Vastu Tips for Kitchen: घरात स्वयंपाक करणं म्हणजे केवळ पोट भरणं नाही, तर तो एक आध्यात्मिक आणि ऊर्जेचा प्रवाह असतो, असं वास्तुशास्त्र मानतं. पण तुम्हाला माहीत आहे का, पोळ्या मोजणे ही अगदी साधी वाटणारी सवयसुद्धा तुमच्या घरातील सकारात्मकतेवर परिणाम करू शकते?

तुमच्या स्वयंपाकघरातील एक साधी सवय पोळ्या मोजणे कदाचित तुमच्या घरातल्या सकारात्मक ऊर्जेला हानी पोहोचवत आहे, असं वास्तुशास्त्र सांगतं. पोळ्या किती बनवल्या हे मोजून पाहण्याची कृती तुमच्या संपन्नतेच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करू शकते. पोळ्या मोजण्याची सवय तुमच्या घरातील समृद्धी, आनंद आणि कुटुंबाच्या आरोग्यावर थेट परिणाम करू शकते, असे वास्तुतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वास्तुतज्ज्ञ डॉ. वीरेंद्र साहनी यांनी सांगितलंय, “आपल्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्या घरातील ऊर्जा प्रवाह बदलू शकतात. त्यात अन्न तयार करणे हा एक पवित्र विधी आहे. पोळी ही फक्त चपाती वा भाकर नाही, तर ते समृद्धीचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण पोळ्या मोजतो, तेव्हा नकळत आपण ‘अभाव’ व्यक्त करतो.”

खरं तर, पोळी मोजणं म्हणजेच संसाधनं मर्यादित आहेत, असा संदेश विश्वाला देणं. परिणामी, घरातील संपन्नतेच्या ऊर्जेत अडथळा येतो. म्हणूनच वास्तुशास्त्र सांगतं की, पोळ्या मनमोकळेपणाने करा, आकड्यांत अडकू नका.

स्वयंपाकघर हेच घराचं हृदय

वास्तुशास्त्रात किचनला घराचं हृदय आणि ऊर्जेचं केंद्रस्थान मानलं जातं. अन्न तयार करताना मन शांत आणि उदार असलं पाहिजे. पण, पोळ्या मोजताना नकळत ताण, हिशेब व मर्यादेची भावना मनात येते. हे नकारात्मक स्पंदन स्वयंपाकघरातून अन्नात शिरते आणि त्याचा परिणाम थेट कुटुंबाच्या आरोग्य, नातेसंबंध आणि समृद्धीवर होतो.

‘अन्नदान’ आणि भारतीय परंपरा

आपल्या संस्कृतीत अन्न नेहमी शेअर करण्यासाठी बनवलं जातं; मग ते पाहुणे असोत, प्राणी असोत किंवा गरजवंत लोक. पण जेव्हा आपण पोळ्या मोजतो, तेव्हा नकळत ती दानशीलतेची भावना कमी होते. ‘अन्नदान’ हा सर्वोत्तम दान प्रकार मानला जातो आणि म्हणून वास्तू सांगते की, पोळ्या मोजू नका, फक्त त्या पुरेशा आणि भरभरून करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)