ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे

Monthly Horoscope October 2025 : प्रत्येक महिना आशेचा नवीन किरण घेऊन येतो. आता सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर महिना सुरु होईल. यंदा नवीन महिन्याची सुरुवात दसरा या सणाने होते आहे. त्याचप्रमाणे गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि खास गोष्ट म्हणजे याच महिन्यात दिवाळी सुद्धा असणार आहे. त्यामुळे आनंद-उत्सवाची चाहूल घेऊन येणाऱ्या महिन्यात तुमची आर्थिक, मानसिक, शारीरिक स्थिती कशी असणार याबद्दल आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया…

मेष ऑक्टोबर राशिभविष्य ( Aries October Horoscope 2025)

‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’. महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत असल्याने या महिन्यात खरोखरच आनंदाला तोटा नसेल. विद्यार्थी वर्ग एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित वार्ता कानी येतील. १८ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीत प्रवेश करत आहे. गुरुबल कमजोर होत असले तरी उच्चीचा गुरू लाभकारक ठरेल. केवळ दीड महिन्यासाठीच गुरू कर्केत असेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग सुरू आहेत. मनपसंद जोडीदार मिळेल. दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटाल. नव्या खरेदीचा आनंद काही औरच असेल. डोळे आणि पोट सांभाळा. औषधोपचारात चालढकल नको.

वृषभ ऑक्टोबर राशिभविष्य ( Taurus October Horoscope 2025)

महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत आहे. विद्या, संपत्ती, समृद्धी आणि धैर्य देणारा दसरा अतिशय शुभ फळ देईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील एकाग्रतेमुळे चांगला फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे आधीच ओळखाल. त्यानुसारच पुढचा डाव मांडाल. १८ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीत प्रवेश करेल. आपल्यासाठी हा राशी बदल हितकारक ठरेल. विवाहोत्सुकांचे विवाह दिवाळीच्यादरम्यान ठरतील. दिवाळी आनंदाची आणि उत्साहाची असेल. जोडीदारासह लहानमोठे वाद झाल्यास वेळेवरच मिटवा. गैरसमजाला थारा देऊ नका. गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी मिळेल. तरी देखील डोळे उघडे ठेवूनच व्यवहार करावेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलेत तरच आरोग्य चांगले राहील.

मिथुन ऑक्टोबर राशिभविष्य ( Gemini October Horoscope 2025)

महिन्याची सुरुवात दसऱ्याने होत आहे. द्वेष, राग आणि दुःख या नकारात्मक भावनांचे दहन कराल. विद्यार्थी वर्गाने आळस झटकून कामाला लागावे. धरसोड न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने दिवाळी आनंदाची आणि प्रगतीची असेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने वेगाने पुढे जाल. १८ ऑक्टोबरला गुरू द्वितीय स्थानातील कर्क राशीत प्रवेश करत आहे. लाभकारक बातमी समजेल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. वैचारिक आणि प्रेमाचे धागे जुळतील. विवाहित मंडळींना जोडीदार समजून घेईल. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी उत्तमप्रकारे पार पडेल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास विशेष लाभ होईल. पचन, उत्सर्जन, पोटदुखी बळावेल.

कर्क ऑक्टोबर राशिभविष्य ( Cancer October Horoscope 2025)

२ ऑक्टोबरला येणारा दसरा आनंद आणि उत्साह घेऊन येईल. कामाचा व्याप वाढेल. पण, जबाबदाऱ्या पार पाडताना मनाला समाधान वाटेल. विद्यार्थिवर्गासाठी परीक्षा हे स्वतःला सिद्ध करून दाखविण्याचे एक प्रभावी माध्यम ठरेल. एकाग्रतेने अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरेल. १८ ऑक्टोबरला गुरूने कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे गुरुबल चांगले मिळेल आणि आर्थिक समस्या दूर होतील. तर विवाहित मंडळींना जोडीदाराचा भक्कम आधार मिळेल. कौटुंबिक जबाबदारी हिमतीने पार पाडाल. घर, प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ज्ञांकडून तपासून घ्यावीत. कायदेशीर कार्यवाही करण्यात विलंब करू नका. गुंतवणूकदारांना मिळणारे लाभ मध्यमानात असतील. दिवाळी उत्साह आणि आनंद देणारी ठरेल. आप्तांच्या भेटीगाठी संमिश्र अनुभव देतील.

सिंह ऑक्टोबर राशिभविष्य ( Leo October Horoscope 2025)

या महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत आहे. यंदाचा दसरा धनलाभ व आर्थिक स्थैर्य देणारा असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात कसून मेहनत घेईल. पळवाटा उपयोगी पडणार नाही हे आपणास आत्तापर्यंत समजले असेलच. १८ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत प्रवेश करेल. आपल्यासाठी गुरुबल कमजोर होईल. नोकरी व्यवसायात मनाजोगते निर्णय घेणे कठीण जाईल. दिवाळीमध्ये संमिश्र अनुभव येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तांच्या भेटी होतील. जोडीदाराची मते धुडकावून लावू नका. स्थावर इस्टेटी संबंधित कामे पुढे सरकतील. कामात अडथळे येतील. गुंतवणूकदारांनी धोक्याची घंटा दुर्लक्षित न करता सावध व्हावे. ताण तणावामुळे शारीरिक स्वास्थ्य विचलित होईल. पोट बिघडणे, छाती भरून येणे असा त्रास वाढेल.

कन्या ऑक्टोबर राशिभविष्य ( Virgo October Horoscope 2025)

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा… याप्रमाणे खरोखरच आनंदी वातावरण असलेला हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाची कसोटी सुरू होईल. परीक्षेनंतरही अभ्यासात खंड पडू देऊ नका. सराव करत राहावे. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. या संधीचे सोने करणे आपल्या हाती आहे. १८ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुकांचे दिवाळीनंतर विवाह होतील. दिवाळीत आपल्या कलागुणांना वाव मिळेल. विवाहितांच्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. घर, वाहन, जमीन यांचे व्यवहार घाईघाईत निश्चित करू नका. गुंतवणूकदारांना कर्केतील गुरू भरभरून लाभ देईल.

तूळ ऑक्टोबर राशिभविष्य ( Libra October Horoscope 2025)

नव्या संकल्पना अमलात आणण्यासाठी दसऱ्यासारखा उत्तम मुहूर्त नाही. नवे प्रकल्प आकार घेतील. आपली बुद्धी, मेहनत, जिद्द आणि कलात्मकता फळास येईल. विद्यार्थी वर्ग यशाची शिखरे सर करत आगेकूच करेल. नोकरी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. व्यक्तिमत्वाचे नवे आयाम विकसित कराल. १८ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत प्रवेश करेल. अनेक लाभकारक गोष्टी घडतील. दिवाळी आनंदीआनंद घेऊन येईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहितांच्या जोडीदाराची आर्थिक प्रगती होईल. घराच्या व्यवहारासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने नफ्याचा सौदा होईल. गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीचा विचार करावा. मूत्र विकार, ओटीपोटाचे विकार त्रास देतील.

वृश्चिक ऑक्टोबर राशिभविष्य ( Scorpio October Horoscope 2025)

महिन्याची यशस्वी सुरुवात दसऱ्याने होत आहे. मनात, घरात, लोकांत चैतन्यमय वातावरण निर्माण होईल. विदयार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. १८ ऑक्टोबरला गुरू भाग्य स्थानातील कर्क राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. नोकरी व्यवसायात उमेदीने कामकाज सुरू कराल. परदेशातील कामांबाबत निर्णय घेता येतील. विवाहितांना जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. संतती प्राप्तीचे योग लांबणीवर जातील. कौटुंबिक जबाबदारी एकत्रितपणे पार पाडाल. घराच्या व्यवहारात रेंगाळलेल्या गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामात दिरंगाई होईल. गुंतवणूकदार योग्य संधीचा लाभ करून घेतील. दिवाळी अधिक खर्चाची पण तितक्याच आनंदाची आणि उत्साहाची जाईल. मूत्राशयाच्या तक्रारींवर वैद्यकीय सल्ला
व उपचार घ्यावा.

धनु ऑक्टोबर राशिभविष्य ( Sagittarius October Horoscope 2025)

दसरा उत्साहात साजरा होईल, पण काही कटू अनुभव पचवण्याची तयारी ठेवावी लागेल. विद्यार्थी कसून अभ्यास करतील. पळवाटा शोधण्यात अर्थ नाही. १८ ऑक्टोबरला गुरु अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. नोकरी व्यवसायात कामकाजाच्या पद्धतीत झालेले बदल आपल्या पचनी पडणार नाही. जुळवून घ्यायला वेळ लागेल. चिडचिड वाढेल. विवाहित दाम्पत्यांनी शब्दांवर ताबा ठेवावा, तरच गैरसमज टळतील. दिवाळीच्या दरम्यान घर, जमीन याबाबत पुन्हा चर्चा सुरू होईल, पण गाडी पुढे जाणार नाही. गुंतवणूकदारांना मोठी जोखीम खाली खेचेल. सुरक्षित गुंतवणूक करावी. समाजकार्यात मन रमेल. कौटुंबिक प्रश्न अलगद सोडवावेत. हुकूमशाही कामी येणार नाही. कामाचा ताण आणि अतिश्रमाने खूप दमणूक होईल.

मकर ऑक्टोबर राशिभविष्य ( Capricorn October Horoscope 2025)

२ ऑक्टोबरचा दसरा साजरा करण्यासाठी समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्याची मोहीम राबवाल. विद्यार्थी वर्ग आळस, नैराश्य या वैयक्तिक नकारात्मक भावना दूर सारेल. नोकरी व्यवसायात नवे करार हितकारक ठरतील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. १८ ऑक्टोबरला गुरु सप्तमातील कर्क राशीत प्रवेश करेल. अल्प काळासाठी उत्तम गुरुबल प्राप्त होईल. दिवाळी आनंदाची जाईल, पण त्या दिवसात डोक्यात अनेक विचारांचे काहूर असेल. मनःशांती ढळू देऊ नका. विवाहोत्सुकांचे विवाह ठरण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबातील व्यक्तींना आपल्या सोबतीचा मोठा आधार वाटेल. कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याकडून दिरंगाई नको. सांध्यात चमक भरेल. कंबर भरून येईल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी. आर्थिक स्थिती अस्थिर नसली तरी व्यवहार तोट्यात जाऊ देऊ नका.

कुंभ मकर ऑक्टोबर राशिभविष्य ( Aquarius October Horoscope 2025)

नवरात्रात व दसऱ्याला मित्रमैत्रिणींना मदत करण्याची संधी मिळेल. काही वेळा स्पष्ट बोलणे सर्वांच्याच हिताचे ठरेल. विद्यार्थी आपली मेहनत, बुद्धिमत्ता आणि क्षमता पणाला लावतील. बारीकसारीक चुकांची शक्यता कमी होईल. नोकरी व्यवसायात हिमतीने आगेकूच कराल. साडेसातीमुळे अपेक्षित यश मिळाले नाही तरी विरोधकांना धडा शिकवाल. विवाहोत्सुकांचे जोडीदार संशोधन यशस्वी होईल. काही गोष्टींची तडजोड केलीत तर अनुरूप जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांना संतती प्राप्तीच्या प्रयत्नात यश मिळेल. वैद्यकीय सल्ला व उपचार उपयुक्त ठरतील. 18 ऑक्टोबरला गुरू षष्ठ स्थानातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमी होईल. घराचे कागदपत्र अपूर्ण असल्यास योग्य ती कार्यवाही करावी लागेल. कोर्टकचेरीच्या कामात दिरंगाई होईल. गुंतवणूकदारांना दिवाळीचे दिवस मध्यम मानाचे जातील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन मकर ऑक्टोबर राशिभविष्य ( Pisces October Horoscope 2025)

दसऱ्याला आपला उत्साह काही औरच असेल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. सामाजिक कार्य आवडीने कराल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या तयारीचा अंदाज घेऊन आणखी मेहनत घ्यावी लागेल. वेळापत्रकात त्यानुसार बदल कराल. १८ ऑक्टोबरला गुरू पंचमातील कर्क राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. नोकरी-व्यवसायातील अडचणीतून मार्ग निघतील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. विवाहितांना दिवाळीत आनंद वार्ता समजतील. जोडीदाराच्या उन्नतीमुळे कुटुंबात उत्साही वातावरण असेल. घर, जमीन, प्रॉपर्टी यांबाबत वारसदारांमध्ये भेटीगाठी व चर्चा, विचारविनिमय होतील. बाजाराच्या उतार-चढावाचा बारकाईने अभ्यास कराल आणि मगच गुंतवणूक कराल. तोटा होऊ देणार नाही. उष्णतेमुळे उत्सर्जन संस्थेचे आजार बळावतील. विशेष लक्ष द्यावे.