बाजाराचा तंत्र कल : ही चाल तुरू तुरू

विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

आशीष ठाकूर

निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकाच्या कडय़ावर, तेजीच्या वादळवाऱ्यात नवनवीन शिखर पार करतानाची निफ्टीची ‘तुरू तुरू चाल’ सर्वानाच भावते. या ऐतिहासिक उच्चांकाच्या कडय़ावरून वाटचाल करत असताना निर्देशांकाचा भविष्यातील अडथळा अथवा आधार काय असेल त्याचा आज विस्तृतपणे आढावा घेऊ या. विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४६,९६०.६९

निफ्टी : १३,७६०.५५

आज बाजार तेजीने फुलून गेलेला आहे आणि या तेजीचा पाया हा परदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या रसदीवर आधारलेला आहे. हा पैशांचा ओघ शाश्वत असल्याने  बाजारात घसरण अशक्यप्राय आहे. हाच लेखाचा मुख्य विषय ठेवल्यास, इतिहासात डोकावून पाहता.. १९९२ चा अपवाद वगळता (तेव्हा परदेशी गुंतवणूकदार संस्था भारतात कार्यरत नव्हत्या) २०००, २००८, जानेवारी २०२० च्या तेजीचे पालकत्व हे परदेशी गुंतवणूकदार संस्थांकडेच होते व तेव्हा देखील आता सारखीच (बाजारात घसरण अशक्यप्राय गोष्ट आहे) भावना होती. तेव्हा देखील २००० साली निर्देशांकांत म्हणजेच सेन्सेक्समध्ये ६,१५० वरून २,५९४ आणि निफ्टीमध्ये १,८१८ वरून ८४९ पर्यंत घसरण झाली होती. २००८ साली सेन्सेक्स २१,२०६ वरून ७,६९७ आणि निफ्टी ६,३५७ वरून २,२५२ पर्यंत खाली घसरण झाली होती. तर नुकतीच जानेवारी २०२० ला सेन्सेक्सने ४२,२७३ वरून २५,६३८ आणि निफ्टीने १२,४३० वरून ७,५११ पर्यंत घसरण दाखविली आहे.

आज जे गुंतवणूकदार पंच्चावन ते साठ वयोगटातील आहेत ज्यांनी १९९२ पासून २०२० पर्यंतच्या तेजी-मंदीचे चक्र प्रत्यक्षात अनुभवलं आहे. त्यांनी उच्चांकी स्तरावरून बाजार कोसळल्यावर जी धूळधाण होते, ‘लाखाचे बारा हजार होतात’ हे त्यांनी पाहिलं व अनुभवलं आहे. त्यामुळे आताच्या घडीला अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा (गुंतवणूक कालावधी सहा महिन्यांपर्यंत) असलेल्या गुंतवणूकदारांसमोर दोन पर्याय आहेत –

१) सर्व समभाग एकदम न विकता शंभर समभागांना वीसच्या पाच तुकडय़ात विभागून निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यांवर २० टक्कय़ांच्या तुकडय़ात विकणे.

२) दुसरा पर्याय तेजीचा पतंग हा तब्बल निफ्टी निर्देशांकावर १४,५०० ते १५,००० पर्यंतचे लक्ष्यही हाकेच्या अंतरावर असल्याचे भासवत असल्याने तोवर धीर धरण्याचा. ‘आम्ही तेजीच्या अंतिम बिंदूपर्यंत समभाग राखूनच ठेवणार, पण असा एक स्तर सांगा की जो तुटला की चालू असलेल्या तेजीला पूर्णविराम मिळेल आणि हा स्तर तुटल्यावरच आम्ही समभागांची नफारूपी विक्री करू,’ असा या मंडळींचा थेट प्रश्न आहे. त्या दृष्टीने आताच्या तेजी-मंदीचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा सेन्सेक्सवर ४६,३०० आणि निफ्टीवर १३,५५० असेल. या स्तराखाली बाजार सातत्याने पाच दिवस टिकल्यास सेन्सेक्स ४४,००० आणि निफ्टी १३,००० पर्यंत खाली घसरेल. त्यानंतर हे मंदीचे आवर्तन फेब्रुवारीपर्यंत असून यात निर्देशांक सेन्सेक्सवर ३९,२५० आणि निफ्टीवर ११,५०० पर्यंत खाली घसरू शकतो.

कंपन्यांच्या वित्तीय निकालाचे विश्लेषण..

या स्तंभातील २६ ऑक्टोबरच्या लेखात सामावलेल्या, आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड या समभागाचे निकालोत्तर विश्लेषण करू या. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही ३१ ऑक्टोबर होती. २३ ऑक्टोबरचा बंद भाव ३१.४० रुपये होता. निकालोत्तर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर ३० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर ३० रुपयांचा स्तर राखत ३८ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होत. निकालापश्चात ३० रुपयांचा स्तर राखत, २३ नोव्हेंबरला ३८.५० रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे आयडीएफसी फर्स्ट बँक दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत २१ टक्कय़ांचा परतावा मिळविला. आजही आयडीएफसी फर्स्ट बँक ३० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि १८ डिसेंबरचा बंद भाव हा ३६.९५ रुपये आहे.

(क्रमश:)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Technical analysis of stocks market zws

ताज्या बातम्या