Nag Panchami 2025 Date Puja Muhurat Rituals and Significance: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेक जण व्रत-उपासनादेखील करतात. हा महिना महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात श्रावणी सोमवारी अनेक जण महादेवाची पूजा-आराधना करतात. तसेच या महिन्यात नागपंचमी, कृष्णाष्टमी, रक्षाबंधन हे सणही साजरे केले जातात. यंदा २९ जुलै २०२५ रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल. त्या दिवशी देशभरात नागदेवतेची पूजा केली जाते.

नागपंचमीची तिथी

नागपंचमीची तिथी सोमवार, २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवार, २९ जुलै रोजी रात्री १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार मंगळवार, २९ जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल.

नागपंचमीचे शुभ मुहूर्त

२९ जुलै रोजी नागपंचमी साजरी करण्याचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील.

सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपासून ते १० वाजून ५५ पर्यंत असेल.

सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ पर्यंत असेल.

दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपासून ते ०२ वाजून ११ मिनिटांपर्यंत असेल.

दुपारी ०३ वाजून ४९ मिनिटांपासून ते ०५ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.

या शुभ मुहूर्तांवरही तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता.

नागाला देव स्वरूप का मानले जाते?

पौराणिक कथांनुसार, हिंदू धर्मात नागाला देव स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. कारण- महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे; तर श्री विष्णूदेखील शेषनागावर विश्राम करतात. त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते. तसेच नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कालसर्पदोषातून मुक्तीही मिळते, असे म्हटले जाते.

नागपंचमीचे महत्त्व

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया, पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी हे नागस्तोत्रदेखील म्हटले जाते.

अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।

नागपंचमी पूजा विधी

या दिवशी लाकडी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून, त्यांची पूजा केली जाते. नागाला कच्चे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून, त्याची पूजा करतात. हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहत नाही, अशी परंपरागत श्रद्धा आहे.

नागपंचमीची आख्यायिका

श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तसेच आणखी इतरही प्रसिद्ध आख्यायिका आहेत. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. त्याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्वही वेगळे आहे. नागपंचमीदिनी नवनागांचे स्मरण केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)