या महिन्याचे अतिथी विश्लेषक आदित्य बापट यांनी पहिल्या भागात १९९१ पासूनच्या सहा सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर शेअर निर्देशांकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. निवडणुकीमुळे लाभार्थी ठरणाऱ्या उद्योग क्षेत्राविषयी व या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक संधींची चर्चा ते फेब्रुवारी महिन्यातील चार सोमवारच्या सदरातून घेतील..
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत निकालाच्या तीन शक्यतांचा विचार मागील भागात केला. नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडी २७२ च्या जादुई आकड्याच्या जवळ जाईल; की काँग्रेसप्रणीत आघाडी पुन्हा सत्तेवर येईल आणि तिसरी शक्यता म्हणजे सध्याच्या राजकारणाचे दोन ध्रुव असलेल्या भाजपा व काँग्रेस या दोघांनाही दीडशेच्या जवळपास जागा मिळतील म्हणून त्रिशंकू अवस्थेची! मागील लेख लिहिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ज्यांच्या शपथविधीला नरेंद्र मोदी हजर राहिले त्या जयललिता त्यांची साथ सोडून भलतीकडेच गेल्या, तर शरद पवार निवडणुकीनंतर टोपी फिरवतील अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे कधी नव्हती इतकी राजकीय अनिश्चितता भरून राहिली आहे.  
बुचकळ्यात टाकणाऱ्या बातम्या आणि व्यक्त होणारे अंदाज या छोटय़ा गुंतवणूकदारांना अधिकच बुचकळ्यात टाकत आहेत.  निकाल नक्की कसा असेल हे निवडणूकपूर्व चाचण्या व राजकीय विश्लेषक यांचे काम आहे. त्यावर तूर्त भाष्य न करता, विद्यमान आर्थिक स्थितीचा वेध घेऊ या. तर अनेक पायाभूत सेवा सुविधा प्रकल्प शेवटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. हे प्रकल्प सुरळीत सुरु झाले तर औद्योगिक जगताला आलेली मरगळ दूर होईल. मल्टि ब्रँड रिटेिलगचा चेंडू राज्यांच्या अंगणात ढकलल्यामुळे अनेक किरकोळ दुकानांच्या साखळ्या गुंतवणूकपूर्व विविध राज्य सरकारांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक व्यावसायिक गुंतवणूकदार ज्या बहुसंख्य परदेशी अर्थसंस्था आहेत. त्यांच्या मते भाजपप्रणीत आघाडी सत्तेच्या जवळ पोहचून पायाभूत सुविधाना मोठा पािठबा देईल. असे झाले तर चलन बाजारात स्थिरता येईल रुपया वधारेल. यांच्याकडून गुंतवणुकीचा ओघ सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या महिन्यात दहा अब्ज डॉलर असेल व त्यावेळी रुपया ५७-५९ दरम्यान असेल. या पातळीवर टिकला नाही तरी साठीच्या आतला भाव दाखवेल. त्यामुळे संभाव्य लाभार्थी उद्योग क्षेत्रे व त्यातील कंपन्या यांचा साकल्याने विचार करू.
लेखक जीईपीएल कॅपिटल या नामांकित दलालपेढीत समभाग विश्लेषक आहेत. त्यांच्याशी ई-मेल: adityab@geplcapital.com  वर संपर्क साधता येईल.