वसंत कुळकर्णी

सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत बाजाराने टोकाची अस्थिरता अनुभवली. वॉरेन बफे यांच्या ‘ओन्ली व्हेन द टाइड गोज आउट डू यु डिस्कव्हर हू इज बीन स्विमिंग नेकेड’  या वाक्याची आठवण करून देणारी ही तिमाही होती. तिमाहीची सुरुवात मंदीने तर तिमाहीच्या अंती बाजारात तेजी अवतरली. साहाजिकच शिफारसपात्र फंडांचे पुनरावलोकन केले,  तेव्हा तेजीत कमाई करणारे (अप साईड कॅप्चर रेशो) आणि मंदीत मुद्दलाला कमीत कमी हानी पोहोचणारे फंड कोणते ते बाजारातील अस्थिरतेमुळे दिसून आले. सरलेल्या तिमाहीत फारच कमी फंड आढळले ज्या फंडांनी त्यांच्या मानदंडसापेक्ष चांगली कामगिरी केली. तीन वर्षे पूर्ण केलेल्या फंडांच्या परिघातील ९२ टक्के फंडांची कामगिरी त्यांच्या मानदंडसापेक्ष खराब होती. 

दर तिमाहीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करणे अपेक्षित आहे. पुनरावलोकनांत वगळलेल्या, एखाद्या फंडातून बाहेर पडणे आवश्यक आहे. त्या फंडातील ‘एसआयपी’ थांबविणे आणि आतापर्यंत केलेली गुंतवणूक राखून ठेवणे किंवा काढून घेणे हा निर्णय वैयक्तिक असून, याचा निर्णय गुंतवणूकदारांनी करावयाचा आहे. खाली नमुन्यादाखल दिलेल्या पुनरावलोकन अहवालांमध्ये, अशाच पोर्टफोलिओचा उल्लेख आहे, जिथे प्रत्यक्ष बदल अपेक्षित आहेत आणि ज्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जाणे अत्यावश्यक बनले आहे.

बाजारातील तेजीमुळे किंवा मंदीमुळे तुमच्या पोर्टफोलिओमधील मालमत्ता विभाजनात बदल झाला असेल तर मालमत्तेचे संतुलन साधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. वर्षांतून किमान एकदा प्रत्येकाने आपल्या पोर्टफोलिओची तपासणी करणे आवश्यक आहे. पोर्टफोलिओच्या पुर्नसतुलनाची संकल्पना या पूर्वीच्या लेखात तपशीलवार स्पष्ट केली आहे. तुमचा पोर्टफोलिओ सुस्थितीत ठेवण्यासाठी तुम्ही किती वेळ देता यावर तुमचे यश अवलंबून आहे.

पुनरावलोकन करताना, समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंड प्रकारात अनेक धक्कादायक निकाल आढळले. बहुतांश फंडांच्या खराब कामगिरीस त्यांच्या गुंतवणुकीतील कंपन्यांचे कमी-अधिक प्रमाण कारण ठरले. सर्वात धक्का दिला तो अॅक्सिस ब्लूचिप फंडाने. इन्फोसिस आणि बजाज फायनान्स यांसारख्या समभागांचा आघाडीच्या गुंतवणुकांमध्ये असलेला समावेश आणि आघाडीच्या बहुसंख्य समभागांची खराब कामगिरी यामुळे दोन तिमाहींनंतर या फंडाला शिफारसपात्र फंडांच्या यादीतून वगळावे लागले. या फंडाला वगळण्याचा निर्णय चटका लावणारा होता. मागील तीन तिमाहीपासून हा फंड वगळले जाण्याच्या सीमारेषेवर होता. जानेवारी २०१४ पासून शिफारसपात्र असलेला फंड वगळावा लागणे हे एक विश्लेषक म्हणून क्लेशदायक असले तरी पुन:निर्धारित निकषांवर या फंडाचा यादीत समावेश करता आला नाही. मागील तीन तिमाहीपासून वगळण्याच्या सीमारेषेवर असलेल्या यूटीआय मास्टर शेअरलासुद्धा वगळावे लागणे चटका लावणारे ठरले. जानेवारी २०१८ पासून सातत्याने अव्वल कामगिरी करणाऱ्या या फंडाला वगळावे लागले. मागील सहा महिन्यांचा विचार केल्यास सर्वाधिक बदल लार्जकॅप फंड गटात झाले आहेत.

या पुनरावलोकनात, तीन वर्षांच्या चलत सरासरी परताव्याच्या निकषांवर खराब कामगिरीमुळे अॅक्सिस लाँग टर्म इक्विटीला सुद्धा वगळावे लागले. हा फंडसुद्धा २०१४ पासून या यादीचा भाग होता. या फंडानेही, अॅक्सिस लार्ज कॅप फंडाप्रमाणे, बजाज फायनान्स यांसारख्या समभागांत प्रचंड गुंतवणूक असल्याचा परिणाम या फंडाच्या कामगिरीवर झाला. परंतु या फंडाची कामगिरी निफ्टी ५०० च्या तुलनेत ठीकठाक असल्याने या फंडातील ‘एसआयपी’ बंद करण्याचा सल्ला दिलेला नाही. मात्र या फंडात नवीन एकरकमी गुंतवणूक करू नये, असा सल्ला आहे. एका वर्षांच्या चलत सरासरीवर कोटक टॅक्स सेव्हर फंडाची कामगिरी ठीकठाक असली तरी, तीन वर्षे, पाच वर्षे आणि फंड गटाच्या सरासरीचा विचार करता हा फंड वगळावा लागला. मल्टीकॅप फंड गटात निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाला पर्याय नसल्याचे दिसून येते. या फंड गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुंदरम मल्टीकॅप फंडापेक्षा पहिल्या क्रमांकावर असलेल्या निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाने सहापट अधिक परतावा मिळविला आहे. इतका मोठा फरक सहसा दिसत नाही.

फंड घराण्यांचा पातळीवर विचार केल्यास या तिमाहीत अॅक्सिस फंड घराण्यांचे सर्वाधिक फंड वगळावे लागले तर या यादीत सर्वाधिक पाच फंड निप्पॉन इंडियाचे आहेत. याचे प्रतिबिंब मंगळवारी जाहीर झालेल्या मालमत्ता क्रमवारीतही दिसले. निप्पॉन इंडियाने कोटक आणि आदित्य बिर्ला सनलाईफ यांना मागे सारत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.

  फंड प्रकार       शिफारसपात्र फंड     वगळले        नव्याने समावेश

ईएलएसएस  पराग पारीख टॅक्स सेव्हर कोटक टॅक्स सेव्हर   पीजीआयएम इंडिया

                     आयडीएफसी टॅक्स अॅडव्हांटेज फंड      टॅक्स सेव्हर

                  पीजीआयएम इंडिया टॅक्स सेव्हर

फ्लेक्झीकॅप  एचडीएफसी फ्लेक्झीकॅप   यूटीआय फ्लेक्झीकॅप  फ्रँकलिन इंडिया

    आयसीआयसीआय प्रु. फ्लेक्झीकॅप      फ्लेक्झीकॅप

    फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप

फोकस्ड फंड एचडीएफसी फोकस्ड ३०   डीएसपी फोकस्ड फंड फ्रँकलिन इंडिया

    फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी      फोकस्ड इक्विटी

    निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी

लार्ज अँड मिडकॅप एसबीआय लार्ज अँड मिडकॅप    मिरॅ अॅसेट इमर्जिंग ब्लूचीप   महिंद्र मनूलाईफ

    एलआयसी एमएफ लार्ज अँड मिडकॅप      टॉप २५०

    महिंद्र मनूलाईफ टॉप २५०

लार्जकॅप फंड निप्पॉन इंडिया लार्जकॅप   अॅक्सिस ब्लूचीप एचडीएफसी टॉप १००

    आयडीबीआय टॉप १००   यूटीआय मास्टर शेअर   आयडीबीआय टॉप १००

    आयसीआयसीआय प्रु. ब्लूचीप

मिडकॅप फंड एसबीआय मॅग्नम मिडकॅप डीएसपी मिडकॅप पीजीआयएम मिडकॅप

    पीजीआयएम मिडकॅप अपॉच्र्युनिटीज फ्रँकलिन इंडिया प्रायमा अपॉच्र्युनिटीज

    निप्पॉन इंडिया ग्रोथ      निप्पॉन इंडिया ग्रोथ

मल्टीकॅप निप्पॉन इंडिया मल्टीकॅप

    सुंदरम मल्टीकॅप          —–             —–

    महिंद्र मनूलाईफ मल्टीकॅप बढत योजना

स्मॉलकॅप फंड   निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप    एसबीआय स्मॉलकॅप  युनियन स्मॉलकॅप

    युनियन स्मॉलकॅप डीएसपी स्मॉलकॅप एल अँड टी इमर्जिंग

    एल अँड टी इमर्जिंग बिझनेसेस        बिझनेसेस

व्हॅल्यू फंड   कॅनरा रोबेको व्हॅल्यू  एचडीएफसी कॅपिटल बिल्डर  टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू

    आयडीएफसी स्टर्लिंग व्हॅल्यू   एल अँड टी व्हॅल्यू   आयडीएफसी स्टर्लिंग व्हॅल्यू

    टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

shreeyachebaba@gmail.Com