Shravan Pournima 2025 Zodica Sign Horoscope : श्रावण महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन आणि त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा ८ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आहे, ज्याला आपण नारळी पौर्णिमा, असे म्हणतो आणि दुसर्‍या दिवशी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवार ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल आणि ती शनिवारी ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत समाप्त होईल. या दिवशी चंद्र ग्रह शनीच्या राशीत असेल. शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे; तर चंद्र आणि शनि एकमेकांचे शत्रू आहेत. अशा प्रकारे जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शनीच्या राशीत असतो, तेव्हा तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे ते चला बातमीतून जाणून घेऊयात…

मिथुन

श्रावण पौर्णिमेला चंद्र अशा राशीत असेल जी त्याची शत्रू रास मानली जाते. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांवर याचा वाईट परिणाम किंवा अचानक नकारात्मक बदल होऊ शकतात. त्यामुळे मोठे निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद टाळा. त्यामुळे प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पैशाशी संबंधित निर्णय काही काळानंतर घ्या. श्रावण पौर्णिमेला शिव चालिसा पठण करा.

कर्क

चंद्र मकर राशीत असल्याने कर्क राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. बोलताना योग्य शब्दांचा वापर करा, आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य अचानक बिघडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात अंतर वाढू शकते. जर या राशीच्या लोकांनी श्रावण पौर्णिमेला दुधासह शिवलिंगावर अभिषेक केला, तर ते त्यांना फायदेशीर ठरू शकते.

मीन

या काळात मीन राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. कारण- त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो किंवा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. चुकीच्या लोकांशी संबंध आल्याने त्यांचा आदर कमी होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात वाद वाढू शकतात. त्यामुळे या लोकांनी वाद घालणे टाळावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)