Vastu Tips for Stairs: हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. घराची वास्तू बरोबर असेल, तर घरात सुख-समृद्धी व आनंद टिकून राहतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूचा कुटुंबातील सदस्यांवर खोलवर प्रभाव पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी आणि घरातील वाईट व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचं पालन करणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे. घराचा जिना किंवा पायऱ्यांबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या गोष्टी जिन्याखाली ठेवू नयेत, अनेकांना घरातील जिन्याखाली काही वस्तू ठेवण्याची सवय असते; मात्र अशाने तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.
तेव्हा वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊ कोणत्या आहेत या गोष्टी?

अनेकांच्या घरामध्ये कमी जागा असल्यामुळे, त्या जागेचा पुरेपूर वापर करता यावा म्हणून बऱ्याचदा जिन्याखाली सामान ठेवण्यासाठी जागा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी जिन्याखाली ठेवणे चुकीचे मानले जाते. कारण- त्याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या प्रगती आणि खिशावर होतो. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहू.

घरातील जिन्याखाली असू नयेत ‘या’ गोष्टी…

१. कचराकुंडी तेथे ठेवू नका

​वास्तुशास्त्रानुसार, जिन्याखाली कचराकुंडी ठेवणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. असे मानले जाते की, जिन्याखाली कचराकुंडी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो.

२. अशा जागी शौचालय बांधू नका

वास्तुशास्त्रानुसार, जिन्याखाली शौचालय अजिबात बांधू नये. असे करणे शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, शौचालय सर्वांत जास्त नकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि मग त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. तसेच, राहू ग्रहाचा अशुभ प्रभाव पडतो. तसे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते. त्याचबरोबर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

३. घरातील देव्हारा ‘अशा’ ठिकाणी उभारू नका

वास्तुशास्त्रानुसार, जिन्याखाली मंदिर ठेवणे किंवा बांधणे शुभ मानले जात नाही. मंदिर कधीही कोणत्याही पायऱ्यांखाली बांधू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. कारण- आपण पायऱ्यांवर पाय ठेवून वर चढतो आणि खाली उतरतो. अशा परिस्थितीत त्याच्या अगदी खाली पूजा कक्ष असणेदेखील देवाचा अपमान मानले जाऊ शकते. तसेच, असे केल्याने घरात अशांतता निर्माण होते आणि सुख-समृद्धी नष्ट होते, असे मानले जाते.

४. नळ लावू नये

वास्तुशास्त्रानुसार, पायऱ्यांखाली नळ बसविणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. कारण- जर पायऱ्यांखाली बसविलेल्या नळातून पाणी वाहत असेल, तर त्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, असे मानले जाते.

५. पायऱ्यांखाली शूज रॅक ठेवू नका

पायऱ्यांखाली शूज आणि चपला ठेवू नका. तुमचा शूज रॅक घराबाहेर ठेवावा. पायऱ्यांखाली शूज ठेवणे टाळा. कारण- त्यामुळे घराभोवती नकारात्मकता पसरू शकते, ज्यामुळे घरगुती तणाव निर्माण होतो, असे मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)