Dhanotrayadashi 2022: दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदू धर्मानुसार हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. यंदा २२ व २३ ऑक्टोबर या दोन ही दिवशी धनत्रयोदशीची तिथी एकत्र आली आहे. यंदा २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच धनत्रयोदशीला दुर्मिळ योग जुळून आले आहेत. याच दिवशी शनि मार्गी होणार असून सर्वार्थ सिद्धी योगही तयार झाल्याचे दिसून येत आहे. धनोत्रयादशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीप दान करण्याची पद्धत आहे. यमदीप दान म्हणजे यमराजाला दिप म्हणजेच दिवा दान करणे. ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार दीप दान हे प्रदोष काळात केले जाते. यम दीप दान का करावे? कसे करावे व त्यामुळे नेमका काय लाभ होऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

धनत्रयोदशीला यम दीप दानाचे महत्त्व

पुराणातील संदर्भांनुसार असं म्हणतात की, एकदा दूताने आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी काय करावे असा प्रश्न यमाला विचारला होता, यावर यमाने उत्तर देत जो कोणी मनुष्य दिवाळीच्या धनतंरयोदशीच्या तिथीवर दीप दान करेल त्याला अचानक मृत्यू येणार नाही असे उत्तर दिले होते. याच आख्यायिकेनुसार, धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरात दीप प्रज्वलित करून यमाला दान केले जाते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुखी, सुरक्षित, निरोगी राहो यासाठी यमराजाला दिवा दान करणे शुभ मानले जाते.

यम दीप दान पूजा विधी

पौराणिक कथांनुसार यम दीप दानाच्या मुहूर्तावर घराच्या दक्षिण बाजूस दिवा लावणे शुभ मानले जाते. पुराणातील मान्यतांनुसार दक्षिण ही यमाची बाजू म्हणजेच यम ज्या बाजूने येतो अशी ओळखली जाते . यम दीप दानाच्या निमित्ताने दक्षिणेकडे दीप प्रज्वलित केल्यास यम प्रसन्न होऊन आल्या पावली मागे निघून जातो अशी यामागची मान्यता आहे.

यम दीप दान मंत्र

यमदीपं बहिर्दद्यादप मृत्युर्विनिश्यति।

धनत्रयोदशी व यम दीप दान शुभ मुहूर्त

यंदा धनत्रयोदशीची तिथी ही २२ ऑक्टोबरलाच सुरु होत आहे. २२ ऑक्टोबर संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर २०२२ च्या संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत धनत्रयोदशीच्या तिथी असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण २२ किंवा २३ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सुद्धा यम दीप दान करू शकता. संध्याकाळी सात वाजताची म्हणजेच दिवेलागणीची वेळ यासाठी शुभ ठरू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)