People Blessed by Saturn in Numerology: अंकज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचं गणित नाही, तर आपल्या स्वभाव, भविष्य आणि नशिबाचं गुपितही त्यात दडलंय. जशी प्रत्येक नावामागे एक विशिष्ट राशी असते, तसाच प्रत्येक जन्मतारखेच्या मागे एक मूलांक असतो. प्रत्येक मूलांकाचा संबंध विशिष्ट ग्रहाशी जोडलेला असतो. विशेषतः मूलांक ८ हा शनी देवाचा अंक मानला जातो आणि याच मूलांकावर शनी देवाची विशेष कृपा असते. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला कर्माचा फलदाता आणि न्याय देवता, असं म्हटलं आहे. शनी देव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ आणि दंड देतो. 

तुमचा मूलांक जाणून घेणं खूप सोपं आहे. फक्त तुमची जन्मतारीख घ्या आणि तिचे सर्व अंक एकमेकांत मिळवा, जो एकांक असेल, तोच तुमचा मूलांक! उदाहरणार्थ- ८, १७ व २६ या तारखांना जन्मलेल्यांचा मूलांक ८ येतो (८, १ + ७ = ८, २ + ६ = ८).

जन्मतारीख ८

जे लोक ८ तारखेला जन्मतात, त्यांच्यामध्ये असतो एक आगळा आत्मविश्वास आणि ऊर्जा. मूलांक ८ असणारे लोक त्यांच्या कर्मावर प्रचंड विश्वास ठेवतात. हे लोक नशिबावर नाही, तर आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कठोर परिश्रम करीत स्वजीवन घडवतात. हे लोक कठीण प्रसंगीही डगमगत नाहीत. आपल्या ध्येयांवर ते इतकं लक्ष केंद्रित करतात की, त्यांना यश मिळणं अटळ असतं. शनी देवाची कृपा त्यांच्या पाठीशी असते आणि म्हणूनच वेळ लागला तरी त्यांना निश्चित यश मिळतं.

जन्मतारीख १७

या तारखेला जन्मलेले लोकसुद्धा शनिदेवांच्या विशेष कृपेने भरलेले असतात. त्यांना प्रवासाची विशेष आवड असते आणि त्यांच्या विचारांमध्ये कमालीची स्पष्टता असते. हे लोक मेहनती असतात; मात्र त्यांच्या कामाचा वेग थोडा संथ असतो. पण, त्यांनी एकदा का काम सुरू केलं की, मग ते काम पूर्ण करूनच थांबतात. या मूलांकाच्या व्यक्तींची आर्थिक बाजूही भक्कम असते. ते केवळ पैसे कमवण्यातच कुशल नसतात, तर योग्य खर्च व बचत यांचेही उत्तम नियोजन करतात. त्यामुळे त्यांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतं.

जन्मतारीख २६

२६ तारखेला जन्मलेले लोक अतिशय संयमी असतात आणि आर्थिक व्यवहारात हुशार असतात. त्यांना अनावश्यक खर्च आवडत नाही आणि प्रत्येक निर्णय ते फार विचारपूर्वक घेतात. जरी यश उशिरा मिळालं तरी ते ठाम आणि स्थिर असतं. हे लोक दिखाव्यापेक्षा वास्तवावर जगतात आणि पैशांच्या बाबतीत अतिशय समजूतदार असतात. प्रचंड पैसे कमावतात.

अशा व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष तर असतोच; पण त्याचबरोबर शनी देवाची अमूल्य कृपाही त्यांच्यावर असते. ही कृपा त्यांना यश, सन्मान, आर्थिक स्थैर्य व समाजात प्रतिष्ठा मिळवून देते. तुमचं नशीब शनी देवाच्या हातात आहे का? जर तुमची जन्मतारीख ८, १७ किंवा २६ असेल, तर हे समजून घ्या की, तुमच्या वाट्याला मोठं यश, पैसा आणि समाजात मानमरातब येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)