शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर धोका पत्करायला हवाच. किंबहुना ‘माझा पोर्टफोलियो’ सदराचा उद्देशदेखील विविध प्रकारच्या क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करून धोका कमी करणे हाच असतो. जितका धोका जास्त तितका फायदा जास्त हेही गणित तसे खरेच आहे. आज सुचविलेली कंपनी शॉपर्स स्टॉप हिची आर्थिक गुणोत्तरे आणि गणिते कदाचित पटणार नाहीत. परंतु कंपनी व्यवस्थापनाने नुकतेच घेतलेले काही निर्णय कंपनीचे भवितव्य बदलू शकतात.
सुमारे २६ वर्षांपूर्वी के रहेजा समूहाने स्थापन केलेली शॉपर्स स्टॉप ही बहुधा भारतातील पहिली किरकोळ विक्री दालनांची साखळी असावी. शॉपर्स स्टॉपची भारतातील ३८ शहरांतून ८० स्टोअर्स असून आता ते सिंगल ब्रँड स्टोअरपेक्षा मल्टी ब्रँड फॅमिली स्टोअरमध्ये रूपांतरित झाले आहे. आज शॉपर्स स्टॉपकडे क्रॉसवर्ड, होम स्टॉप या सुप्रसिद्ध ब्रँडखेरीज कॉस्मेटिक्समधील मॅक, बॉबी ब्राऊन, एस्ते लॉदर आणि क्लिनिक हे ब्रँडदेखील आहेत. १९९२ मध्ये सुरू झालेल्या क्रॉसवर्डने मोठा पल्ला गाठला आहे. स्टेशनरी, पुस्तके, संगीत, चित्रपट आणि खेळणी यासाठी नवीन पिढीला आकर्षित करणारे क्रॉसवर्ड हा शॉपर्स स्टॉपचा एक महत्त्वाचा ब्रँड आहे. कंपनीचे तीन लाखांहून अधिक ग्राहक असून हा कन्सेप्ट आजच्या पिढीला भावला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ४९१०.१४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर तब्बल ३७.२८ कोटी रुपयांचा तोटा केला होता. त्यावर उपाय म्हणून कंपनीने नुकतीच तिच्या व्यवसायाची पुनर्रचना केली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने आपली उपकंपनी ‘हायपरसिटी रिटेल’मार्फत सुपरमार्केट विकसित केले होते. परंतु नुकसानीत चालणाऱ्या या स्टोअरचे ५१ टक्के भागभांडवल कंपनीने फ्युचर समूहाला सुमारे ३३५ कोटी रुपयांना विकून टाकले तसेच विमानतळांवरील नुकसानीतील डय़ूटी फ्री स्टोअर्स विकून कंपनीने कर्जाचा डोंगर कमी केला आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंगसाठी कंपनीने ओम्नी चॅनल रिटेलरमध्ये आतापर्यंत ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून अजून सुमारे १५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. सप्टेंबर २०१७ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ८३७.६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर केवळ ३.५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ६७ टक्क्य़ांनी कमी आहे. नुकत्याच केलेल्या या पुनर्रचनेमुळे कंपनी आता आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकेल. तसेच कर्जाचा भार कमी झाल्याने आणि नुकसानीतील व्यवसाय विकून टाकल्याने कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारेल अशी आशा आहे.
आगामी काळात रिटेल क्षेत्रात उत्तम लाभदायी वाढ अपेक्षित आहे. थोडा धोका पत्करू शकणारे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मल्टी ब्रांडेड शॉपर्स स्टॉपचा नक्की विचार करू शकतात.
– अजय वाळिंबे