उदयराज साने
या जगात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याबरोबर पूर्वजन्मीचे प्रारब्ध घेऊन येते. या प्रारब्ध आणि कर्मांवरूनच त्या व्यक्तीचा वर्तमान आणि भविष्यकाळ ठरवला जातो. असं म्हणतात, आपण जे कर्म करतो, त्याचे फळ आपल्याला मिळाल्या शिवाय राहत नाही. आताच्या युगातही आपण करत असलेल्या कर्माचे चांगले-वाईट परिणाम लगेच फेडावे लागते, हे वाक्य आजपर्यंत तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेल. आता असंच काही पाकिस्तानबरोबरदेखील घडणार आहे.
आजवर पाकिस्तानने अनेकदा भारताविरोधी अनेक कट रचून बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले घडवून आणले. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे शेकडो भारतीय सैनिक शहीद झाले. पहलगाम हल्ल्यात पर्यटकांनाच लक्ष्य करण्यात आले. याआधी अनेकदा पाकिस्तानच्या क्रूर कृत्याकडे भारताने दुर्लक्ष्य केले होते. बालाकोटचा एअर स्ट्राईक हा अपवाद होता. पण, आता येणाऱ्या काळात पाकिस्तानला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा मिळणार आहे. या लेखात पाकिस्तानच्या कुंडलीचा अभ्यास करून येणारा काळ पाकिस्तानसाठी कसा जाईल याबाबत मी भविष्य वर्तवले आहे.
पाकिस्तानचे भविष्य कसे असणार?
१४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानचे नक्षत्र आर्द्रा असल्यामुळे या देशाने कायम भारत विरोधी भूमिका बजावली आहे. त्यामुळेच तो सातत्याने भारतविरोधी कटकारस्थान रचून अनेक दहशतवादी हल्ले घडवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो. पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या देशांमधील संबंध खूप ताणले गेले. त्यामुळे आता भारताला पाकिस्तानच्या कृत्याचे उत्तर द्यावेच लागेल. आजचे ऑपरेशन सिंदूर हे त्याचेच प्रत्युत्तर आहे.
कर्मदाता शनी देणार पाकिस्तानला वाईट कृत्याची शिक्षा
ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हटले जाते. तो प्रत्येकाला वेळोवेळी त्याच्या वाईट कर्माची शिक्षा देतो. २९ एप्रिल २०२५ रोजी शनीने मीन राशीत प्रवेश केला असून सध्या मीन राशीत असलेला शनी पाकिस्तानला अत्यंत वाईट फळ देईल. हा शनी पाकिस्तानच्या कुंडलीतील चंद्र आणि मंगळाच्या केंद्रात मीनेचा असणार आहे, शिवाय हा पुढील काही महिने याच अवस्थेत राहणार असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत पाकिस्तानचा पराभवच होत राहील.
पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांसाठीही अडचणीचे
भारताबरोबर होणाऱ्या आगामी युद्धातून पाकिस्तानचे ‘न भुतो न भविष्यति’ असे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कारण, पाकिस्तानच्या कुंडलीत सत्ताधाऱ्यांचा सत्ताभंग योगदेखील आहे आणि म्हणून सध्याचे सर्व सत्ताधीश पराभूत होतील. पाकिस्तानची आणखी एक किंवा दोन विभाजनंदेखील अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टीने पाकिस्तानला ते फळ निश्चित मिळेल.
हा मीनेतील शनी २०२५ मध्ये केवळ ७ अंश पुढे जाईल आणि त्यानंतर तो पुन्हा शून्य अंशापर्यंत मागे येईल. हा मीनेतील शनी पाकिस्तानच्या मंगळ, हर्षल आणि चंद्र या तिन्ही ग्रहांच्या केंद्रात म्हणजेच अशुभ योगात असल्यामुळे पाकिस्तानचे ‘न भूतो न भविष्यति’ असे नुकसान होईल. आता मोठा सत्ताभंग आता सुरू झाला असून या सत्ताभंगातून पाकिस्तान आता कोणीही वाचू शकत नाही, असे खेदाने नमुद करावे लागते.
डिसेंबरच्या शेवटपर्यंत पाकिस्तानचे विघटन?
आता इथून पुढे पाकिस्तानचे विघटन हे अपेक्षित असून पाकिस्तानच्या कुंडलीतील चतुर्थात शनी, प्लुटो असून मार्केश शुक्र त्यांच्याबरोबर आहे. मकर राशीतील प्लुटो विरुद्ध पाकिस्तानच्या मूळ कुंडलीतील शनी आणि शुक्र असल्यामुळे आता पाकिस्तानचे विघटन हे अटळ असल्याचे दिसून येते. एकूणच विकलांग असलेला पाकिस्तान हा आता आणखी दुबळा झाल्याचे चित्र डिसेंबरच्या अखेरीस दिसेल.