Baba Vanga Predictions 2025: पुढील पाच वर्ष २०२५ ते २०३० हा काळ जगासाठी कसा असेल? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. भविष्य कोणी अचूक पाहिलं नाही, पण काही रहस्यमय लोकांनी केलेल्या भाकितांनी जगभरात भीती पसरवली आहे. यामध्ये सर्वात मोठं नाव आहे “बाल्कनची नास्त्रेदमस” म्हणून ओळखली जाणारी बुल्गारियाची रहस्यवादी बाबा वेंगा.
कोण होत्या बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला. मूळ नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोव्हा. वयाच्या १२व्या वर्षी एका प्रचंड वादळात त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर त्यांना भविष्य पाहण्याची गूढ शक्ती मिळाली, असा विश्वास आहे. इतक्या लहान वयात भविष्यकथन आणि उपचारांमुळे त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या सल्ल्यासाठी केवळ सामान्य लोक नव्हे, तर बुल्गारियाचा राजा बोरिस तिसरा आणि सोविएत नेता लिओनिद ब्रेझनेव्हसुद्धा जात होते. १९९६ मध्ये त्यांचं निधन झालं, पण आजही त्यांच्या भाकितांचा गूढ प्रवास सुरू आहे. ९/११ दहशतवादी हल्ला ते ब्रिटनमधील २०२२ च्या पुरापर्यंत अनेक भाकितं खरी ठरल्याचं सांगितलं जातं.
बाबा वेंगांच्या २०२५ ते २०३० मधील भविष्यवाण्या
- २०२५ – मानवतेच्या ऱ्हासाची सुरुवात
बाबा वेंगाने भाकीत केलं की, २०२५ मध्ये युरोपात मोठा संघर्ष उद्भवेल. युद्ध, दंगे, रक्तपात यामुळे खंड अस्थिर होईल. याच वर्षी भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा प्रचंड कहर होईल. या घटनांमुळे मानवतेच्या ऱ्हासाची पहिली पायरी सुरू होईल.
- २०२६ – तिसऱ्या महायुद्धाचा उद्रेक
२०२६ मध्ये तिसरं महायुद्ध सुरू होईल असं बाबा वेंगा म्हणाल्या होत्या. चीन तैवानवर ताबा मिळवण्यासाठी मोठा प्रयत्न करेल. त्याचबरोबर रशिया आणि अमेरिकेची थेट टक्कर होईल. या संघर्षामुळे जगभरात भीषण युद्ध पेटेल, ज्याला तिसरं महायुद्ध म्हटलं जाईल.
- २०२७ – सुपरह्यूमन युगाची सुरुवात?
वेंगांनी सांगितलं की, २०२७ मध्ये नवा आजार किंवा जैविक प्रयोग (biological experiment) समोर येईल, त्याच्या परिणामामुळे काही माणसांमध्ये “सुपरह्यूमन”सारखी लक्षणं दिसतील. काही जणं याला रासायनिक किंवा जैविक युद्धाचा परिणाम मानतात.
- २०२८ – नवं ऊर्जास्रोत आणि शुक्र ग्रहाची तयारी
२०२८ मध्ये माणसाला नवं, स्वच्छ आणि ताकदवान ऊर्जास्रोत सापडेल. हा ऊर्जास्रोत जगाचं रूप पालटून टाकेल. याच वर्षी शुक्र (Venus) ग्रहावर मोहिमेची तयारी होईल, म्हणजेच माणूस दुसऱ्या ग्रहावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होईल.
- २०२९ – जागतिक क्रांती
२०२९ मध्ये मोठी जागतिक क्रांती होईल. यामुळे जुनी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडून पडेल. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रस्थापित पद्धती नष्ट होतील आणि नवी व्यवस्था जगासमोर येईल.
- २०३० – हरित ऊर्जेकडे (Green Energy) मोठी झेप
२०३० पर्यंत जग “ग्रीन एनर्जी”कडे झेपावेल. प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवी तंत्रज्ञानं आणि संशोधनं विकसित होतील. हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होईल. पण, या बदलामागे जगाच्या जीवनशैलीत आणि व्यवस्थेत मोठी उलथापालथ दडलेली असेल.
तर मित्रांनो, या भाकितांनी भीतीदायक चित्र उभं केलं असलं तरी खरी वेळ आल्याशिवाय सत्य काय हे समजणार नाही. पण, इतकं नक्की – पुढील काही वर्ष जगासाठी सस्पेन्स, संकटं आणि परिवर्तन घेऊन येणार आहेत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)