शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन,
दु:ख उधळावयास आता, आसवांना वेळ नाही..
समाजातील विविध घटकांचा, वेगवेगळ्या आíथक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या विविध घटकांच्या आíथक नियोजनाचा हेतू या सदराच्या प्रास्ताविकात स्पष्ट करताना, एकल पालकत्व निभावणारे, मग पुरुष अथवा स्त्री असो, त्यांचे आर्थिक नियोजन करण्याचा एक विचार मांडला होता. ही लेखमाला सुरू झाल्यापासून चार एकल पालकत्व निभावणाऱ्या मातांनी संपर्क साधला व त्यांच्या विशिष्ट प्रश्नांची उत्तरेही दिली. परंतु या सदरातून त्यांची ओळख प्रगट व्हावी, अशी त्यांची इच्छा नव्हती. आजच्या भागात अशाच एका एकल पालकत्व निभावणाऱ्या मातेचे आर्थिक नियोजन जाणून घेऊ.
सध्या पुण्यात बाणेर परिसरात वास्तव्यास असलेल्या संघमित्रा काळे (३८) व त्यांचा मुलगा शुद्धोधन (८) हे कुटुंबातील घटक आहेत. संघमित्रा रास्ता पेठेत लहानाच्या मोठय़ा झाल्या. वडील महाराष्ट्र शासनाच्या सेवेत होते. आई गृहिणी होत्या. वडिलांचे दोन वर्षांपूर्वी देहावसान झाले. आई श्यामला (७२) या संघमित्रा यांच्यासोबत राहतात. त्यांना त्यांच्या पतीची फॅमिली पेन्शन मिळते व त्यांनी आपली रास्ता पेठेतील सदनिका भाडेतत्त्वावर दिली आहे. आर्थिकदृष्टय़ा संघमित्रा यांच्या आई त्यांच्यावर अवलंबून नाहीत. संघमित्रा शाळेत असतानाच चित्रकलेची गोडी लागल्यामुळे त्यांनी बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स ही पदवी घेतली. मल्टिमीडिया या क्षेत्रात पदव्युत्तर पदविका प्राप्त करून त्यांना बंगळुरू येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या डिझाइन स्टुडिओत नोकरी लागली. सध्या त्या केपीओ या आगळ्या व्यवसाय क्षेत्राच्या एका खात्याच्या प्रमुख आहेत.
विवाहानंतर यथावकाश शुद्धोधनचा जन्म झाला. २००३ मध्ये त्यांनी पुण्यात बाणेर परिसरात स्वत:चे घरही घेतले. जीवनात स्थिरता आली असे वाटत असतानाच संसाराचे एक अंग उद्ध्वस्त झाले. संघमित्रा काळे यांचे आíथक नियोजन मागील दोन महिन्यांपासून सुरू होते. शुद्धोधनला भावनिक आधार देतानाच त्याच्या भविष्यासाठी आíथक तरतूद करण्याची जबाबदारी त्यांची स्वत:ची असल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात ते सर्व शंकांचे निरसन केल्यानंतर नियोजन पूर्ण झाले.
याआधीसुद्धा एकल पालकत्व निभावणाऱ्या मातांचे आíथक नियोजन केले आहे. असे नियोजन करताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. संघमित्रा काळे यांच्याशी सुरुवातीचे जुजबी बोलणे झाल्यावर त्यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दलचा प्रश्न मेल वाचल्यापासून घोळत होता, तो प्रश्न त्यांना विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसले तरी या प्रश्नाचे उत्तर त्या  ‘Though I get remarry in future, mine and shuddodhan finances will remain separate. Don’t consider my marriage aspect in our Financial Planning’  असे दिले. दोन ओळींत आलेल्या या उत्तराने वित्तीय नियोजकाचे काम सोपे केले.
संघमित्रा काळे यांना सल्ला
संघमित्रा काळे यांची प्रामुख्याने दोन दीर्घकालीन वित्तीय लक्ष्ये ठरविण्यात आली. पहिले लक्ष्य शुद्धोधनच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची तजवीज आणि पुढे संघमित्रा यांच्या स्वत:च्या निवृत्तिपश्चात खर्चाची तजवीज करणे ही उद्दिष्टे निश्चित केली. दोन दिवसांपूर्वी ‘अल्ट्रा हाय नेटवर्थ’ गटात मोडणारे एक ग्राहक भेटले होते तेव्हा ते म्हणाले की, ‘‘पैसे कमावण्यास जितके कष्ट पडत नाहीत त्यापेक्षा कितीतरी कष्ट ते पसे राखून ठेवण्यास व वाढविण्यास पडतात.’’ वय वर्षे ऐंशीच्या घरात असलेल्या या गृहस्थांचा गुंतवणूक सल्लागार म्हणून काम पाहत असताना त्यांना दिलेला सल्ला त्यांनी पाळला. त्याचा त्यांना फायदाही झाला, म्हणून आजही काही गुंतागुंतीचे निर्णय घेत असताना ते आवर्जून मत विचारत असतात. त्यांच्या मते, अनेक आगंतुक सल्लागार एखादे गुंतवणूक साधन विकण्याच्या उद्देशाने तुमच्या आयुष्यात सल्लागार म्हणूनच येतात. या सदराच्या निमित्ताने जेव्हा वाचकांशी संवाद होतो तेव्हा असे जाणवते की, ज्यांच्या बचत खात्यात मोठी रोकड शिल्लक राहते असे ग्राहक वेगवेगळ्या विमा योजना विकण्यासाठी बँकांचे सहजसाध्य सावजअसतात. बँकांतून गोड आवाजात एखादी ग्राहक सेवा प्रतिनिधी ‘How are you Sir / Madam!’ अशी मधाळ सुरुवात करून एखादे विमा उत्पादन गळी उतरविल्याचा अनुभव अनेक वाचकांना आला असेल. असे प्रतिनिधी कधीही टर्म प्लान घेण्याचा आग्रह धरत नाहीत. हे यानिमित्ताने आठवण्याचे कारण म्हणजे संघमित्रा यांना असाच अनुभव आला. संघमित्रा यांचे बचत खाते भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या बँकेत आहे. या खात्यात त्यांचे वेतन जमा होते व बचत खात्यात मोठी शिल्लकही असते. याच बँकेने ‘हम हैं ना!’ असे म्हणत विम्याच्या हप्ता शेअर बाजारात गुंतवणूक करणारी एक पॉलिसी त्यांना विकली. वार्षकि एक लाख हप्ता असणाऱ्या या योजनेत विमा छत्र फक्त पाच लाखांचे मिळते. कारण विमा हप्त्याच्या पाचपट विमा छत्र (आता ही मर्यादा दसपट केली गेली आहे!) असेल तरच आयकरात सूट मिळते. यावरून हे साधन केवळ करबचतीचे आमिष दाखविण्यासाठी तयार केल्याचे लक्षात येते. संघमित्रा यांच्याकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या दोन गोष्टी असताना वार्षकि एक लाख वजावटीसाठी हे गुंतवणूक साधन घेण्याची मुळात आवश्यकताच नव्हती.
अनेकदा आपण एखादे गुंतवणूकसाधन का विकत घेतो हे न उमजल्यामुळे पश्चात्ताप करण्याची पाळी ग्राहकांवर येते, तशीच ती संघमित्रा यांच्यावर आली असती. एकल पालकत्व निभावत असल्याचे समजताच एका विक्रेत्याने त्यांना १५ लाखांचा आरोग्य विमा घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला योग्य की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी संघमित्रा यांची पहिली मेल आली होती. संघमित्रा यांना त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना (आई व शुद्धोधन) कंपनीकडून तीन लाखांचे छत्र असलेला आरोग्य विमा कंपनीकडून दिला गेला आहे. त्यामुळे या नवीन आरोग्य विम्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट मत कळविले. संघमित्रा यांच्या अंदाजपत्रकात मोठी रोकड सुलभता असल्यामुळे त्यांना अशा प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागणार आहे. बचत खात्यात मोठी शिल्लक दिसली की अशा बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनिधींच्या त्यांना सल्ला द्यायला रांगा लागणारच. म्हणूनच ‘पसे कमावण्यास जितके कष्ट पडत नाहीत त्यापेक्षा कितीतरी कष्ट ते पसे राखून ठेवण्यास व वाढवण्यास पडतात’ या विधानाची सत्यता पटते.
शुद्धोधन अजून सज्ञान होण्यास दहा वर्षांचा कालावधी आहे व त्यांच्या आई बहात्तर वर्षांच्या आहेत. आणीबाणीचा प्रसंग आल्यास संघमित्रा यांनी एखाद्या ट्रस्टी कंपनीला आपल्या मालमत्तेचे व्यवस्थापक म्हणून नेमणे जरुरीचे आहे. जेणेकरून शुद्धोधन सज्ञान होईपर्यंत त्यांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करू शकेल. बँक ऑफ महाराष्ट्रची अशी ट्रस्टी कंपनी असून खासगी न्यास स्थापन करून एखाद्याच्या पश्चात त्याच्या इच्छापत्रानुसार मालमत्तेचे व्यवस्थापन करणे हे काम ही कंपनी करते. संघमित्रा यांनी अशा एखाद्या कंपनीची मदत घेऊन इच्छापत्र व त्यांच्या मालकीचा खासगी ट्रस्ट स्थापन करावा. संघमित्रा यांच्या संपत्तीचे बाजार मूल्य पाहता खासगी न्यास स्थापण्याचा व इच्छापत्र करण्याचा खर्च अतिशय मामुली म्हणावा लागेल. एक वित्तीय नियोजक म्हणून याची तातडीने अंमलबजावणी करावी असा सल्ला द्यायचा आहे. वानगीदाखल बँक ऑफ महाराष्ट्र ट्रस्टी कंपनीचे नाव सुचविले. अन्य बँका व खासगी कंपन्याही अशा पद्धतीची सेवा पुरवितात. यापकी कोणा एकाच्या सेवेचा लाभ घ्या.
संघमित्रा यांना कर्ज नाही व त्यांच्यावर आíथकदृष्टय़ा अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या केवळ एक असल्यामुळे ५० लाख विमा छत्र असलेला व २० वर्षे मुदतीचा विमा (टर्म प्लान) संघमित्रा यांना पुरेसा आहे. संघमित्रा यांच्या निवृत्तिपश्चात खर्चाची तजवीज व शुद्धोधन याच्या उच्च शिक्षणाची तरतूद म्हणून सध्या उपलब्ध असलेल्या ५० हजार रोकड सुलभतेची पाच एसआयपी सुचवीत आहे. एकदा सर्व एसआयपी सुरू झाल्या की तीन महिन्यांनी गुंतवणुकीचा आढावा घ्या. भविष्यात पगार वाढेल तेव्हा आपल्याकडे अधिक गुंतवणूकयोग्य रक्कम जमा होईल आणि शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे तुमच्याकडे नेहमीच आवश्यकतेपेक्षा जास्त रोकड शिल्लक राहणार आहे आणि तुमच्याकडे असे गुंतवणूकविषयक प्रस्ताव घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांची नेहमीच रीघ लागणार आहे. म्हणूनच तुम्हाला एका कुशल आíथक नियोजकाची गरज आहे. अन्यत: ‘हम हैं ना!’ म्हणणाऱ्यांशी तुमची गाठ पडेल.
संघमित्रा व शुद्धोधन या मायलेकांना शुभेच्छा देताना बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ या कवितासंग्रहातील ओळी आठवल्या
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन,
दु:ख उधळावयास आता, आसवांना वेळ नाही..