प्रवीण देशपांडे

करदाता जे उत्पन्न मिळवितो ते त्याचे उत्पन्न म्हणून गणले जाते. हे उत्पन्न करपात्र असेल तर त्यावर त्याला कर भरावा लागतो. परंतु काही बाबतीत करदात्याला दुसऱ्याच्या उत्पन्नावरसुद्धा कर भरावा लागतो. अशा उत्पन्नाची माहिती करदात्याला असणे गरजेचे आहे. एका कुटुंबात पती, पत्नी आणि मुले असतील तर जो कमावता सदस्य असेल आणि तो जास्त कर भरत असेल तर तो आपला करभार कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबातील इतर सदस्याबरोबर काही व्यवहार करतो आणि स्वत:चे करदायित्व कमी करतो. पूर्वी घरात असे चित्र असायचे की पती नोकरी किंवा धंदा करणारा एकटाच कमावता सदस्य असायचा आणि पत्नी गृहिणी. पती आपले करदायित्व कमी करण्यासाठी पैसे पत्नीच्या किंवा मुलांच्या खात्यात जमा करून त्यांच्या नावाने गुंतवणूक करावयाचा जेणेकरून त्याला भरावा लागणारा कर कमी होईल. पण यामुळे पत्नीला किंवा मुलांना मिळालेल्या उत्पन्नावर कर भरला जात नाही किंवा कमी कर भरला जातो. असे व्यवहार ‘कर चुकविणे’ या सदरात मोडतात. यावर आळा घालण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत.

खालील व्यवहारांसाठी प्राप्तिकर कायद्यात वेगळ्या तरतुदी आहेत:

’  मालमत्ता हस्तांतरित न करता उत्पन्न हस्तांतरित करणे :

एखादी व्यक्ती, त्याची मालकी असणाऱ्या मालमत्तेचे उत्पन्न, मालमत्ता हस्तांतरित न करता उत्पन्न हस्तांतरित करीत असेल तर ते उत्पन्न मालमत्तेच्या मालकाचेच असते. उदा. एका ‘अ’ व्यक्तीने आपले घर भाडय़ाने दिले असेल आणि त्याचे घरभाडे उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीच्या ‘ब’च्या नावाने दाखविल्यास हे घरभाडे उत्पन्न ‘ब’चे करपात्र उत्पन्न नसून ‘अ’चेच करपात्र उत्पन्न असेल. असे व्यवहार कुटुंबातील व्यक्तींबरोबर केले जातात, घर एकाच्या नावाने असते आणि घरभाडे दुसऱ्याच्या नावाने घेतले जाते आणि ते उत्पन्न दुसऱ्याच्या करपात्र उत्पन्नात दाखविले जाते आणि कर चुकविला जातो. असे व्यवहार करणाऱ्यांनी ही तरतूद लक्षात ठेवली पाहिजे.

’  पती किंवा पत्नीचे उत्पन्न :

पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने एखादी संपत्ती हस्तांतरित केली असेल (भेट) तर त्या भेटीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र आहे. उदा. जर पतीने पत्नीला त्यांच्या उत्पन्नातून दोन लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आणि त्यावर तिला १४,००० रुपये व्याज मिळाले. हे व्याज पतीच्या उत्पन्नात गणले जाईल आणि ते पतीला करपात्र असेल. पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला घर भेट म्हणून दिले आणि भेट स्वीकारणाऱ्याने ते घर भाडय़ाने दिले तर त्यावर मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र असेल.

याला अपवाद म्हणजे पत्नीला लग्नाच्या पूर्वी दिलेल्या भेटी. उदा. जर एका करदात्याने त्याच्या लग्नापूर्वी भावी पत्नीला एक लाख रुपये भेट दिले आणि तिने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले तर त्यावर मिळालेले व्याज लग्नानंतरसुद्धा पतीच्या उत्पन्नात गणले जात नाही. परंतु ही भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे भावी पत्नीला लग्न होण्यापूर्वी मिळालेली रक्कम करपात्र आहे. पत्नीचे लग्नापूर्वीचे उत्पन्न या भेटी स्वीकारूनसुद्धा करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल तर या रकमेवरसुद्धा कर भरावा लागणार नाही.

पत्नीला किंवा मुलांना मिळालेल्या उत्पन्नावर कर भरला जात नाही किंवा कमी कर भरला जातो. कर नियोजन करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. या तरतुदींची माहिती नसल्यामुळे अनेकदा असे व्यवहार केले जातात. असे व्यवहार कर चुकविणेया सदरात मोडतात आणि नंतर कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.

पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर भेट म्हणून काही रक्कम हस्तांतरित केली आणि भेट घेणाऱ्याने ते पैसे करमुक्त पर्यायात गुंतविले तर त्यावर भेट देणाऱ्याला कर भरावा लागणार नाही. उदा. पतीने पत्नीला एक लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (पीपीएफ) गुंतविले तर त्यावर मिळणारे व्याज करमुक्त असल्यामुळे कोणालाच कर भरावा लागणार नाही.

’  अजाण मुलाचे उत्पन्न :

अजाण मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे अजाण मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना दिलेल्या भेटींच्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न मात्र पालकांच्या उत्पन्नात गणले जात नाही.

’ सुनेचे उत्पन्न :

सासू-सासऱ्यांनी सुनेला रोख रकमेच्या किंवा मालमत्तेच्या स्वरूपात भेट दिली आणि त्या भेटीतून तिला उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न सुनेला करपात्र नसून सासू किंवा सासऱ्यांना (ज्यांनी भेट दिली आहे त्यांना) करपात्र आहे. मुलाच्या लग्नापूर्वी सासू-सासऱ्यांनी, होणाऱ्या सुनेला भेट दिली आणि त्यावर तिला काही उत्पन्न मिळाले तर ते सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. मुलाच्या लग्नानंतरसुद्धा लग्नापूर्वी दिलेल्या भेटीवर मिळालेले उत्पन्न सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही.

’ रद्द करण्याजोगे हस्तांतरण (रिव्होकेबल ट्रान्सफर) :

हे असे हस्तांतरण असते ज्यामध्ये केलेले हस्तांतरण पुढे रद्द करता येते. असे रद्द करण्याजोगे हस्तांतरण केलेल्या मालमत्तेतून मिळालेले उत्पन्न हस्तांतरण करणाऱ्या व्यक्तीलाच करपात्र असते.

’  पती किंवा पत्नीच्या व्यवसायातून मिळालेले पगाराचे उत्पन्न :

एका व्यक्तीने, त्याची मालकी असलेल्या धंदा-व्यवसायातून त्याच्या किंवा तिच्या पती किंवा पत्नीला वेतन किंवा पगार दिला असेल तर ते उत्पन्न त्या व्यक्तीलाच करपात्र असते. त्या व्यक्तीची त्याच्या धंदा-व्यवसायातील मालकी २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तरच ही तरतूद लागू होते. जर पती किंवा पत्नीला धंदा-व्यवसायाबाबतीत तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान असेल तर या तरतुदी लागू होत नाहीत. उदा. ‘अ’ ही व्यक्ती ‘ब’ या व्यक्तीबरोवर भागीदारी धंदा करते आणि ‘अ’चा मालकी हिस्सा २५ टक्के आहे, या धंद्यातून ‘अ’च्या पत्नीला वार्षिक दोन लाख रुपये पगार दिला जातो. पत्नीला कोणतेही तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान नसल्यास हा पगार ‘अ’च्याच करपात्र उत्पन्नात गणला जाईल. जर पत्नीला पुरेसे तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान असेल तर तिचे उत्पन्न ‘अ’च्या करपात्र उत्पन्नात गणले जाणार नाही.

भेटींद्वारे किंवा अशा व्यवहारांद्वारे उत्पन्नासंबंधी कर नियोजन करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. या तरतुदींची माहिती नसल्यामुळे अनेकदा असे व्यवहार केले जातात आणि नंतर कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. आपण केलेल्या व्यवहारांमुळे प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन तर होत नाही ना याची खात्री केली पाहिजे. प्राप्तिकर खात्याकडून मोठय़ा रकमेचे असे व्यवहार तपासले जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे करसल्लागाराची वेळोवेळी मदत घेणे उचित ठरते.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार pravin3966@rediffmail.com