जोखीम व्यवस्थापन – भाग- दुसरा
ढोबळमानाने पाहायचे तर साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाची कमीत कमी तीन ते सहा महिन्यांची एकूण खर्चाएवढी रक्कम ही आकस्मिक खर्चाच्या नियोजनासाठी बाजूला ठेवली गेली पाहिजे. धंदेवाईक किंवा व्यावसायिक लोकांसाठी ही रक्कम कमीत कमी ६ महिन्यांच्या मिळकती एवढी असावी..
आर्थिक नियोजनामध्ये जोखमीचे व्यवस्थापन आणि विमा यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने विमा नियोजनाचे महत्त्व मागील लेखात आपण पहिले. त्याचीच पुढची पायरी म्हणून आता आपण आकस्मिक किंवा आणीबाणीच्या खर्चाचे नियोजन (contingency planning) कसे करावे ते पाहू.
आकस्मिक किंवा आणीबाणीचे खर्च हे अचानक येणारे असल्यामुळे त्या संबंधाने आपली पूर्वतयारी नसते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक एखादे गंभीर आजारपण उद्भवले जसे की हृदयरोग, कर्करोगकिंवा मोठा अपघात झाल्यास अचानक मोठय़ा खर्चाला आपल्याला सामोरे जावे लागते. अशा वेळी आपल्याकडे काही रोख रक्कम उपलब्ध असायला हवी किंवा काही गुंतवणूक केली असल्यास ती लगेच उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारे गुंतवलेली असावी.
तसेच, आताच्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक घडामोडींचा परिणाम आपण आपल्या देशातील अर्थव्यवस्थेवर होताना पाहतो. जसे २००८ साली आलेल्या जागतिक मंदीमुळे अनेक खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरून कमी करण्यात आले. एक-दोन महिन्याचा पगार देऊन उद्यापासून कामावर येऊ नये असे सांगण्यात आले. अशा वेळी लगेचच दुसरी नोकरी मिळणेही कठीण होऊन बसते. वेळ लागू शकतो. परंतु अशाही परिस्थितीत घर खर्च मात्र भागवावाच लागतो. घराचा हप्ता, मुलांच्या शाळेची फी यासारखे खर्च आपण टाळू शकत नाही. अशा वेळी आपण भविष्यातील गरजांसाठी केलेली गुंतवणूक मोडून सध्याच्या गरजा भागवतो. मोठय़ा कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही जर शेअर्समध्ये किंवा लाँग टर्म म्युचुअल फंडात असेल तर, ती घसरलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अल्प फायद्यात काढून घेतली जाते. शिवाय त्यामुळे भविष्यातील नियोजनाला धक्का पोहोचल्यामुळे भाविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करणे पुढे अवघड होऊन बसते. एकंदरीतच कौटुंबिक अर्थव्यवस्थाही विस्कळीत होते. यासाठी सर्वप्रथम जरुरी आहे ती आकस्मिक खर्चाचे नियोजन करण्याची.
ढोबळमानाने पाहायचे तर साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाची कमीत कमी तीन ते सहा महिन्यांची एकूण खर्चाएवढी रक्कम ही आकस्मिक खर्चाच्या नियोजनासाठी बाजूला ठेवली गेली पाहिजे. धंदेवाईक किंवा व्यावसायिक लोकांसाठी ही रक्कम कमीत कमी सहा महिन्यांच्या मिळकती एवढी असावी. एक गोष्ट लक्षात घ्या, आकस्मिक खर्चाचे नियोजन हे सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींसाठी तसेच वयोवृद्ध लोकांसाठीही तितकेच गरजेचे आहे.
आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे वळू या तो म्हणजे आकस्मिक खर्चाचे व्यवस्थापन कसे करावे?
वर सांगितल्याप्रमाणे आपण आकस्मिक खर्चासाठी लागणारी सर्व रक्कम जर रोकड (cash) स्वरूपात किंवा बचत खात्यात ठेवली, तर काही काळाने वाढीच्या ऐवजी त्या रकमेच्या मूल्यात घट दिसून येईल. त्याचे कारण म्हणजे महागाईचा वाढीव दर. महागाईचा दर हा तुम्हाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल तर बचत खात्यात ठेवलेल्या रकमेचे मूल्य कमी होते. त्याचप्रकारे रोख रकमेचे मूल्यही घसरते. त्यामुळे माझ्या मते एक महिन्याच्या मिळकतीएवढी रक्कम ही रोख स्वरूपात किंवा बचत खात्यात असावी. काही रक्कम ही म्युचुअल फंडाच्या लिक्विड किंवा डेट फंडामध्ये ठेवावी. आयसीआयसीआय म्युचुअल फंडाचा सेव्हिंग प्लान- लिक्विड फंडाच्या ‘मेडिकल अ‍ॅडव्हान्टेज’ या पर्यायामध्ये गुंतवणूक केल्यास ते तुम्हाला कॅशलेस वैद्यकीय सोयही उपलब्ध करून देऊ शकतात. या प्लानमध्ये गुंतवणूक केल्यास आयसीआयसीआय म्युचुअल फंड तुम्हाला एक मेडिकल कार्ड देते. जेणे करून आणीबाणीच्या परिस्थितीत तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेइतकी रक्कम तुम्हाला आकस्मिक आलेल्या वैद्यकीय खर्चाच्या वेळी बचत खात्यातील रकमेसाठी वापरता येईल. तेही गुंतवणुकीतून पैसे काढून न घेता. या कार्डचा वापर त्यांनी दिलेल्या ठरावीक रुग्णालयांमध्ये तुम्हाला करता येईल व तुमच्या गुंतवणुकीत जेवढी रक्कम आहे ती रुग्णालयाकडे जमा होईल. अशाप्रकारे आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्हाला पैशांची व्यवस्था करण्यासाठी इतर कुठलीही धावपळ करावी लागणार नाही. शिवाय इतर काही म्युचुअल फंडांकडेही अशाप्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.
अशा प्रकारच्या मुच्युअल फंड स्कीमवर कमिशन कमी असल्यामुळे सर्वच म्युचुअल फंड एजंट हे पर्याय उपलब्ध करून देतीलच असे नाही. त्यामुळे योग्य अर्थ नियोजकाच्या सल्लय़ाने अशा प्रकारच्या योजनांची अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता.
रिक रीओर्दन यांचे प्रसिद्ध वाक्य आहे – You can’t control every contingency. You have to accept that. Let it scare you. Trust that it will be okay anyway. (प्रत्येक आकस्मिक अडचण तुम्ही हाताळू शकत नाही. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. अशा घटनांनी तुम्ही घाबरून जाणे स्वाभाविक आहे. पण विश्वस असू द्या की तरीही सर्व काही ठीक होईल. – रिक रीओर्दन) हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्या आकस्मिक खर्चाचे नियोजन योग्य प्रकारे केले गेलेले असेल.
आकस्मिक खर्चाचे नियोजन (CONTINGENCY PLANNING) आणि जोखमीचे नियोजन (RISK PLANNING) हे मागील लेखात पाहिल्याप्रमाणे एकत्रपणे करण्यात आले तर अति उत्तम ठरेल. आर्थिक नियोजनाचे हे दोन मुख्य आधारस्तंभच आहेत. हे स्तंभ एकदा उभे राहिले तर आर्थिक नियोजनातील पुढचा टप्पा म्हणजे गुंतवणूक कशी करण्यात यावी याविषयी आपण पुढील लेखात पाहू.
किरण हाके – kiranhake@fingenie.co.in
लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.