सुधीर जोशी

जागतिक आर्थिक घडामोडींच्या परिणामांना देशांच्या सीमा फार काळ रोखू शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अमेरिकी बाजारातील विक्रीचे लोट आणि रुपयाच्या घसरत्या मूल्याने सरलेल्या सप्ताहात भारतीय बाजारातही मोठी घसरण झाली. अमेरिका आणि युरोपच्या पाठोपाठ रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणारी संभाव्य दर वाढ आणि मासिक सौदापूर्तीचा दबाव बाजारात पहिले चार दिवस सातत्याने होता. शुक्रवारी मध्यवर्ती बँकेची अपेक्षित रेपो रेट वाढ आणि बँक ऑफ इंग्लंडने रोखे खरेदी करून रोकड तरलता जपण्याचे दिलेले संकेत यामुळे बाजार सावरला. तरीही आधीच्या दोन सप्ताहांप्रमाणे बाजारात साप्ताहिक घसरण पाहायला मिळाली.

आयटीसी:
सिगारेट, हॉटेल्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थ, कागद, लिखाण साहित्य, पॅकेजिंग आणि माहिती तंत्रज्ञान अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात वावर आणि अनेक लोकप्रिय नाममुद्रांची मालकी असूनही या नफा कमावणाऱ्या कंपनीचे समभाग बाजारात सुस्त असायचे. मात्र २०२२ या कॅलेंडर वर्षांत ते सर्वात चांगली कामगिरी करणारे ठरले. या वर्षांत जवळजवळ ५० टक्क्यांची वाढ या समभागात झाली. गेल्या काही वर्षांत सिगारेटवर कर वाढला नाही. करोनाकाळानंतर हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. शाळा महाविद्यालये पूर्वीसारखे सुरू झाले, ई-कॉमर्समुळे पॅकेजिंगची मागणी वाढली आणि कागदांच्या किमती आणि मागणीत भरमसाट वाढ झाली. पामतेल आणि अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आल्या आहेत. ही भरभराट आणखी काही वर्षे सुरू राहण्याचा अंदाज आहे. कंपनीचे इतर व्यवसाय वेगळे करून समभागांचे मूल्यवर्धन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी समभाग राखून ठेवावेत आणि सध्याच्या अस्थिर बाजारात मोठी घसरण झाली तर जरूर जमवावेत.

अ‍ॅक्सिस बँक:
यूटीआय या मोठय़ा वित्तीय संस्थेने स्थापन केलेली ही बँक खासगी बँकांमध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या स्पर्धकांना चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न करते आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल बँकिंगवर भर देत ग्रामीण भागातही व्यवसायवृद्धी करत आहे. आहे. बँकेची सिटी बँकेचा क्रेडिट कार्ड व्यवसायाचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मॅक्स लाइफमध्ये गुंतवणूक करून एक नवी व्यवसाय शाखा सुरू केली आहे. या माध्यमातून गुंतवणूक वाढविण्याचा बँकेचा विचार आहे. पुढील काळात एखाद्या लहान बँकेचे अधिग्रहणदेखील बँकेकडून केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पगार खाती व नोकरदारांना कर्ज देण्यावर बँकेचा भर आहे. बुडीत कर्जासाठी केलेल्या तरतुदीत मोठी घट झाल्यामुळे बँकेने पहिल्या तिमाहीत चांगले निकाल जाहीर केले होते. बँकेच्या नफ्यात ९१ टक्के वाढ झाली होती. सध्याच्या घसरलेल्या बाजारात ७३० रुपये ही समभागाची किंमत खरेदीसाठी आकर्षक आहे.

मिहद्र अँड मिहद्र:
ही कंपनी प्रवासी, व्यापारी वाहने, ट्रॅक्टर आणि इतर शेतीसाठी लागणारी यांत्रिक अवजारे निर्मिती करणारी मोठी कंपनी आहे. मिहद्र अँड मिहद्रने नुकतीच कंपनीच्या प्रसिध्द एक्सयूव्ही ३०० वर आधारित एक्सयूव्ही ४०० च्या विद्युत वाहनाच्या निर्मितीची घोषणा केली. यामुळे कंपनी टाटाच्या नेक्सॉनला मोठी स्पर्धा निर्माण करणार आहे. कंपनीने अनुसरलेले व्यवसायानुकूल भांडवल वाटप धोरण कंपनीचा फायदा करून देत आहे. कंपनीचा ट्रॅक्टर निर्मितीमध्येदेखील मोठा वाटा आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीची विक्री आणि नफा सरासरी ६ टक्क्यांनी वाढला होता तो पुढील दोन वर्षांत २० टक्क्यांनी वाढविण्याचा कंपनीचा इरादा आहे. एक्सयूव्ही प्रकारच्या वाहनांमध्ये मिहद्र अँड मिहद्र कंपनीचा मोठा अनुभव व बोलबाला आहे. ऑगस्ट महिन्यात त्याच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८७ टक्के वाढ होऊन ते २९,५१६ वाहनांवर पोहोचले आहे. या प्रकारच्या वाहनांचे उत्पादन कंपनी दुप्पट करणार आहे. धातू आणि इतर कच्च्या मालाच्या कमी झालेल्या भावांचे परिणाम कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालांवर दिसतील. सध्या घसरलेल्या बाजारात १,२५० रुपयांच्या पातळीजवळ कंपनीचे समभाग घेण्यासारखे आहेत.

जगातील सर्वच देश महागाईविरोधी लढय़ात सामील झाले आहेत. मंदी आली तरी चालेल, पण महागाईला रोखलेच पाहिजे, असा निर्धार या मागे आहे. भारतातील परिस्थिती जरा बरी असली तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरणारे मूल्य भारतालादेखील या लढय़ामध्ये ओढत आहे. आता ही लढाई कधी संपणार आणि बाजाराच्या कुठल्या पातळीवर नवी गुंतवणूक करायची हा कठीण प्रश्न आहे. या आधीचे अनुभव लक्षात घेता बाजार पुन्हा वर जाणार हे जरी नक्की असले तरी बाजाराचा तळ बरोबर हेरणे कठीण आहे. बाजारात शाश्वत तेजी येण्यास आणखी काही महिने लागतील. परदेशात तसेच भारतात रिझव्‍‌र्ह बँकेकडून अजूनही एक दोन वेळा व्याजदर वाढवले जाऊ शकतात. त्यामुळे शेअर बाजारावर तणाव राहीलच. अधूनमधून येणाऱ्या तेजीच्या लाटांमध्ये नको असलेले समभाग विकणे आणि चांगल्या कंपन्यांमध्ये संथ गतीने गुंतवणूक करून पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या सप्ताहातील महत्त्वाच्या घडामोडी
एफएसएन ई—कॉमर्स व्हेंचर (नायका) कडून बोनस समभागांची घोषणा
सप्टेंबर महिन्याच्या वाहन विक्रीचे व वस्तू व सेवा कर संकलनाचे आकडे