Ashwini Nakshatra In Vedic Astrology : ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रे आहेत. त्यातील ‘अश्विनी नक्षत्र’ हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील पहिल्या नक्षत्रांपैकी एक आहे; जे शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ‘अश्विनी’ हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. अश्व म्हणजे घोडा. अश्विनी नक्षत्राचा स्वामी ग्रह केतू आहे आणि तो मेष राशीशी संबंधित आहे; असे मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना चांगले आरोग्य, शिक्षण आणि त्यांच्या जीवनात नवनवीन गोष्टीची सुरुवात होते. तर आज आपण या लेखातून अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या स्त्री-पुरुषांचे स्वभाव, करिअर, जोडीदार आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊयात…
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या पुरुषांचा स्वभाव कसा असतो?
शारीरिक वैशिष्ट्ये – या नक्षत्रात जन्मलेल्या पुरुषांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. रुंद खांदे, मोठे नाक, जाड काळे केस ही त्यांची ओळख मानली जाते. त्यांच्या अवयवांमधील मोठे डोळे आणि स्पष्ट चेहऱ्यावरील रेषा त्यांचा लूक आणखीन आकर्षक करतात.
प्रेम आणि वैवाहिक जीवन – अश्विनी नक्षत्रात जन्मलेले पुरुष सहसा २८ वर्षांच्या वयानंतर लग्न करतात. जीवनसाथी निवडताना ते समजूतदारपणा आणि स्थिर नातं या गोष्टींना प्राधान्य देतात. लग्नानंतर ते चांगला नवरा आणि जबाबदार वडील आहेत हे सिद्ध करून दाखवतात.
करिअर – अश्विनी नक्षत्रात जन्मलेले पुरुष जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. पण, संगीत, कला आणि नृत्य क्षेत्रात त्यांच्या यशाची शक्यता आणखी जास्त आहे.
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रियांचा स्वभाव कसा असतो?
शारीरिक वैशिष्ट्ये – या नक्षत्रात जन्मलेल्या महिलांचे कपाळ रुंद, लांब नाक त्यांना आकर्षक बनवतात. लहान आणि चमकदार माशाच्या आकाराचे डोळे त्यांच्या सौंदर्यात आणखीन भर घालतात.
प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन – या नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रियांचे लग्न २३ ते २६ वर्षांपर्यंत होते. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते. पण, जर या महिलांचा प्रेम विवाह असेल किंवा त्यांनी लवकर लग्न केलं असेल तर त्यांच्या लग्नात समस्या येण्याची शक्यता जास्त असते.
करिअर – अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता असते. त्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. कठोर परिश्रमाने त्या आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन जगतात.
आरोग्य – या महिलांना मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय, गाडी चालवताना किंवा स्वयंपाकघरातील काम करताना त्यांना किरकोळ दुखापत होण्याची शक्यता असते.