सूर्यदेव येत्या १७ ऑगस्टला आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण काही राशींसाठी मोठे शुभ संकेत घेऊन येत आहे तर काही राशींना थोडं सांभाळून राहावे लागेल. १७ ऑगस्टला सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य सध्या कर्क राशीत असून बुधवारी आपल्या स्वराशीत प्रवेश घेणार आहे. सूर्य हा राशीचक्रातील सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो त्यामुळे सूर्याचे भ्रमण होताना सर्वच राशींवर प्रभाव होतो हा प्रभाव नेमका कसा असणार हे जाणून घेऊयात..
मेष: सूर्याच्या भ्रमणाने मेष रास प्रभाव कक्षेत पाचव्या स्थानावर असेल. सूर्याची कृपादृष्टी असल्याने या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. विशेषतः जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर अधिक नफा होऊ शकतो. यामुळे रखडून ठेवलेली कामे मार्गी लावण्यास घ्यावी.
वृषभ: सूर्याच्या भ्रमणाने वृषभ रास प्रभाव कक्षेत चौथ्या स्थानावर असेल. या राशीच्या व्यक्तींच्या नशिबात वाहन खरेदीची चिन्हे आहेत. जर का आपण घराची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ती प्रक्रिया सुद्धा पुढे जाण्यात सूर्यदेव मदत करतील. कौटुंबिक सुखाने समृद्ध असा तुमचा पुढचा काही काळ असणार आहे.
मिथुन: सूर्याच्या भ्रमणाने मिथुन रास प्रभाव कक्षेत तिसऱ्या स्थानावर असेल. तुमची बिघडलेली नाती याकाळात नक्कीच सुधारतील. करिअर मध्ये काही कारणास्तव आलेला आळस दूर होण्यात मदत होईल.
कर्क: सूर्याच्या भ्रमणाने कर्क रास प्रभाव कक्षेत दुसऱ्या स्थानावर असेल. या राशींच्या व्यक्तींसाठी सूर्याचे संक्रमण अत्यंत लाभदायक दिसत आहे. अचानक धनलाभ होण्याचे दाट संकेत आहेत. तुमच्या कामात तुम्हाला कुटुंबीयांचा मोठा आधार लाभेल.
सिंह: सिंह ही सूर्याची स्वराशी आहे, ज्यात १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेव आगमन करणार आहेत. मात्र सूर्याचा सर्वाधिक प्रभाव असल्याने या राशीला काहीसा संकटांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात तसेच लग्न जुळण्यात सुद्धा थोडी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कन्या: सूर्य ज्या वेळी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा आपोआप कन्या रास प्रभाव कक्षात १२व्या स्थानी जाणार आहे त्यामुळे सूर्याची कृपादृष्टी काही अंशी कमी असेल. याकाळात आपले फिरायला जाण्याचे योग आहेत मात्र एकूणच पुढील काही दिवस खर्चिक ठरू शकतात.
तुळ: सूर्याच्या भ्रमणाने तुळ रास प्रभाव कक्षेत अकराव्या स्थानावर असेल. पुढील काही काळात आपल्याला कुटुंबियांकडून किंवा नातेवाईकांकडून मोठा मान- सन्मान मिळण्याची चिन्हे आहेत. करिअर मध्ये सुद्धा सकारत्मक बदल होऊ शकतील. तसेच संतती सुखही आपल्या नशिबात दिसत आहे. तुळ राशीसाठी सूर्याचे संक्रमण अत्यंत फायदेशीर आहे.
वृश्चिक: सूर्याच्या भ्रमणाने वृश्चिक रास प्रभाव कक्षेत दहाव्या स्थानावर असेल. यादरम्यान तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ उतार येऊ शकतात. तुमचा रागच तुम्हाला भारी पडू शकतो त्यामुळे शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा.
धनु: सूर्याच्या भ्रमणाने धनु रास प्रभाव कक्षेत नऊ या स्थानावर असेल. तुम्हाला नोकरी मध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, हे सूर्याचे भ्रमण आपल्यासाठी भाग्योदय घेऊन येऊ शकते.
मकर: सूर्याच्या भ्रमणाने मकर रास प्रभाव कक्षेत आठव्या स्थानावर असेल. सूर्याच्या प्रभावाने या राशीसाठी पुढील काही दिवस अशुभ असणार आहेत. विशेषतः तुम्ही प्रवासाच्या दरम्यान काळजी घ्यावी. वाहन चालवणे टाळावे किंवा अत्यंत सावधगिरी बाळगावी. नोकरी व व्यवसायात मोठे निर्णय घेताना खबरदारी घ्या.
कुंभ: कुंभ रास सूर्याच्या भ्रमण कक्षेत सातव्या स्थानावर असून, तुमच्यासाठी ही परिस्थिती ५०-५० असणार आहे. तुमच्या निर्णयानुसार प्रसंगी लाभ व नुकसान दोन्ही तुमच्या नशिबात दिसत आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. याकाळात जोडीदारासोबत भांडणे होऊ शकतात.
मीन: मीन राशीच्या व्यक्तींसाठी पुढील काही काळ विजय पर्व असणार आहे. तुम्हाला सतत रोखून धरणाऱ्यांवर तुम्ही मात करू शकाल. नोकरी व व्यवसायात विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)