Diwali 2026 Date: हिंदू धर्मात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक सणाचे खास महत्त्वदेखील आहे. त्यात दिवाळी हा अनेकांच्या आवडीचा आणि सर्वांत मोठा सण आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. नुकतीच २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी पार पडली. संपूर्ण भारतात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण आनंद आणि उत्साहाने पार पडला. दिवे, रांगोळ्या, फुलांची सजावट, फटाके, फराळ अन् उटण्याच्या सुगंधाने वातावरणात सकारात्मकता पसरली. दरम्यान, आता येणाऱ्या नव्या वर्षात दिवाळी नक्की कोणत्या तारखेला साजरी केली जाईल? हे आपण जाणून घेऊया

२०२६ मध्ये दिवाळी कधी साजरी केली जाणार?

२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असून, अनेक जण नव्या वर्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. नव्या वर्षात दिवाळी नोव्हेंबरमध्ये असेल. ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी असेल. त्याच दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. तसेच १० नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा व ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी दिवाळी १८ दिवस उशिरा असेल.

२०२६ मध्ये दिवाळी उशिरा का?

हिंदू धर्मात प्रत्येक तीन वर्षांनंतर अधिक मास लागतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, असेही म्हटले जाते. २०२६ मध्ये ज्येष्ठ महिन्यात अधिक मास लागणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी फक्त दिवाळीच नाही. इतर सणदेखील यंदाच्या तुलनेत उशिरा साजरे होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)