोटींच्या भागविक्रीत सहभागासाठी या गुंतवणूकदाराला किमान एक लाखाची गुंतवणूक करणे भाग ठरावे हा विरोधाभास नाही काय?
– हा मोठा विरोधाभास जरूरच आहे. एसएमई भागविक्रीत किमान गुंतवणुकीचे प्रमाण (लॉट साइझ) खूप मोठे आहे. छोटय़ा गुंतवणूकदारांच्या बचावासाठी ‘सेबी’ने टाकलेले पाऊल आहे. प्रारंभिक घडणीचा काळ सरून या बाजारमंचाच्या परिपक्वतेकडील संक्रमणात योजलेली ही संरक्षक यंत्रणा आहे. सध्या ती एकूण गुंतवणुकीसाठीच मारक ठरत आहे हे खरे आहे. पण टप्प्याटप्याने ही बचाव मात्रा शिथिल करावी, अशी आम्ही आमच्या समूहाद्वारे तसेच असोसिएशनमार्फतही रीतसर मागणी केली आहे. प्रारंभिक गुंतवणुकीची मात्रा आताच कमी केली नाही तरी किमान सेकंडरी मार्केटमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांचा वावर वाढेल यासाठी ट्रेडिंग लॉट तरी छोटा केला जाईल, अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यातून या बाजारमंचाला सखोलता प्राप्त होईल आणि अशा व्यवहारांना नैसर्गिक द्रवतेचा (लिक्विडिटी) कोंदणही प्राप्त होईल. प्रतिहमी म्हणून या ठिकाणी ‘मार्केट मेकिंग’ यंत्रणा संरक्षक म्हणून आहेच. याशिवाय ‘सेफ्टी नेट’चा प्रयोगही करता येईल.

*  आपल्या अर्थव्यवस्थेच्या आगामी गतिमानतेचे इंधन हे एसएमई क्षेत्राकडून पुरविले जाईल, असे म्हटले गेले आहे. या कंपन्यांचा व्यावसायिक वृद्धिपटही अचंबित करणारा आहे, पण त्याचे प्रतिबिंब आज सूचिबद्ध असलेल्या या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागाच्या कामगिरीत पडताना कितपत दिसते?
– आज व मागील काही वर्षांतील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता, काही हजार कोटींची उलाढाल असलेल्या बडय़ा कंपन्यांचा भर हा साहजिकच वृद्धी-विस्तारापेक्षा आहे तो व्यवसाय डोलारा सांभाळण्याकडे राहिला आहे. त्याउलट या काळात अर्थव्यवस्थेच्या वाढीत एसएमई क्षेत्राचेच मुख्य योगदान राहिले आहे. दोन वर्षांपूर्वी पाच-दहा कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीने १०-२० पटींनी प्रगती करीत शे-दोनशे कोटींची उलाढाल गाठल्याची उदाहरणे कैक आहेत. देशाच्या एकूण निर्यातीत ४०-४५ टक्के योगदान असलेल्या एसएमई क्षेत्राने असा वेगाने प्रवास करणे आश्चर्यकारक नाही तर साहजिकच म्हणता येईल. त्याचे प्रत्यंतर अर्थातच सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांच्या भावातही पाहायला मिळते. सेन्सेक्स-निफ्टीने चालू २०१४ सालात २६-२७ टक्क्यांची वाढ दाखविली आहे, तर ‘बीएसई एसएमई आयपीओ’ निर्देशांकाची याच काळातील वाढ ८००-९०० टक्क्यांची आहे. म्हणजे सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांचे भाव आठ-नऊ पटींनी वधारले आहेत. बाजारात गुंतवणूकदारांची संख्या मर्यादित असताना बडय़ा दलाली पेढय़ा, देशी-विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा अभाव असताना ही कामगिरी अचंबित करणारीच आहे. एसएमई मंचाची जगभरात सुरुवात अशी झाली. आज प्रसिद्ध ‘नॅसडॅक’ची सुरुवात एक एसएमई एक्स्चेंज म्हणूनच झाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठीही हे निश्चितच एक पर्यायी व उमदा परतावा देणारे गुंतवणूक दालन आजही आहे आणि भविष्यात हा बाजार आणखीच फुलत जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2014 7:26 am

Web Title: interview sachin rohekar
Next Stories
1 खाणकामाला गती कंपनीसाठी आशादायी
2 आधी केलेल्या गुंतवणुकांचा आढावा घेणे महत्त्वाचेच!
3 ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांचा लाभार्थी
Just Now!
X