Monthly Horoscope August 2025 in Marathi : नवीन महिना नवीन आशेचे किरण घेऊन येतो. त्यातच श्रावण महिना सुरु झाला की सणांची चाहूल लागते. त्यातच ऑगस्ट महिन्यात नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, अंगारक संकष्ट चतुर्थी, गोपाळकाला, ऋषिपंचमी, हरितालिका आणि सगळ्यांचा आवडता सण श्रीगणेश चतुर्थी असणार आहे. तर येणारा सणांचा महिना आपल्यासाठी कसा असेल याची उत्सुकता तुमच्याही मनात नक्कीच असेल. करिअर आणि नोकरी, आर्थिक परिस्थिती, कोणती गोड बातमी नक्की यापैकी आपल्या नशिबात काय असेल, कोणत्या राशीला कसा होणार फायदा याबद्दल ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया…
ऑगस्ट महिन्याचे १२ राशींचे भविष्य (August Monthly Horoscope 2025)
मेष ऑगस्ट राशिभविष्य ( Aries August Horoscope 2025)
सणवार साजरे करण्यात पुढाकार घ्याल. उत्साह वाढेल. नारळी पौर्णिमा आणि जन्माष्टमीच्या कालावधीत महत्वाची कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. परदेशासंबंधीत कार्य प्रगतीपथावर जाईल. हिंमत आणि जिद्द वाढेल पण शब्द जपून वापरावेत. नवी नाती जुळतील. पण, नात्यामध्ये अधिकार गाजवू नका. ओळखीतून कामे होतील आणि न टाळता येणारे खर्च वाढतील. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न फलद्रुप होतील. महिनाखेरीस गणेशाच्या आगमनाने खूप दिवस ज्या गोष्टीची वाट बघत असाल त्यासंबंधित बातमी समजेल. अपचनाचा आणि वाताचा त्रास वाढेल.
वृषभ ऑगस्ट राशिभविष्य (Taurus August 2025 Horoscope)
सणावारांनी सजलेल्या या महिन्यात मित्रमंडळी आणि आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. नारळी पौर्णिमा फलदायी ठरेल. नवी नाती जुळतील. जुन्या कटू प्रसंगांच्या आठवणींनी मन अशांत होईल. श्रीकृष्ण जन्माष्टमी चित्त स्थिर करण्यास मदत करेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासवरील लक्ष ढळू देऊ नका. नोकरी व्यवसायात विशेष प्रगती कराल. गुरुबल चांगले असल्याने मेहनत फळास येईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरण्यास योग्य असे ग्रहमान आहे फक्त प्रयत्नशील रहा. पतीपत्नी नातेसंबंधाच्या रेशीमगाठी दृढ होतील. गुंतवणूकदारांसाठी श्री गणेशाचे आगमन मनातील इच्छा पूर्ण करणारे असेल. उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन ऑगस्ट राशिभविष्य (Gemini August Horoscope 2025)
सणवार साजरे करण्यात मन उत्साहित होईल. सामाजिक बंध दृढ होतील. गरजूंना मदत कराल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आपल्या छंदासाठी थोडा वेळ राखून ठेवावा. नोकरी व्यवसायात नारळी पौर्णिमेच्या आसपास महत्त्वाची आर्थिक उलाढाल होईल. सर्वांना लाभकारक असतील अशा योजना अमलात आणाल. विवाहोत्सुक मंडळींना जोडीदार संशोधनाच्या कार्यात यश मिळेल. नातेवाईक, मित्रमंडळी यांची मदत घ्याल. विवाहित दाम्पत्य आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी जपतील. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दरम्यान मनोबल एकवटून आगेकूच कराल. गुंतवणूकदारांसाठी या महिन्यात खूपच चढउतार असतील. सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे. श्री गणेशाच्या आगमनाने नवा उत्साह निर्माण होईल.
कर्क ऑगस्ट राशिभविष्य ( Cancer August Horoscope 2025)
वैचारिक गोंधळ व समस्या थोड्या बाजूला सारून, सणवार साजरे करण्यात उत्साह वाढेल. विद्यार्थिवर्गाला अभ्यासाव्यतिरिक्त कला, क्रीडा व तंत्रज्ञान यांत अधिक रस वाटेल. प्रलोभनांना वेळीच आवर घाला. नोकरी-व्यवसायात नारळी पौर्णिमा ते जन्माष्टमी या कालावधीत विशेष लाभ होईल. अपेक्षित बातमी कळेल. उच्च पद भूषवाल. संततीप्राप्तीचे योग तितकेसे बलवान नाहीत. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांना समजून व सांभाळून घेतल्यास दोघांच्या समस्यांवर उकल सापडेल. घर, वाहन व इस्टेट यांबाबत विषय काढणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. त्यामुळे सध्या तरी मौन राखावे.परदेशासंबंधित कामांचा पाठपुरावा करावा लागेल. श्री गणेशाच्या आगमनाने पुन्हा एकदा नवचैतन्य येईल. आरोग्यदायक महिना जाईल
सिंह ऑगस्ट राशिभविष्य (Leo August Horoscope 2025)
अभ्यास, काम यांसह कला, परंपरा आणि संस्कृती जपणारा असा हा महिना असेल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटींमुळे नवी उमेद मिळेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. प्रयत्न करत राहा. शिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. उच्च पदासाठी आपले नाव यादीमध्ये पुढे सरकेल. नारळी पौर्णिमा आनंदवार्ता देईल, तर जन्माष्टमी कीर्ती, प्रसिद्धी पसरवेल. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगत्या जोडीदाराची निवड करता येईल. विवाहित दाम्पत्य कुटुंबासाठी विशेष नियोजन करतील. ज्येष्ठ व्यक्तींकडून कौतुक होईल. वडिलोपार्जित इस्टेटीबाबत तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल. गुंतवणूकदारांना श्री गणेशाचे आगमन विशेष फलदायी ठरेल. डोळे चुरचूरणे, लाल होणे असा त्रास संभवतो.
कन्या ऑगस्ट राशिभविष्य (Virgo August Horoscope 2025)
सणवार, संस्कृती, परंपरा जपणारा आणि उत्सवांनी भरलेला असा हा महिना असेल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटी नवचैतन्य देणाऱ्या असतील. नारळी पौर्णिमा उत्कर्षकारक असेल. विद्यार्थी अभ्यास सांभाळून आपल्यातील कलागुण विकसित करतील. व्यक्तिमत्त्व विकासासाठी या सामाजिक जीवनाची आपणास नितांत गरज भासेल. जन्माष्टमीच्या सुमारास आत्मविश्वास बळावेल. त्यामुळे नोकरी-व्यवसायात आपला प्रभाव पडेल. विवाहित मंडळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडतील. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. परदेशातील कामांमध्ये लहान-मोठ्या गोष्टी अपूर्ण राहतील. प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. श्री गणेशाचे आगमन आरोग्यदायी ठरेल.
तूळ ऑगस्ट राशिभविष्य (Libra August Horoscope 2025)
सणवार साजरे करण्यात मन प्रफुल्लित राहील. नातेवाईकांच्या भेटीतून कडूगोड अनुभव येतील. विद्यार्थीवर्ग आपल्यातील गुणांची झलक दाखवेल. अभ्यास सांभाळून आपले छंद जोपसेल. नारळी पौर्णिमा आनंददायी ठरेल. नोकरी व्यवसायात संमिश्र प्रतिसाद मिळेल. जन्माष्टमीच्या सुमारास क्लेशकारक परिस्थितीला सामोरे जाल. घराच्या व्यवहारात घाई नको, पण चालढकलदेखील नको. उपवर मुलामुलींचे विवाह ठरतील. विवाहितांना एकमेकांच्या साथीने प्रगती करण्याची संधी मिळेल. श्री गणेशाचे आगमन चैतन्यमय असेल. संततीसंबंधित गोड बातमी समजेल. गुंतवणूकदारांनी थोडी वाट बघावी. रक्तातील साखर आणि रक्तदाब यांचा तोल सांभाळावा.
वृश्चिक ऑगस्ट राशिभविष्य (Scorpio August Horoscope 2025)
मनस्थिती बदलली की परिस्थिती सुद्धा बदलू शकते याचा प्रत्यय देणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचे मनावर घ्यावे. नारळी पौर्णिमा मनोबल वाढवेल. नोकरी व्यवसायात आपल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळतील. सबुरीचे गोड फळ चाखायला मिळेल. जन्माष्टमीच्या आसपास जोडीदारासह उत्तम सूर जुळेल. जमीनजुमला, प्रॉपर्टी हा वादाचा विषय होऊ देऊ नका. नाती महत्वाची असल्याने ती जपाल. श्री गणेशाचे आगमन नवी उमेद जागवेल. गुंतवणूक करताना आर्थिक सुरक्षितता आणि निश्चितता यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. दूषित पाण्यामुळे पोट बिघडेल. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. त्रास झाल्यावर काळजी करण्यापेक्षा त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यावी.
धनु ऑगस्ट राशिभविष्य (Sagittarius August Horoscope 2025)
सण समारंभ, स्नेहसंमेलन यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्ग अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा या क्षेत्रातही आपले गुण दाखवेल. नारळी पौर्णिमेला आनंद वार्तांची भरती येईल. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. आर्थिक उन्नती होईल. गुंतवणूकदारांसाठी जन्माष्टमी लाभकारक ठरेल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्य कौटुंबिक सुखाचा आनंद घेतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक करावी. जमीन, इस्टेट या बाबत वितंडवाद आणि पैसे खर्च करण्यापेक्षा तज्ज्ञ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरण निकालात काढावे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवाल. मांड्या, पोटऱ्या भरून येतील. व्यायामाने स्नायू बळकट करावेत.
मकर ऑगस्ट राशिभविष्य (Capricorn August Horoscope 2025)
आपल्या मेहनतीची दखल घेणारा आणि त्याचा उत्तम मोबदला देणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह इतर अनेक विषयात गर्क असतील. सामाजिक बंध, व्यवहार ज्ञान आणि संवाद कौशल्य विकसित होतील. नोकरी व्यवसायात नारळी पौर्णिमा लाभकारक ठरेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग, जन्माष्टमीच्या आसपास मनपसंत जोडीदाराची निवड कराल. मोठी रक्कम गुंतवताना मनात धाकधूक राहील. तज्ज्ञांचा सल्लादेखील स्वतः पडताळून बघाल. जमीनजुमला, घर यांच्या विक्रीसाठी आणखी थोडा धीर धरावा लागेल. कौटुंबिक समारंभात मानाचे स्थान भूषवाल. श्री गणेशाचे आगमन आनंद आणि उत्साह घेऊन येईल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवाल. आरोग्याची काळजी घेण्यात आपण हयगय करणार नाही
कुंभ ऑगस्ट राशिभविष्य (Aquarius August Horoscope 2025)
मेहनत, ज्ञान आणि वेळेचा सदुपयोग होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्गाचे कष्ट फळास येतील. आकलन शक्ती चांगली असल्याने नवे विषयात रस वाढेल. तसेच मित्रांना समजवून सांगणे याचाही आपण आनंद घ्याल. नारळी पौर्णिमेला मनाची स्थिती चंचल व द्विधा असेल. न सांगता येणारी चिंता भेडसावेल. नोकरी व्यवसायात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी मुद्दे प्रभावीपणे मांडाल. जन्माष्टमी नंतर वरिष्ठांकडून या मुद्द्यांची दखल घेतली जाईल. गुरुबल चांगले असल्याने विवाहोत्सुकांनी जोडीदारासाठी संशोधन सुरू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांच्या सहवासाचे सुख लाभेल. श्री गणेशाच्या आगमनाने वैचारिक व बौद्धिक तसेच कलागुणांची देवाणघेवाण उत्साह वाढेल. गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल. कफ, खोकल्याचे प्रमाण वाढेल.
मीन ऑगस्ट राशिभविष्य (Pisces August Horoscope 2025)
कमजोर गुरुबल व साडेसाती असूनदेखील हा महिना उत्साहवर्धक असेल. नव्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाल. सामाजिक बंध दृढ होतील. विद्यार्थिवर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, प्रात्यक्षिके यांत मग्न असेल. नारळी पौर्णिमा ते जन्माष्टमी यादरम्यान अपेक्षित बातमी समजेल. नोकरी-व्यवसायात नव्या व्यक्तींच्या भेटीगाठी हितकर ठरतील. विवाहोत्सुकांना अजून थोडी वाट बघणे क्रमप्राप्त आहे. विवाहित मंडळींनी लहान-मोठ्या मुद्द्यावरून वाद घालणे योग्य नाही. जोडीदाराचे म्हणणे नीट ऐकून घेतलेत तरी त्याला खूप दिलासा वाटेल. श्री गणेशाचे आगमन उमेद जागवेल. जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी भविष्यात लाभदायी ठरेल. गुंतवणूकदारांचा आलेख डळमळीत होईल. अस्थिरता वाढेल. अशा परिस्थितीत गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरणार नाही. उत्साहाच्या भरात केलेल्या अतिश्रमाचा शीण जाणवेल.
तर असा असेल १२ राशींसाठी ऑगस्टचा संपूर्ण महिना…