Shardiya Navratri 2025: हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये देवीच्या ९ विविध रूपांची पूजा-आराधना केली जाते. यंदा सोमवार, २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार असून बुधवार, १ ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. यंदा तृतीया तिथी दोन दिवस असल्याने नवरात्र १० दिवसांची असेल तसेच २ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. दरम्यान, भारतामध्ये नवरात्रीच्या दिवसात घटस्थापना केली जाते. दररोज विविध फुलं, पानांची माळ देवीला अर्पण केली जाते. शिवाय अखंड दिवादेखील प्रज्वलित केला जातो. परंतु, यामागे नेमके काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊ..

नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते?

हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. दिव्याचा प्रकाश उन्नतीचे प्रतीक असून दिव्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबात आनंद, समाधान, समृद्धी प्रदान करतो असा यामागचा हेतू आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण ९ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते, कारण अखंड ज्योतीला साक्षात आदिशक्ती स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

अखंड ज्योत लावण्याचे नियम

  • जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तर तेव्हा तो दिवा योग्य जागी लावा. वास्तूनुसार हा दिवा देवघराजवळ किंवा उत्तर, पूर्ण, ईशान्य दिशेला लावा.
  • अखंड दीप लावत असाल तर घरात संपूर्ण नवरात्र मांसाहार करू नये.
  • अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विझू देऊ नका, कारण हे अशुभ मानले जाते. दिवा विझू नये म्हणून काचेच्या आवरणाने त्याला झाकून ठेवा.
  • जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं. दिवा लावताना दीपम घृत दक्षे, तेल युत: च वामत: या मंत्राचा उच्चार करा.
  • अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल, ते ठिकाण स्वच्छ असायला हवे. शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास दिवा ठेऊ नये.