News Flash

बाजाराचा  तंत्र-कल : नाण्याची दुसरी बाजू

भांडवली बाजारात निर्देशांकांनी मजल दरमजल करीत नवीन उच्चांकी शिखराला गाठले

आशीष ठाकूर

करोनाच्या दुसऱ्या लाटेची भयानकता आणि त्याचे अर्थव्यवस्थेवरील प्रतिकूल परिणाम यांनी आजूबाजूचे वातावरण काळवंडलेले असताना, भांडवली बाजारात निर्देशांकांनी मजल दरमजल करीत नवीन उच्चांकी शिखराला गाठले.  आता पुढे काय, या मालिकेतील हा तिसरा लेख..

मराठीत एक सुंदर वाक्य आहे..नेहमी चांगलंच होईल याचाच विचार करा, पण वाईटाची मानसिक तयारी ठेवा. गेल्या दोन लेखांत आपण संपूर्ण तेजीचा आढावा घेतला, ही नाण्याची एक बाजू झाली. तेजीचे घोडे कुठे बिथरू शकते, अशा नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दुर्लक्षिता येणार नाही. आज तेजीच्या घोडदौडीला अटकाव होण्यामागची कारणे जाणून घेऊ या.

गृहीतक  १ :

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या वाढणाऱ्या किमती –

इतके दिवस ६० डॉलर प्रति पिंप असलेले कच्चे तेल ७२ डॉलर प्रति पिंप झालेले आहे. अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून ५५ डॉलर प्रति पिंप ही सुस’ पातळी गृहीत धरलेली आहे. आता खनिज तेल या सुस’ पातळीच्या वर तब्बल १२ डॉलरवर असल्याने परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. ज्याचा थेट संबंध हा अर्थसंकल्पीय वित्तीय तूट वाढण्यात होणार. त्यामुळे महागाई / चलनवाढीचा धोका आहे. त्यात गेल्या वर्षांपर्यंत अर्थसंकल्पात आपण वित्तीय तूट ही तीन टक्कय़ांपर्यंत राखण्याचा प्रयत्न करत होतो. आता करोनाच्या पाश्र्वभूमीवर आगामी वर्षांमध्ये वित्तीय तूट ही पाच टक्कय़ांपर्यंत वाढेल असे गृहीत धरले जात आहे. महागाईला कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये वित्तीय तूट हे एक महत्त्वाचे कारण असते. ही अर्थशास्त्रीय संकल्पना नित्य उपयोगातील उदाहरणावरून समजून घेऊ  या. जसे की, खाद्यतेल महागल्याने टाळेबंदीच्या अगोदरचा आपल्या सर्वाचा आवडता वडापाव बारा रुपये होता तो आता पंधरा रुपये झाला (२५ टक्के महाग), स्लाइस पाव पंचवीस रुपयांवरून सत्तावीस रुपये (८ टक्के महाग) यावरून येणाऱ्या दिवसातील महागाईचा अंदाज येऊ शकतो. आताच्या घडीला उत्पन्नाचे स्रोतच आक्रसत असताना महागाईचा आगडोंब उसळणे म्हणजे अल्प व मध्यम उत्पन्न गटाची आर्थिक गणिते कोलमडून, गुतंवणूक वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता असते.

गृहीतक २ :

आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांतता भंग होण्याची स्थिती –

यामध्ये चीन-तैवानमधील युद्धसदृश परिस्थिती, इस्रोयल-पॅलेस्टाइन (हमास) स्फोटक स्थिती ज्याचा थेट संबंध पुन्हा खनिज तेलाच्या किमतीतील भडक्याशी आहे.

गृहीतक  ३ :

तेजी-मंदीच्या आठ वर्षांच्या चक्राची दुसरी बाजू –

निर्देशांकांनी १९९२, २०००, २००८ साली तेजीचा उच्चांक नोंदवला, तर २०१६ ला नीचांक नोंदवला आहे. तेव्हा सेन्सेक्सवर ५७,५०० आणि निफ्टीवर १७,५०० वरून जो घातक उतार अपेक्षित आहे. त्यात शीघ्र सुधारणा झाली नाही, तर २०२४ साल हे निर्देशांकावरील नीचांकाचे वर्ष असू शकते.

वर दिलेल्या कारणांमुळे तेजीच्या धारणेला तडा जाऊ शकतो. तर मग या मंदीचाच अतिशय खुबीने वापर करून घेतला तर?

तेजीच्या उच्चांकानंतर नेहमीच घसरण अपेक्षित असते. आताच्या घडीला सेन्सेक्सवर ५३,२०० ते ५३,७०० आणि निफ्टीवर १६,००० ते १६,२०० वरून वर दिलेल्या मंदीच्या ज्ञात कारणांनी घसरण आली तर ती आपल्याला हवीच आहे. तर मग ही घसरण किती? तर मागील वर्षभराच्या मंदीच्या कोष्टकानुसार निफ्टी निर्देशांकावर १,००० ते १,२०० अंशांची घसरण म्हणजे निफ्टी निर्देशांक १६,००० वरून १५,००० वर येईल. या स्तराचा आधार घेत पुन्हा सुधारणा आणि सेन्सेक्सवर ५७,५०० आणि निफ्टी निर्देशांकावर १७,५०० चा ऐतिहासिक उच्चांक अशी ही वाटचाल असेल. या स्तरावरून पुन्हा घसरण.

येणाऱ्या तीन वर्षांतील निर्देशांकाच्या वाटचालीचा समतोल आढावा घेताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते-माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या ज्ञानाला मर्यादा असू शकतात. कित्येक आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या असतात. चीन-तैवान, इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष यात एखाद्या व्यक्तीचा प्रभाव तो काय? पण या निराशाजनक घटनांचा निर्देशांकावर, तेलाच्या किमतीवर निश्चितच परिणाम होतो. अशा दीर्घ कालावधीकरिता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांमुळे मांडलेली भाकिते चुकू शकतात. अशा परिस्थितीत..‘दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे जरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत खरे असले तरी हिंमत न हरता, निराश न होता समर्थ रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे.. ‘आपणासी जे जे ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे! शहाणे करून सोडावे सकळजन’ हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आगामी तीन वर्षांची निर्देशांकाची वाटचाल रेखाटलेली आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 1:02 am

Web Title: technical analysis of stocks stock technical analysis stock market technical review zws 70
Next Stories
1 रपेट  बाजाराची : तेजी अबाधित
2 फंडाचा  ‘फंडा’.. : उत्तम सल्लागार ही आर्थिक नियोजनाची गुरुकिल्ली
3 करावे कर-समाधान : एचयूएफ आणि प्राप्तिकर कायदा 
Just Now!
X