November Horoscope For Zodiac Signs : नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण-उत्सव असणार आहेत. या महिन्याची सुरुवातच ‘देवउठनी एकादशी’ने होते आहे. देवउठनी एकादशीच्या दिवसापासून लग्न आणि इतर शुभ कार्यांना सुरुवात होते. देवउठनी एकादशी, तुळशी विवाह, देवदिवाळी, संकष्टी चतुर्थी तर गुरू कर्क राशीत प्रवेश करणार आहे; असे महत्त्वाचे दिवस या महिन्यात येणार आहेत. तर, हा महिना तुमच्या राशीसाठी कसा असणार? कोणत्या महत्त्वाच्या दिवसाचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होणार? प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊयात…

मेष

खर्चाला वेळेवर आळा घातला नाहीत, तर महिन्याचा जमाखर्च कोलमडून पडेल. सावधगिरी बाळगा. नोकरी व व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. विद्यार्थिवर्गाने सणवाराच्या जल्लोषामधून आता बाहेर यावे. अभ्यासात एकाग्रता महत्त्वाची आहे. जमीनजुमल्याचे खटले थोड्या प्रमाणात मार्गी लागतील. विवाहोत्सुकांकडून शुभ वार्ता समजतील. ११ नोव्हेंबरपासून गुरू कर्क राशीत वक्री होणार आहे. मार्गी लागलेली काही कामे लांबणीवर पडतील. आळस भरणे, पोट जड होणे, असे त्रास होण्याची शक्यती आहे. देवदिवाळीच्या सुमारास कामाचा ताण सुसह्य होईल.

वृषभ

आपल्या माणसांसाठी घेतलेले कष्ट कामी येतील. इतरांच्या दृष्टीने कदाचित तो वेळेचा अपव्यय असला तरी आपल्या मनाला समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. अचूकता आणि नेमकेपणा अंगी बाणवाल. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी अतिउत्साहात जास्तीच्या जबाबदार्‍या स्वीकारू नका. तसे केल्यास पुढच्या गोष्टी कठीण होतील. विवाहोत्सुकांचे योग चांगले आहेत. देवदिवाळीच्या आसपास जोडीदारासह कौटुंबिक समारंभात मानाचे स्थान मिळेल. प्रॉपर्टी व स्थावर इस्टेटीची कागदपत्रे बारकाईने तपासावी लागतील. मूत्रविकार, चक्कर येणे, उलट्या होणे, असे त्रास संभवतात. वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावे लागतील. इतरांची शुश्रूषा करताना स्वतःचीदेखील काळजी घेणे किती आवश्यक आहे याची जाणीव होईल.

मिथुन

बौद्धिक आणि कलात्मकतेचा सुवर्ण संगम या महिन्यात होणार आहे. नव्या संकल्पना अमलात आणताना तंत्रज्ञान उपयोगी पडेल. विद्यार्थिवर्गाच्या दृष्टीने अभ्यासासह इतर आवडीच्या विषयातही रस घ्याल. अभ्यासाचा ताण न घेता, वेळापत्रकानुसार विषयांची आखणी कराल. ११ नोव्हेंबरला गुरू वक्री होईल. नोकरी-व्यवसायातील राजकारणात फसू नका. व्यवहार ज्ञान आणि तार्किक ज्ञान जागरूक ठेवा. देवदिवाळी ते चंपाषष्ठी हा कालावधी अधिक सतर्क राहण्याचा आहे. विवाहोत्सुकांनी वधू-वर संशोधन सुरू ठेवावे. योग जुळून येतील. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना मिळेल. दुसऱ्यावर सर्वतोपरी विश्वास टाकणे योग्य नाही. घराच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवहार सांभाळून भावनिक समतोल साधाल. पोट बिघडणे, आतड्याला संसर्गबाधा होणे, असे त्रास संभवतात.

कर्क

एकंदरीत वर्षभराचा आढावा घेणारा हा महिना असेल. कोणाची देणी-घेणी बाकी ठेवू नका. गुरुबल चांगले असल्याने रेंगाळलेल्या कामांना चालना मिळेल. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. विद्यार्थिवर्गाची चंचलता वाढेल. त्यामुळे त्यांना प्रयत्नपूर्वक अभ्यासावर मन एकाग्र करावे लागेल. उच्च शिक्षणासाठी पुढील प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात मिळणारी चांगली संधी दवडू नका. स्वतःहून प्रयत्न केले, तर यश नक्की मिळेल. विवाहितांनी टोकाची भूमिका घेऊ नये. कुटुंबातील ज्येष्ठांचा आधार वाटेल. देवदिवाळी ते चंपाषष्ठी यादरम्यान जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. ओळखीचा फायदा होईल. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना म्हणजे अतिरिक्त आत्मविश्वास चांगला नाही. थोडा धीर धरावा. पोट, आतडी, गर्भाशय यासंबंधात तक्रारी निर्माण होतील.

सिंह

स्वस्थ बसून कोणतेही काम पूर्ण होणार नाही. हातपाय हलवलेत, तरच परिस्थितीतून तरून जाल. हे दाखवून देणारा हा महिना आहे. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. विद्यार्थिवर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. नोकरी-व्यवसायात देवदिवाळी ते चंपाषष्ठी यादरम्यान मोठा लाभ होईल. दुर्मीळ संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढतील. लाड आणि प्रेमासह शिस्तीचे धडे त्यांना द्याल. सुव्यवस्था आणि नेटकेपणा आपणास नेहमीच भावतो. घर, प्रॉपर्टीचे कोर्टातील काम थोडे लांबणीवर पडेल. गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. आरोग्य सुधारेल.

कन्या

आर्थिक उन्नत्ती आणि उत्कर्ष करणारा असा हा महिना असेल. गुरुबल उत्तम असले तरी ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. विद्यार्थिवर्गाला आता धरसोड वृत्ती बाजूला सारावी लागेल. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. नोकरी-व्यवसायात कोणाचे चूक व कोणाचे बरोबर हे बघण्यापेक्षा सत्याची बाजू स्वीकाराल. देवदिवाळी ते चंपाषष्ठीपर्यंत महत्त्वाच्या आर्थिक उलाढाली पूर्ण होतील. विवाहोत्सुकांना सुयोग्य जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांना संततीप्राप्तीचा योग आहे. घराचे काम काही कारण नसतानाही लांबणीवर जाईल. गुंतवणूकदारांनी थोडे धीराने घ्यावे. हवामानातील अनपेक्षित बदलामुळे त्वचाविकार बळावतील. औषधोपचार घेण्याशिवाय पर्याय नाही.

तूळ

आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणारा, भविष्याकडे दूरदृष्टीने बघणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी सचोटीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. संयमाने वागतील. परदेशातील उच्च शिक्षणात यश मिळवतील. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. देवदिवाळी ते चंपाषष्ठी या कालावधीत आत्मविश्वास बळावेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. नोकरी-व्यवसायात आपल्या विचारांचा प्रभाव पडेल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित मंडळींना जोडीदाराचा सहवास सुखकर होईल. एकमेकांसाठी आपल्या आवडी-निवडी बाजूला ठेवाल. प्रॉपर्टीचे रेंगाळलेले काम मार्गी लागेल. गुंतवणुकीत जोखीम पत्करणे धोक्याचे ठरेल. छाती आणि घसा यांचे आरोग्य सांभाळा. प्रदूषणाचा त्रास होईल.

वृश्चिक

खर्चाचे प्रमाण आटोक्यात ठेवावे. लहान-मोठ्या गोष्टींवरून रागावणे आपल्या हिताचे नाही. विद्यार्थी वर्गाला अनुकूल ग्रहमान आहे. अभ्यास, मेहनत, सातत्य व सचोटी या चतुःसूत्रीचा उत्तम लाभ होईल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाची विशेष मदत होईल. प्रवास योग संभवतो. नवनवीन अनुभवातून बरेच काही शिकता येईल. देवदिवाळी ते चंपाषष्ठी या कालावधीत प्रॉपर्टीच्या विषयात बोलणी होतील. सर्वांच्या हिताचा निर्णय घ्याल. विवाहित दाम्पत्यांची त्यांच्या कामकाजात प्रगती होईल. अभ्यासपूर्वक आणि भविष्याचा विचार करून केलेली गुंतवणूक अतिशय लाभकारक ठरेल. भूलथापांना फसू नका. उत्सर्जन संस्थेची संसर्गबाधा आणि स्नायुबंधांची कमजोरी यांकडे विशेष लक्ष द्यावे. डॉक्टरी उपाय, इलाज घ्यावे लावतील.

धनू

लहान-मोठे प्रवास योग देणारा आणि गैरसमज दूर करणारा, असा हा महिना असेल. मनावरचे ओझे कमी होईल. विद्यार्थिवर्गाला आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. अनेक प्रलोभनांमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल, तरीही प्रयत्न सोडू नका. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होत आहे. नोकरी-व्यवसायात त्रस्त होऊन नोकरीबदलाचा विचार कराल; परंतु सध्या हे योग नाहीत. हिमतीने टिकून राहणे आणि स्वतःला सिद्ध करणे इतकेच आपल्या हाती आहे. देवदिवाळी ते चंपाषष्ठी या शुभ काळात मनोबल वाढेल. विवाहित मंडळींनी एकमेकांचे विचार व भावना समजून घ्याव्यात. कौटुंबिक प्रश्नांना अधिक प्राधान्य द्याल. प्रॉपर्टीसंबंधी तज्ज्ञांकडून सल्ला घ्याल. वाहनखरेदी लांबणीवर पडेल. सांधेदुखी, पेटके येणे यांमुळे त्रस्त व्हाल आणि योग्य औषधोपचार घ्यावा.

मकर

ठरवल्याप्रमाणे गोष्टी होत गेल्या की, हुरूप वाढतो आणि पुढची कामेदेखील मार्गी लागतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्याल. विद्यार्थ्यांनादेखील आपल्या गुणपत्रिकेवरून हे दिसून येईल. अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी ढळू देऊ नका. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त लहान-मोठे प्रवास कराल. वैचारिक देवाण-घेवाण होईल. कलात्मक व सर्जनशील गोष्टींमध्ये मन रमेल. देवदिवाळी ते चंपाषष्ठी यादरम्यान आनंद वार्ता समजेल. कष्टाचे चीज होईल. विवाहोत्सुकांच्या विवाहासंबंधी चर्चा सुरू होतील. विवाहित दाम्पत्यांना थोडी तडजोड करावी लागेल. एकमेकांतील समजूतदारपणा नाते दृढ होण्यास कामी येईल. घराच्या, प्रॉपर्टीच्या कामकाजात हालचाली वाढतील. आशेचे किरण दिसतील. गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. लाभकारक बदल अनुभवाल. पोट, पचन आणि वातविकार बळावतील. सांधेदुखी डोके वर काढेल. वैद्यकीय सल्ला आणि उपचार वेळेवर घ्यावेत.

कुंभ

आपली तत्त्वे, आपले नियम काटेकोर पाळणे व त्रासदायक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हे या महिन्यात अत्यंत आवश्यक वाटेल. विद्यार्थ्यांचे शंकानिरसन उत्तम प्रकारे होईल. शिक्षक, मार्गदर्शक योग्य दिशा दाखवतील. वेळेचा सदुपयोग कराल. नोकरी-व्यवसायात आपल्यातील गुणांना चांगला वाव मिळेल. सर्वांच्या हिताचे निर्णय घ्याल. विवाहितांना नातेवाईक, मित्र परिवार यांचे साह्य व पाठिंबा मिळेल. प्रवास योग चांगले आहेत. देवदिवाळीच्या सुमारास शुभ वार्ता समजेल. घराचे व्यवहार, प्रॉपर्टीचे काम गतिमान होईल. तज्ज्ञांचा योग्य सल्ला मिळेल. परदेशातील कामे मार्गी लागतील. गुंतवणूकदार उत्तम परतावा मिळवतील. फक्त निष्कळजीपणा टाळा.

मीन

सेवा कराल, तर मेवा खाल, असा अनुभव देणारा हा सुखद महिना असेल. अडचणी, समस्या, विलंब यांतून सुटकेचा श्वास घ्याल. विद्यार्थिवर्गाचा आत्मविश्वास वाढेल. अभ्यासात विशेष रस घ्याल. याचा परिमाण नक्कीच हितावह असेल. नोकरी-व्यवसायाचा व्याप वाढेल. जबाबदारीत भर पडेल. तरीही सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे निभावून न्याल. कामानिमित्त प्रवास कराल. तसेच जोडीदारासह प्रवास योग आहे. सहवास सुखकर असेल. कुटुंबात देवदिवाळी ते चंपाषष्ठी यादरम्यान शुभ वार्ता समजेल. इस्टेटीबाबत बोलणी सकारात्मक होतील. घाई न करता, विचारपूर्वक मत मांडावे. गुंतवणूकदारांना नव्या संधी खुणावतील. पळत्यापाठी न लागता, शाश्वत व सुरक्षित गुंतवणूक करावी. रक्तदाब, मधुमेह व पायाची दुखणी आटोक्यात येतील. आहार, विहार, पथ्य व व्यायाम यांकडे विशेष लक्ष द्याल.

तर असा १२ राशींचा नोव्हेंबर महिना असणार आहे.