05 July 2020

News Flash

नववर्षांचा संकल्प, अर्थसाक्षर होण्याचा..

उत्पन्न, दायित्व आणि वित्तीय उद्दिष्टांनुरूप कुटुंबाच्या अर्थनियोजन करणारे तेही प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या सहभागाने करणारे साप्ताहिक सदर..

| January 6, 2014 07:46 am

उत्पन्न, दायित्व आणि वित्तीय उद्दिष्टांनुरूप कुटुंबाच्या अर्थनियोजन करणारे तेही प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या सहभागाने करणारे साप्ताहिक सदर..
कुणी दलाल असो वा जाहिरात.. भुलायचे नाही; आपल्याला नक्की काय हवे, आपण विकत घेत असलेली सेवा आपल्या अर्थउद्दिष्टांची पूर्ती करते काय याची खात्री झाल्यानंतरच त्यात गुंतवणूक करेन असा नवीन वर्षांचा संकल्प करूया. असा संकल्पच अर्थसाक्षर व्हायचे या दृष्टीने पहिले पाऊल ठरेल!  
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून आपल्यापकी प्रत्येकाच्याच मनात नवीन वर्षांचे संकल्प असतात. थंडीची पर्वा न करता रोज ‘मॉìनग वॉक’ घेण्यापासून ते सिगारेट सोडण्यापर्यंत व मागच्या ‘थर्टी फर्स्टला घेतलेली’ शेवटची (अर्थातच मागील वर्षांतील) व आजचा खर्च लिहून काढेन, असे संकल्प रुंजी घालू लागतात. हे संकल्प जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत विरून जातात.
आपल्यापकी किती जणांनी अर्थविषयक संकल्प करण्याचा विचार केला आहे हे स्वत:शीच पडताळून पाहा. मीही मागील वर्षी महिन्यात निदान एक तरी लेख अर्थनियोजनाला वाहिलेला लिहिण्याचा संकल्प केला होता. मागील वर्षांत तीन लेख एखाद्या व्यक्तीचे उदाहरण घेऊन लिहिले होते. या तिन्ही लेखांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मागील वर्षी अपूर्ण राहिलेला संकल्प या वर्षी सिद्धीस नेण्याचा माझा विचार आहे. संगणकपत्र वा लघुसंदेश पाठवणारे समवयस्क, रस्त्यात भेटल्यावर थांबून ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये वाचलेल्या एखाद्या लेखाबद्दल आवर्जून चौकशी करणारे ज्येष्ठ, एकल पालकत्व निभावणारी एखादी माता, लग्नानंतर संसाराला नवीन सुरुवात करणारे तरुण मित्र, पहिल्यांदाच मातृत्वाचा विचार करणारी एखादी या सर्वानाच अर्थनियोजनाचे महत्त्व पटलेले असते. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. त्या प्रश्नाची उत्तरे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नसते. काही जणांनी एलआयसीची पॉलिसी घेऊन आपल्या अर्थनियोजनाचा शुभारंभ केलेला असतो. गुंतवणुकीला पुनश्च सुरुवात करायची तर जुन्या गुंतवणुकीचे काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. वेगवेगळ्या वयोगटांतील वाचकांच्या गरजांचा अभ्यास करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आíथक नियोजनकाराचे काम असते. मागील १८ वर्षांच्या अनुभवातून वेगवेगळ्या वित्तीय सेवा व उत्पादने यांचा योग्य आíथक उद्दिष्टपूर्तीसाठी कसा उपयोग करावा याची समज प्राप्त झाली असे वाटते. तरुण वयात जोखीम घ्यायची क्षमता जास्त असते. एखादी गुंतवणूक चुकीची अथवा आपल्या ठरविलेल्या लक्ष्यास साजेशी नसेल तरी चूक दुरुस्त करण्यास वेळ असतो, परंतु वय जसे वाढत जाते तसे जोखीम उचलण्याची क्षमता कमी होतेच; पण चुकीची दुरुस्ती करायला वावही नसतो. इतक्या वर्षांच्या अनुभवावरून असे जाणवते की, नियोजनबद्ध गुंतवणूक फारच कमी लोक करतात. माझी गुंतवणूक कुठे असावी, कोणत्या क्षेत्रात असावी, त्या गुंतवणुकीची जोखीम काय याचा विचार होताना दिसत नाही.
या वर्षी या स्तंभातून विविध घटकांतील व विविध आíथक स्तरांतील वाचकांचे अर्थ नियोजन करणार असल्यामुळे वाचकांचा प्रतिसाद अपेक्षित आहे.Financial Planning या शब्दांची इंग्रजीभाषक माध्यमांनी चुकीची प्रतिमा निर्माण केली आहे. या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न या स्तंभातून करणार आहे. आíथक नियोजन आपल्यासाठी नाही असेच अनेकांना वाटण्याचीच शक्यता अधिक आहे. दोघांना मिळून वार्षकि २० लाख पगार घेणाऱ्या आयटीवाल्या जोडप्याने अद्याप जगात न आलेल्या बाळासाठी केलेले अर्थ नियोजन व एखाद्या रिक्षाचालकाने आणीबाणीच्या परिस्थितीत स्वत:च्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी काढलेला एलआयसीचा मुदत विमा हेसुद्धा एक प्रकारचे अर्थ नियोजनच आहे. तेव्हा आíथक स्तर, वय, व्यवसाय यांच्या मर्यादा अर्थ नियोजनाला नाहीत. ही उत्पादने विकत घेताना निर्णयप्रक्रियेत गुंतवणूकदाराचा सहभाग (consumer participation) अत्यल्प असतो. एखादी पाच रुपये ते दहा रुपये दराची सिगारेट किंवा दहा रुपयांची कोिथबिरीची जुडी घेताना आपण जितका चोखंदळपणा दाखवतो, निदान तितकी रुची तरी अर्थ नियोजनात असायला हवी. एखाद्या उत्पादनाचा मला फायदा हवा असेल तर माझा सहभाग ते उत्पादन विकत घेताना असायला हवा. आजचा माझा आíथक स्तर व माझ्या उद्याच्या गरजा (म्हणजे पाच, दहा, वीस वर्षांनी अथवा वित्तीय नियोजनाच्या कालावधीनंतर) यांचा मेळ मी कसा घालणार? त्यासाठी माझ्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? हा मेळ घालण्यासाठी माझ्या बचतीवर परताव्याचा दर किती असावा? हा दर गाठण्यासाठी मी जी जोखीम उचलत आहे ती जोखीम परताव्याच्या प्रमाणात आहे का, याचाही विचार करायला हवा.  
एकदा एकूण बचत कुठल्या कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीत व कोणत्या प्रमाणात विभागणार हे ठरल्यानंतर त्यासाठी योग्य त्या योजना निवडणे ही दुसरी पायरी आहे. सर्वात पहिला प्रश्न – मला किती रकमेच्या विम्याची गरज आहे? माझ्या हयातीत विम्याचे पसे मिळणारा एन्डोमेट असावा की केवळ मृत्यूनंतरच विम्याचा दावा मंजूर होणारा मुदतीचा विमा असावा? भारतात सामान्य नागरिक पुरेसे विमाछत्र घेत नाहीत, असे विमा प्रतिनिधी नेहमीच तक्रार करत असतात. विम्याच्या मुदतीत माझ्या जबाबदाऱ्या वाढणाऱ्या असतील, तर नक्की किती रकमेचे विमाछत्र असावे? स्थिर उत्पन्न देणारी गुंतवणूक साधने व समभागसदृश गुंतवणूक साधने यांच्यात किती गुंतवणूक असावी? स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निधी खाते (पीपीएफ) हा उत्तम पर्याय आहे. स्थिर उत्पन्न देणाऱ्या व समभागसदृश गुंतवणूक यांचा समतोल कसा साधावा, याचेही नियोजन महत्त्वाचे ठरते. त्याही पुढे जाऊन मुदत ठेवी की सार्वजनिक भविष्य निधी, सरकारी कंपनीचे रोखे, करमुक्त उत्पन्न असणारे रोखे की डेट फंड यातील योग्य पर्यायाची निवड व योग्य प्रमाणात गुंतवणूक हे महत्त्वाचे ठरते. इक्विटी फंडात मोठी जोखीम असल्यामुळे निवड चुकली, तर अर्थाचाही अनर्थ होऊ शकतो.
आíथक नियोजन ही काही तासांत किंवा काही दिवसांत पूर्ण करायची प्रक्रिया असून नियोजनाच्या पूर्ण कालखंडात राबवायची असते. ठरावीक कालावधीनंतर म्हणजे दरवर्षी सिंहावलोकन करून आवश्यक असल्यास बदल घडवून आणायचे असतात. बरेचदा कौटुंबिक परिस्थितीत झालेले बदल नवीन आलेली उत्पादने अथवा सेवा जेव्हा आíथक लक्ष्य निश्चित केले त्या वेळेला उपलब्ध नसतील. त्यांचा अंतर्भाव नंतर करता येऊ शकेल. या मुद्दय़ाची सोदाहारणे पुढील भागात चर्चा करू. अनेकदा असे गुंतवणूकदार भेटतात, की ज्यांना असे वाटते, की एकदा वित्तीय सल्लागाराकडे गेल्यावर दर दोन वर्षांनी अथवा तीन वर्षांनी जाण्याची गरज काय, असा प्रश्न पडतो. मी टाटा समूहातील एका कंपनीच्या कारखान्यात माझ्या सुरुवातीच्या काळात काम करत होतो. त्या वेळी चाळिशीपर्यंत दर तीन वर्षांनी, चाळिशीनंतर एका वर्षांआड व पन्नाशीनंतर दर वर्षांआड वैद्यकीय तपासणी करून घेण्याची सुविधा होती. सर्वच कर्मचारी या सुविधेत आपला नंबर कधी लागतो याची आतुरतेने वाट पाहात. मागील वर्षी माझी वैद्यकीय तपासणी झाली होती. या वर्षी काय आवश्यकता आहे, असे म्हणत नसत. त्याचप्रमाणे एकदा आíथक नियोजन केल्यानंतर दरवर्षी या नियोजनाचा आढावा घेणे जरुरीचे असते.
कुणाच्याही, मग तो दलाल असो अथवा एखाद्या जाहिरातीला भुलायचे नाही. तेव्हा आपल्याला नक्की काय हवे, आपण विकत घेत असलेली सेवा आपल्या अर्थउद्दिष्टांची पूर्ती करत आहे काय याची खात्री झाल्यानंतरच त्यात गुंतवणूक करेन असा नवीन वर्षांचा अर्थसाक्षर व्हायचे या दृष्टीने संकल्प करूया. जर कोणी असा संकल्प केला असेल तर यातच या स्तंभाचे यश आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’ आपल्या मदतीला आहेच. तेव्हा लवकर संगणकपत्र (arthmanas@expressindia.com) लिहा अथवा कोणी वाचक संगणक साक्षर नसतील संपर्कासाठी आपल्या दूरध्वनी क्रमांकासहित लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१ या पत्त्यावर एखादे पत्र टाका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2014 7:46 am

Web Title: knowledge of investment
Next Stories
1 पाइनब्रिज इंडिया यूएस इक्विटी फंड
2 अमर्याद संधी-शक्यतांच्या देशातील गुंतवणूक म्हणून या योजनेकडे पाहा
3 तोटय़ाचे गणित
Just Now!
X