Anant Chaturdashi 2025: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला खूप महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेमधील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. साधारणतः गणेश विसर्जनाचा दिवस म्हणून या सणाची ओळख असली तरी या दिवशी भगवान विष्णू यांच्या स्मरणाचे विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षी अनंत चतुर्दशीचा सण शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. हा दिवस भगवान श्री विष्णूच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

अनंत चतुर्दशी २०२५ तिथी

चतुर्दशी तिथी सुरुवात: ६ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ०३ वाजून १२ मिनिटांपासून
चतुर्दशी तिथी समाप्त: ७ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून १२ मिनिटांपर्यंत

अनंत चतुर्दशी २०२५ पूजा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, अनंत चतुर्दशीला श्री विष्णूची पूजा करण्यासाठी सकाळी ६ वाजून ०२ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ४१ मिनिटांपर्यंतची वेळ शुभ आहे.

अनंत चतुर्दशी २०२५ पूजा विधी

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • त्यानंतर श्री विष्णूचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी.
  • चौरंग किंवा पाटावर पिवळे वस्त्र टाकून श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटोची प्राणप्रतिष्ठा करावी. त्यासह तांब्याचा कलश, तुपाचा दिवा, धूप ठेवावा.
  • अनंत सूत्र (धागा) तयार करावा., त्यासाठी एका धाग्याला १४ गाठी मारून, त्याला हळद आणि केशर लावावे.
  • पूजेला सुरुवात झाल्यावर मूर्तीला तुळस,गंध, फुले, फळे यांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यासह तयार केलेल अनंत सूत्रही अर्पण करावे.
  • श्री विष्णू सहस्रनामाचा जप करून शेवटी आरती करून घ्यावी.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व

आपल्याकडे अनंत चतुर्दशी या सणाची गणेश विसर्जनाचा दिवस म्हणून ओळख असली तरी त्या दिवशी भगवान विष्णू यांच्या स्मरणाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार अनंत चतुर्दशीचे मूळ महाभारतात आहे. हा दिवस भगवान विष्णूचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भुवास, स्वर, महास, जनास, तपस, सत्य, अटल, विटाळ, सुतला, रसातला, तलातल, महातला आणि पाताळ असे १४ जग ईश्वराने निर्माण केले. त्यांचे पालन करण्यासाठी भगवान विष्णूने या जगात १४ वेगवेगळे अवतार घेतले आणि त्यामुळे भगवान विष्णूला अनंत या नावानेही ओळखले जाऊ लागले. हे सर्व जग आणि त्याच्या निर्मितीचे जतन करण्यासाठी भगवान विष्णूच्या या अवतारांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे अनंत चतुर्दशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.