फंडाचा ‘फंडा..: अस्थिरतेवर यशस्वी मात!

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड ऑक्टोबर २००२ मध्ये गुंतवणुकीसाठी खुला झाला.

अतुल कोतकर – atulkotkar@yahoo.com

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ६०,००० अंशाचा आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १८,०००चा टप्पा ओलांडल्यानंतर समभागांचे मूल्यांकन एका धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. निरंतर सुरू राहिलेल्या भांडवली बाजारातील तेजीमुळे मूल्यांकनात वाढ झाली आहे. साहजिकच गुंतवणुकीतील सुरक्षितता (मार्जिन ऑफ सेफ्टी) कमी झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेणे आवश्यक ठरते. बाजारातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी गुंतवणुकीतील वैविध्य ही एक यशस्वी रणनीती समजली जाते. एक गुंतवणूक म्हणून समभाग रोखे आणि जिन्नस यांचा वापर करणाऱ्या मालमत्ता वर्गाचे संयोजन मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन म्युच्युअल फंड म्हणून ओळखले जाते. सामान्यत: यात फक्त एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गाचा समावेश असतो आणि मालमत्तेचा पोर्टफोलिओ तयार करण्याचा हेतू अस्थिरतेवर मात करून नियमित उत्पन्न आणि वृद्धी मिळविणे हा असतो.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड हा ‘मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ या फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड आहे. या गटातील इतर फंडांच्या तुलनेत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडाचा परतावा अव्वल राहिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड ऑक्टोबर २००२ मध्ये गुंतवणुकीसाठी खुला झाला. फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यात म्हणजे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू या काळात जवळपास ४२ पटींनी वाढली आहे. जगभरातील भांडवली बाजारात अस्थिरता वाढू लागल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत बाजारातील अस्थिरता शिगेला पोहोचली असल्याचे पाहावयास मिळाली आहे. म्हणूनच गुंतवणुकीत समभाग आणि रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या जोडीला मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांनी स्थान द्यायला हवे असा सल्ला गेल्या काही महिन्यांपासून बाजारातील तज्ज्ञ देत आहेत. अशा परिस्थितीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.

सामान्यत: या फंडात एकापेक्षा अधिक मालमत्ता वर्गाचा समावेश असतो. एका अभ्यासानुसार गुंतवणुकीवर प्राप्त झालेल्या सरासरी परताव्यापैकी ९३.४ टक्के परतावा योग्य मालमत्ता वाटपामुळे मिळतो. जोखीम सहिष्णुता निश्चित केल्यानंतर परतावा आणि जोखीम सहन करण्याची क्षमता स्पष्टपणे परिभाषित होते. मालमत्तांचे संतुलन किती कालावधीने करावे हे निश्चित केल्यानंतर असे मानले जाते की, किमान ८० टक्के गुंतवणुकीवरील परतावा हा योग्य मालमत्ता विभाजनामुळे मिळतो. प्रत्येक गुंतवणूकदाराने साजेसे मालमत्ता विभाजन कसे असावे या बाबतीत स्वत: निश्चित करण्यापेक्षा मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करणे कधीही योग्य असते.

मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडाची वैशिष्टय़े आणि फायदे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. सर्वात महत्त्वाचा फायदा एकाच फंडाच्या गुंतवणुकीतून वैविध्य साध्य करता येते. मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड गुंतवणूकदारांना त्यांचा पोर्टफोलिओ विविध जोखीम-नफा घटकांसह विविध मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतो.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी-अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड

*  फंड गट हायब्रिड मल्टी -अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन

*  फंडाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २००२

*  फंड मालमत्ता १२,५०९ कोटी (३१ऑक्टोबर२०२१ रोजी)

*  मानदंड निफ्टी २०० टीआरआय (६५), निफ्टी कम्पोझिट इंडेक्स(२५), लंडन गोल्ड(१०) (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Investment in mutual funds icici prudential multi asset fund zws

ताज्या बातम्या