गुरुवारी सायंकाळी तज्ज्ञांकडून मुलुंडकरांशी गुंतवणूक हितगुज
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद, घर-गाडी-बंगला ही मनांत जपलेली स्वप्नं साकारायची तर गुंतवणूक करावीच लागेल. तर मग उत्पन्न व खर्चाचा मेळ घालून दरमहा किती बचत यासाठी करावी आणि हा पैसा गुंतवायचा तर तो नेमका कुठे? अशा सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उकल करणारा उमद्या गुंतवणुकीच्या, चांगल्या सल्ल्याच्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाचे पर्व मंगळवारी पुण्यात योजण्यात आले आहे.
‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम गुरुवारी, १४ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाराष्ट्र सेवा संघ मराठी मंडळ, अपना बाजारशेजारी, जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथे होत आहे.
‘आर्थिक नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर आर्थिक नियोजनकार मिलिंद अंध्रुटकर, तर ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर गुंतवणूकविषयकसल्लागार आणि ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभ लेखक वसंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न त्यांना तज्ज्ञांना विचारण्याची संधीही मिळेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे.