सुधीर जोशी
आधीच्या सप्ताहातील विक्रीच्या झळा सोसल्यावर बाजाराला सरलेल्या सप्ताहात देशांतर्गत पातळीवर आर्थिक विकासाशी निगडित सकारात्मक वृत्ताने जोम दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८.४ टक्क्यांचा नोंदलेला वृद्धिदर, वस्तू आणि सेवाकराचे (जीएसटी) १.३१ लाख कोटींचे दमदार संकलन यामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब झाले. निर्मिती क्षेत्राच्या पीएमआय निर्देशांकात ऑक्टोबरमधील ५५.९ च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ५७.६ गुणांपर्यंतची वाढ याचीच निदर्शक ठरली. त्यामुळे बाजारात खरेदीला उत्साह आला, मात्र ओमायक्रॉनच्या धोक्याबद्दल अजून संपूर्ण माहिती नसल्यामुळे बाजारातील भीतीचे वातावरण कायम होते. त्यामुळे वरच्या पातळीवर नफा वसुली होत गेली आणि बाजाराच्या मुख्य निर्देशांकांनी केवळ एक टक्क्याची कमाई केली.
सुप्राजित इंजिनीअरिंग
वाहनांसाठी विशेषत: दुचाकीसाठी लागणाऱ्या विविध केबलची ही कंपनी सर्वात मोठी पुरवठादार आहे. दुचाकीसाठी लागणाऱ्या केबलचा ७० टक्के तर चारचाकी वाहनांच्या केबलचा ३५ टक्के पुरवठा कंपनी करते. बिगर वाहन क्षेत्रातील व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीने १२५ कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत वाहन क्षेत्रामधून वाढलेल्या मागणीमुळे कंपनीने विक्रीमध्ये बारा टक्के वाढ साधली होती व कच्च्या मालाशी निगडित किमतीमुळे नफ्याचे प्रमाणही कायम ठेवले होते. वाहन क्षेत्रातील मागणीत अपेक्षित सुधारणा व भारत-६ च्या निकषांसाठी वाहनातील केबलचे वाढलेले प्रमाण ध्यानात ठेवून सध्याच्या बाजारमूल्यात या कंपनीत गुंतवणुकीची संधी वाटते.
विप्रो
नवीन व्यवस्थापकीय चमूने केलेल्या धोरण बदलाचे परिणाम कंपनीच्या कारभारावर अपेक्षेपेक्षा लवकरच दिसू लागले आहेत. ‘कॅपको’ या युरोपमधील व्यवस्थापकीय सल्ला क्षेत्रातील कंपनीच्या अधिग्रहणानंतर १६ देशांतील शंभरहून अधिक ग्राहकांद्वारे माहिती सेवा सल्लागार क्षेत्रातील नवीन दालने विप्रोला उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे या वर्षांत २२ नवी कंत्राटे मिळाली आहेत तर आणखी ३५ मिळण्याची शक्यता आहे. कंपनी क्लाऊ ड तंत्रज्ञानावर आपली पकड मजबूत करीत आहे. सध्याच्या बाजारमूल्यात या कंपनीत गुंतवणुकीची संधी आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज
भारतातील गुंतवणूक क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित वित्त सेवा एक क्रांती घडवीत आहेत. त्यामध्ये सहभागी असलेली ही कंपनी तंत्रज्ञानाला अग्रभागी ठेवून नव्या पिढीला आकर्षित करेल अशा मोबाइल व इंटरनेटवर आधारित सेवा गुंतवणुकीसाठी उपलब्ध करीत आहे. त्यामध्ये समभागांबरोबर विमा, रोखे, कर्जे तसेच म्युच्युअल फंड योजनांचा समावेश असेल. कंपनीच्या नवीन ग्राहकांमध्ये पन्नास ते साठ टक्के सहभाग तरुणांचा आहे व दोन तृतीयांश ग्राहक द्वितीय श्रेणीतील शहरांमधील आहेत. कंपनीच्या सप्टेंबर अखेरच्या तिमाहीतील नफ्यात २६ टक्के वाढ झाली होती. या व्यवसायातील भवितव्य पाहता सध्याचा बाजार भाव या कंपनीमधील गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.
बाटा इंडिया
बाटा इंडिया लिमिटेड पुरुष, महिला आणि मुलांसाठी पादत्राणे बनवते. कंपनी लेदर, रबर, कॅनव्हास आणि पीव्हीसी यांसारख्या विविध प्रकारातील पादत्राणांची निर्मिती करते. सध्या कंपनीकडे ‘हश पपीज’, ‘डॉ स्कॉल्स’, ‘नॉर्थ स्टार’, ‘पॉवर’, ‘मेरी क्लेअर’, ‘बबलगमर्स’, ‘अॅम्बेसेडर’, ‘कम्फिट’ आणि ‘विंड’ यांसारख्या विविध नाममुद्रांची मालकी आहे. ही कंपनी औद्योगिक फुटवेअरच्या व्यवसायातदेखील कार्यरत आहे. या व्यवसायातील हे सर्वात मोठे नाव आहे. कंपनीने फॅ्रचाईझी दुकाने २७० वरून ५०० पर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे तसेच कॅज्युअल प्रकारामधील हिस्सा वाढविणार आहे. कंपनीचे सप्टेंबर अखेरच्या तिमाहीचे निकाल पुन्हा नफ्याकडे वाटचाल करणारे ठरले. सध्याचा बाजारभाव खरेदी करण्याच्या पातळीवर आला आहे.
ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या अवताराने सध्याचा बाजार कसा कमकुवत आहे व विषाणूवर अजूनही आपण ताबा मिळवलेला नाही हेच सिद्ध केले. जागतिक बाजारातील अस्थिरता, महागाईचा धोका यामुळे भारतीय बाजार अस्थिरच राहील, पण करोनासारख्या साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या अनुभवामुळे मोठय़ा घसरणीची शक्यता नाही. या सप्ताहातील रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतील भाष्य बाजाराला दिशा देणारे ठरेल.