Mangal Gochar 2025: कन्या राशीत मंगळाचं गोचर २८ जुलै सोमवार रात्री ८:११ वाजता होणार आहे. मंगळ १३ सप्टेंबर रात्री ९:३४ वाजेपर्यंत कन्या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, उत्साह, धैर्य, राग आणि कामात कुशलता यांचे प्रतीक मानले जाते. २८ जुलैला जेव्हा मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा दिसून येईल.
कन्या रास ही व्यवहारिकता, विश्लेषण क्षमता आणि सेवा भावनेची रास आहे. मंगळ जेव्हा या राशीत असतो, तेव्हा माणसाचे लक्ष छोट्या-छोट्या कामांवर, आरोग्यावर आणि कामाच्या बारकाव्यांवर अधिक केंद्रित होते. या काळात लोक आपापल्या कामात अधिक व्यस्त राहू शकतात आणि लहान-सहान गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करण्याकडे त्यांचा कल वाढतो.
या मंगळाच्या गोचरामुळे ५ राशींना विशेष फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींवर मंगळ गोचरचा शुभ प्रभाव होणार आहे.
मेष (Aries Horoscope)
कन्या राशीत मंगळाच्या गोचरामुळे मेष राशीच्या लोकांच्या सहाव्या भावावर परिणाम होईल. मंगळामुळे त्यांच्यात धैर्य आणि पराक्रम वाढेल. हा काळ शत्रूंवर, कर्जावर आणि आजारांवर मात मिळवण्यासाठी मदतीचा ठरू शकतो. स्पर्धांमध्ये यश मिळू शकते, पण आरोग्याची काळजी घ्या. कायदेशीर बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer Horoscope)
मंगळ कर्क राशीच्या तृतीय भावात गोचर करेल. मंगळाच्या या गोचरामुळे तुमचं धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात प्रवास होऊ शकतात आणि कामात गती येईल. लेखन आणि संवाद क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल. पण लहान भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या बाबतीत थोडं लक्ष द्या.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
मंगळाचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलीतील एकादश म्हणजेच ११व्या भावात होईल. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. मित्रांकडून साथ मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
धनु (Sagittarius Horoscope)
मंगळाचा गोचर धनु राशीच्या कुंडलीतील दहाव्या भावात होईल. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कामाच्या क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. पण २८ जुलै ते १३ सप्टेंबर दरम्यान तुम्हाला अहंकारापासून सावध राहावं लागेल, नाहीतर वाद होण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn Horoscope)
मंगळाचं गोचर मकर राशीच्या नवव्या भावात होणार आहे. २८ जुलैपासून मंगळाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. नशिबाची साथ मिळेल. धर्म, प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. वडील किंवा गुरूंसोबतचे संबंध सुधारू शकतात. जुलै ते सप्टेंबर या काळात तुमची आध्यात्मिक आवड वाढू शकते.