scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : कालाय तस्मै नम:

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे.. निफ्टी निर्देशांकांने १७,२०० चा स्तर पार करून या स्तरावर आठ दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे.

आशीष ठाकूर

आता चालू असलेल्या सुधारणेत – तेजीत निफ्टी निर्देशांकांने १७,२०० चा स्तर पार तर केला आहे. पण या स्तरावर निफ्टी निर्देशांक आठ दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे. असे घडल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे १७,४५० ते १७,५०० असेल.. हे गेल्या लेखात नमूद केलेले वाक्य आज आपण काळाच्या कसोटीवर अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५७,३६२.२०

निफ्टी : १७,१५३.००

तांत्रिक विश्लेषणशास्त्रातील सोनेरी नियमाप्रमाणे वरचे अथवा खालचे उद्दिष्ट (लक्ष्य) हे किंमत स्वरूपात आणि काल स्वरूपात साध्य झाले पाहिजे (टार्गेट शुड बी अचिव्हड टाईम वाईज अ‍ॅण्ड प्राइस वाईज) या दोन घटकांपैकी एक जरी कमी पडला तर ते क्षणिक ठरते. हे समजून घेण्यासाठी सरलेल्या सप्ताहातील निफ्टी निर्देशांकाचे उदाहरण घेऊ या.

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे.. निफ्टी निर्देशांकांने १७,२०० चा स्तर पार करून या स्तरावर आठ दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे. या सोनेरी सिद्धांताची लक्ष्य व वेळ या स्वरूपात विभागणी करता, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे उद्दिष्ट (टार्गेट) हे १७,४५० च्या रूपात होते, व त्यासाठी निफ्टी निर्देशांकाने सातत्याने आठ दिवस १७,२०० च्या वर टिकणे हे काल, वेळ स्वरूपात होते.

सरलेल्या सप्ताहातील निफ्टी निर्देशांकाची वाटचाल अभ्यासता, मंगळवारी २२ मार्चला १७,००६ चा नीचांक नोंदवत, २३ मार्चला १७,४४२ चा उच्चांक नोंदवला. निफ्टी निर्देशांकाने १७,००० ते १७,४५० च्या परिघात आपली अचूक वाटचाल चालू आहे हे कृतीतून दाखवून दिले. पण निफ्टी निर्देशांक १७,२०० च्या स्तरावर सातत्याने आठ दिवस (कालानुरूप) टिकण्यात अपयशी ठरल्याने निफ्टी निर्देशांकाला १७,४५० च्या पुढचे लक्ष्य साध्य होऊ शकले नाही व त्याची परिणती सरलेल्या सप्ताहातील निफ्टी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद १७,२०० च्या खाली झाला. एवढे महत्त्व ‘काल संकल्पनेला’ आहे – ‘कालाय तस्मै नम:’ 

येणाऱ्या दिवसांत या घटनेचा फायदा गुंतवणूकदारांना नक्कीच होणार. तो फायदा म्हणजे आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकांची १७,००० ते १७,२०० च्या स्तरादरम्यानच्या वाटचालीला आपण पायाभरणी (बेस फॉरमेशन) संबोधू शकतो. या स्तरादरम्यान निफ्टी निर्देशांकाने जास्तीत जास्त वेळ व्यतीत केल्यास निफ्टी निर्देशांकाची १७,७०० ते १७,८०० पर्यंतची वरची वाटचाल सुकर, आश्वस्त होईल. या पायाभरणी प्रक्रियेमुळे ‘भूमिती श्रेणीतील’ वाटचालीला खीळ बसत, भविष्यातील अचानक बाजार कोसळण्याच्या प्रक्रियेला देखील अटकाव होईल. यातील सहज, सुंदर बाब म्हणजे गुंतवणूकदार निफ्टी निर्देशांकाची वाटचाल स्वत: रेखाटू शकतील. यात अगोदर विकसित केलेला निफ्टी निर्देशांकावरील ३०० अंशांच्या परिघाचे सूत्र हाताशी घेत १७,२०० अधिक ३०० अंश १७,५००, पुढे १७,८०० ही नमूद केलेली वरची लक्ष्ये असतील.

महत्त्वाचा केंद्रिबदू स्तरसंकल्पनेची चिकित्सा :

कोळशाच्या वखारीत सर्वाचे हात काळे असतात व याच कोळशाच्या खाणीत लखलखता हिरा सापडतो. अशा परस्परविरोधी घटना आपल्याला आयुष्यात बघायला मिळतात. त्याच दृष्टीने आजचा आपला लखलखता हिरा हा ‘कोल इंडियाचा लिमिटेड’चा समभाग असेल. 

या स्तंभातील १४ फेब्रवारीच्या लेखात ‘कोल इंडिया लिमिटेड’ समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले. त्या समयी शुक्रवार, ११ फेब्रवारीचा बंद भाव १६६.५५ रुपये होता, तर वित्तीय निकालानंतरचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ हा १६२ रुपये होता. समभागाचा निकाल उत्कृष्ट असल्यास, निकालापश्चात कोल इंडियासाठी १६२ रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ राखत १८१ रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले होते. निकालापश्चात समभागाने १६२ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत, ३ मार्चला १९७ रुपयांचा उच्चांक नोंदविला. म्हणजेच,१८१ रुपयांचे लेखात नमूद केलेले वरच लक्ष्य साध्य केले. त्या दिवशीचा ३ मार्चचा त्याचा बंद भाव १८८ रुपये होता.

निकालापश्चात वाचकांचा समभाग महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत असल्यास, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी आपला समभाग नििश्चतपणे राखून ठेवावा. निकालापश्चात ज्यांनी कोल इंडिया लिमिटेड समभागाची खरेदी केली अशा अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना देखील अल्पावधीत ८.५ टक्क्यांचा (रु. १८१ – १६६.५५ = रु. १४.४५ नफा) परतावा मिळाला. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा बंद भाव हा १८६ रुपये आहे. मंदीच्या दाहक परिस्थितीत गुणवत्तेच्या निकषावर ‘तावून सुलाखून’ येत कोल इंडिया लिमिटेड हा तिसरा शंभर नंबरी सोनेरी समभाग ठरला आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

स्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market outlook for next week indian share market prediction zws

ताज्या बातम्या