डीआयसी इंडिया ही पूर्वाश्रमीची कोट्स ऑफ इंडिया. १९४७ मध्ये भारतात व्यवसायाला सरुवात केल्यानंतर आज डीआयसी इंडिया ही छपाईची शाई उत्पादनातील भारतातील एक अग्रगण्य कंपनी समजली जाते. डीआयसी कार्पोरेशन, जपान या जगातील सर्वात मोठय़ा कंपनीने डीआयसी इंडियाच्या भरणा झालेल्या भागभांडवलात डीआयसी पॅसिफिक, सिंगापूर या आपल्या अंगीकृत कंपनीद्वारे ७१.७५% गुंतवणूक केली आहे. डीआयसी कार्पोरेशन, जपान ही सन केमिकल्स या बलाढय़ बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी असल्याने जगभरातील सुमारे ६० देशांत आपल्या २०० कंपन्यांच्या साह्य़ाने तिने विस्तार केला आहे.

कोलकाता आणि नोएडा येथे संशोधन केंद्रे असलेल्या डीआयसी इंडियाने चार प्रमुख शहरांखेरीज देशभरात आपल्या सेवा केंद्रांचे जाळे पसरवले आहे. सततचे संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने छपाईच्या शाईखेरीज आपल्या व्यवसायाला अनुरूप अनेक उत्पादने विकसित केली आहेत. सध्या भारतातील छपाई, प्रकाशन आणि पॅकेंजिंग या तिन्ही उद्योगांना पूरक उत्पादने पुरवणारी डीआयसी ही देशातील एकमेव आधुनिक रसायन कंपनी आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत तोटय़ातून नफ्यात आल्यानंतर कंपनीने डिसेंबर २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी १९५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ४५८ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षांचे म्हणजे मार्च २०१६ साठीचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र आतापर्यंतच्या कामगिरीवरून ते उत्तमच असतील अशी अपेक्षा आहे. सध्या ५९० रुपयांच्या आसपास असलेला हा हाय बीटा शेअर तुम्हाला वर्षभरातच २०% परतावा देऊ  शकेल.

stocksandwealth@gmail.com
portfolio-chart

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.