‘टोटल रिटर्न इंडेक्स – टीआरआय’ निधी व्यवस्थापनाचा नवा मानदंड

म्युच्युअल फंड आपल्या योजनांची कामगिरी तपासताना टोटल रिटर्न इंडेक्सचा वापर करेल.

Total Returns Index
म्युच्युअल फंड आपल्या योजनांची कामगिरी तपासताना टोटल रिटर्न इंडेक्सचा वापर करेल.

काय आहे ही नवीन मूल्यमापन पद्धती?

भारतात म्युच्युअल फंड ही संकल्पना चांगलीच मूळ धरू लागली आहे. केवळ शहरी भागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातून देखील अनेक गुंतवणूकदारांची पावले म्युच्युअल फंडाच्या वाटेवर पडू लागली आहेत. इक्विटी फंड, ईएलएसएस फंड, बॅलंस्ड फंड या सर्वच प्रकारच्या म्युच्युअल फंडातून सातत्याने गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. म्युच्युअल फंड उद्योगात गुंतवणुकीचा ओघ वाढत असताना गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवरील परतावा ज्ञात होण्याच्या दृष्टीने म्युच्युअल फंडांनी आदर्श मूल्यांचे पालन करणे गरजेचे ठरते. विशेषत: फंडांच्या कामगिरीविषयक माहिती देताना फंडाच्या कामगिरीची तुलना केवळ संदर्भ निर्देशांकासोबत न करता ‘टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय)’ सोबत करणे गरजेचे आहे. यामुळे डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड भविष्यात आपल्या योजनांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना केवळ संदर्भ निर्देशांकाबरोबर तुलना न करता, त्या निर्देशांकाच्या ‘टीआरआय’बरोबर करेल.

म्युच्युअल फंडांच्या योजनेच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना एखादा संदर्भ निर्देशांक निश्चित केला जातो. ती योजनाही या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या समभागांचा आपल्या गुंतवणुकीत समावेश करीत असतात. फंडाला नफा मुख्यत्वे दोन गोष्टींतून होतो. पहिला फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या समभागांची भांडवली वृद्धी झाल्यामुळे आणि दुसरे म्हणजे गुंतवणुकीतील समभागांनी जाहीर केलेल्या लाभांशामुळे. तर तौलनिक कामगिरीसाठी निर्देशांकाचा परतावा लक्षात घेताना, जाहीर केलेल्या लाभांशाचा विचारात घेतला जात नाही. वास्तविक जाहीर केलेल्या लाभांशामुळे झालेला नफा आणि भांडवली वृद्धीमुळे झालेला नफा यांची बेरीज करणे योग्य ठरेल. या दोहोंचा लाभ ध्यानात घेऊन काढलेल्या लाभाला टोटल रिटर्न इंडेक्स- टीआरआय संबोधले जाते.

उदाहरणासाठी असे समजू की, एखाद्या फंडाने वार्षिक २० टक्के दराने परतावा भांडवली वृद्धीमुळे २० वर्षांत कमावला. तर या फंडाचा संदर्भ निर्देशांक असलेल्या निर्देशांकाची १५ टक्के वृद्धी २० वर्षांत झाली. आणि या निर्देशांकाने २ टक्के लाभांश परतावाही मिळविला. तर ‘टीआरआय’ मानदंडानुसार निर्देशांकाचा परतावा १५+२ = १७ टक्के परतावा समजण्यात येईल. तथापि सध्या म्युच्युअल फंड उद्योगांत परताव्याची तुलना १५ टक्क्यांशीच होते. म्हणजे फंडाने २०-१५ = ५ टक्के ‘अल्फा’ (निर्देशांकापेक्षा अधिक परतावा) मिळाला असे जाहीर करण्यात येते. मात्र यापुढे डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड आपल्या योजनांची कामगिरी तपासताना टोटल रिटर्न इंडेक्सचा वापर करेल. टोटल रिटर्न इंडेक्सचा वापर करणे ही बाब एका फंड घराण्याचे जबाबदारी ओळखून उचलेले पाऊल असून ही गोष्ट उच्च परंपरांचे पालन करणारी आहे.

आपल्या योजनांच्या परतावा कामगिरीची तुलना करण्यासाठी सर्वप्रथम क्वांटम म्युच्युअल फंडाने आणि आता नवीन घडामोडीप्रमाणे डीएसपी ब्लॅकरॉकनेही ‘टोटल इंडेक्स रिटर्न (टीआरआय)’ पद्धतीच्या अनुसरणास सुरुवात केली आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपले निधी व्यवस्थापक ‘टीआरआय’च्या तुलनेत किती चांगली कामगिरी करीत आहे, हे आता आपल्याला नेमकेपणाने समजून घेता येईल. गुंतवणूक क्षेत्रात आपल्या योजनांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अधिक कठोर निकषांच्या अवलंबाची ही एक उत्तम सुरुवात निश्चितच उत्साहवर्धक आहे. कालांतराने सध्या दोन या संख्येने असलेल्या मालमत्ता व्यवस्थापकांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल.

 राजेश कृष्णमूर्ती,

व्यवस्थापकीय संचालक, आयफास्ट फायनान्शियल इंडिया प्रा. लि.

आमच्या सक्रिय फंड व्यवस्थापनाच्या कामगिरीचे मापन हे ‘टीआरआय’ या अधिक कठोर निकषाच्या आधारे सुरू झाल्याने, गुंतवणूकदारांपुढे फंडाच्या परताव्यासंबंधी वास्तविक चित्र मांडले जाईल. निधी व्यवस्थापकाच्या कामगिरीला जोखण्याचा सध्याचा प्रमुख निकष संदर्भ निर्देशांकापेक्षा फंडाची कामगिरी खूप सरस अर्थात चांगला ‘अल्फा’ असा आहे. मात्र अल्फासंबंधी दर्शविले जाणारे तितकेसे वास्तविक नसते, कारण मानदंड निर्देशांकातील समभागांनी दिलेला लाभांश परतावा त्यात जोडला जात नाही. जेव्हा सामान्य गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा ओघ तीव्र स्वरूपात वाढत आहे, तेव्हा त्यांच्यापुढे परताव्यासंबंधी अस्सल व वास्तविक चित्र ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. गुंतवणूकदारांशी जबाबदार व पारदर्शी संवाद साधण्याच्या दिशेने पडलेले पाऊल गुंतवणुकीच्या व्यवस्थापनात उच्च प्रतीचा मानदंडदेखील निश्चित करतो.

*  कल्पेन पारेख,

अध्यक्ष डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. लि.

arthmanas @expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Total returns index new standards for fund management

Next Story
माझा पोर्टफोलियो : गुणात्मक परंपरा
ताज्या बातम्या