Dhanteras 2025: १७ ऑक्टोबर २०२५ पासून वसुबारसेने दिवाळी सणाची उत्साहात सुरूवात झाली आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येत आहे. या दिवशी देवांचे वैद्य असणारे भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते आणि धान्याचीही पूजा केली जाते. तसंच अकाली मृत्यू टळावा यासाठी यमराजाची आठवण ठेवून यम दीपदानही केले जाते.
दिवाळीत उत्साहाच्या वातावरणात यमराजाची आठवण काढणं म्हणजे त्रासदायकच आहे. मात्र शास्त्रानुसार चालत आलेल्या काही परंपरांनुसार अकाली मृत्यू येऊ नये यासाठी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. यामागचे नेमके कारण काय, हे कसे केले जाते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…
धनत्रयोदशीच्या दिवशी अर्थात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी यमाचा दिवा लावला जातो. मृत्यूदेवता यमराजाच्या नावाने दिवा लावल्याने चांगले आरोग्य आणि यमराजाकडून आशीर्वाद मिळतात, तसंच कुटुंबात अकाली मृत्यू टळू शकतात असे म्हटले जाते.
यमदीपदान कसे करावे?
मृत्यूची देवता यमराज हा दक्षिण दिशेचा स्वामी आहे. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून दिवा प्रज्वलित केला जातो. हा दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी देवाजवळ, तुळशीजवळ, उंबरठ्यात, अंगणात दिवा लावून झाला की यमदीपदान करावे.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात यमराजासाठी दीपदान केले जाते. संध्याकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ७ वाजून ४ मिनिटांपर्यंत दीपदानाची वेळ आहे. या काळात तुम्ही कधीही दीपदान करू शकता.
धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान का करतात?
यमदीपदानाशी संबंधित एक पौराणिक कथा आहे. एकदा यमराजाने यमदूतांना विचारले, “तुम्ही रोज लोकांचे प्राण घेता, तुम्हाला कधीही कोणावर दया आली नाही का?” यमदूत म्हणाले, “पृथ्वीवर हेम नावाचा एक सुंदर राजकुमार होता. जन्मकुंडली पाहिल्यावर ज्योतिषांना कळले की, जेव्हा या मुलाचे लग्न होईल त्यानंतर ४ दिवसांनी त्याचा मृत्यू होईल. या भीतीने त्याच्या वडिलांनी त्याला सगळ्यांपासून लांब गुहेत ठेवून वाढवले. एके दिवशी राजा हंसाची मुलगी फिरत फिरत त्या गुहेत पोहोचली. राजकुमार तिला पाहून मोहित झाला आणि त्या दोघांनी गंधर्व विवाह केला.”
“लग्नाच्या चौथ्या दिवशीच राजकुमार हेमचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू पाहून नवविवाहित पत्नी जोरजोरात रडू लागली. त्या राजकुमाराचे प्राण घेताना आम्हाला खूप दु:ख झाले होते.” तेव्हा यमराज म्हणाले, “जर कोणी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी माझ्यासाठी दीपदान करेल, तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अकाली मृत्यूची भीती राहणार नाही.” तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी दीपदान करण्याची परंपरा चालत आली आहे.