Shani Vakri in Pisces: ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला ‘न्यायाधीश’ मानलं जातं. कर्मानुसार फळ देणारा कठोर; पण न्यायप्रिय ग्रह. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल, तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख-समाधान यांचा चांगला लाभ होतो. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्त्व आहे. अशा शनी देवाची उलटी चाल म्हणजे वक्री स्थिती आणि तीही मीन राशीत व श्रावण महिन्यात असल्याने याला फारच खास महत्त्व आहे. १३ जुलै २०२५ रोजी रविवारी सकाळी ९:४० वाजता शनी मीन राशीत वक्री होत आहे आणि तो पुढील १३९ दिवस (२८ नोव्हेंबरपर्यंत) या स्थितीत राहणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. पण, शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा तो अनेक राशींवर परिणाम करतो. कारण शनीचं वक्री होणं हे शुभ मानलं जात नाही. पण, शनी सर्वांसाठी अशुभ असेलच असं नाही. या दरम्यान शनी काही राशींसाठी शुभ देखील ठरणार आहे. शनीची ही उलटी चाल संपूर्ण १२ राशींवर प्रभाव टाकणारी असली तरी पाच राशींना त्याचा मोठा लाभ मिळणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. शनीच्या कृपेने काही राशींचे लोक खूपच श्रीमंत होण्याची चिन्हे आहेत. आज आपण शनी वक्री झाल्यानंतर कोणत्या राशींच्या लोकांच्या नशिबाला कशी कलाटणी मिळू शकते ते पाहूया …
शनीच्या वक्री गतीनं ‘या’ राशींचं नशीब फळफळणार!
१. मेष
वक्री शनीमुळे मेष राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे त्यांना व्यवसायात वाढ, आर्थिक गती मिळून, मानसिक समाधान मिळेल. नोकरीत पदोन्नती, वाद मिटणे आणि जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी आपले दार ठोठावू शकतात. या काळात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अपार संपत्तीचे धनी होऊ शकता.
२. कन्या
शनीच्या कृपेने कन्या राशीचे अडथळे दूर होतील. या राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश, ऑफिसमध्ये नाव आणि कौटुंबिक शांतता लाभेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही शत्रूंवर मात कराल आणि तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो. घरात सुख-शांती नांदून जोडीदाराबरोबर चांगले क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.
३. धनू
शनीच्या वक्री स्थितीमुळे धनू राशीच्या आयुष्यात स्थिरता येईल. आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रगती होईल. आर्थिक सुधारणा, संततीचे स्वास्थ्य उत्तम आणि दाम्पत्य जीवनात गोडवा निर्माण होऊ शकतो. सर्व प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. वाहन व मालमत्तेमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते.
४. मकर
कामात प्रतिष्ठा, सहकाऱ्यांकडून प्रशंसा व आत्मविश्वासात वाढ. शनीदेवाच्या कृपेने मानसिक शांती आणि घरगुती प्रश्न सुटतील. प्रकृतीही उत्तम राहील. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. पैसा आणि करिअरच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. नोकरदार लोकांसाठी हा काळ भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.
५. कुंभ
शनि कुंभ राशीचे स्वामी असून, या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात. गुंतवणुकीतून फायदा, मानसिक व शारीरिक बळ आणि मोठ्या प्रयत्नांना यश मिळू शकते. उद्योगधंद्यात, नोकरीत आपण आखलेल्या योजनांची पूर्तता होण्याचे प्रसंग अनुभवू शकाल. आर्थिक स्थितीही चांगली राहून, तुम्ही या काळात पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. वाहन खरेदीचे योगही आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)