अश्विनी धोंगडे

ब्रिटिश कादंबरीकार डोरिस लेसिंग यांना त्यांच्या ‘द गोल्डन नोटबुक’ला स्त्रीवादी म्हणणे अमान्य होते, मात्र त्यांनी स्त्रीवादास नाकारले नव्हते..

२००७ सालातील साहित्याचे नोबेल इंग्रजी कादंबरीकार डोरिस लेसिंग (१९१९-२०१३) यांना मिळाले. त्यांची ग्रंथसंपदा भरपूर आहे; पण डोरिस लेसिंग म्हटले की ‘द गोल्डन नोटबुक’ हेच नाव डोळ्यांपुढे येते. १९६२ साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली; मात्र आजवर सातत्याने या कादंबरीच्या नव्या आवृत्त्या निघत आहेत, जगातील अनेक भाषांत ती अनुवादित झाली आहे.

साठचे दशक हा युरोप-अमेरिकेतील स्त्री चळवळीच्या दुसऱ्या लाटेचा काळ. याच काळात प्रभावी स्त्रीवादी कादंबरी म्हणून वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘द गोल्डन नोटबुक’मध्ये एकटय़ा राहणाऱ्या स्त्रीचे अनुभव खुलेपणाने मांडले आहेत. त्यात स्त्रीच्या जगण्याचा अनेक स्तरांवर विचार होतो. डोरिसच्या आयुष्यातील घटनांचा समांतर पदर या कादंबरीला आहे, हादेखील आकर्षणाचा भाग होता. या मध्यवर्ती तरुण स्त्रीच्या आयुष्यातील वंशभेदाच्या जाणिवा, साम्यवादाचे आकर्षण आणि विरक्ती, लैंगिक आणि भावनिक जीवनातले चढ-उतार, सर्जनशील लेखक म्हणून होणारी मानसिक घुसमट यांची एकत्रित बांधणी करण्यासाठी लेखिकेने कादंबरीची रचना वेगळ्या प्रकारे- एकात एक  गुंफलेली अशी केली आहे. स्त्रीवादाने ठरावीक नियमबद्ध आकृतिबंधांना पितृप्रधान समाजाचे आणि पुरुष वर्चस्वाच्या उतरंडीचे प्रतिनिधी मानले आहे. त्यामुळे या कादंबरीतील अपारंपरिक रचना त्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

स्त्रीवादी साहित्यकृतीला अपेक्षित असलेला जाणीव-जागृती हा आयाम ‘द गोल्डन नोटबुक’मध्ये स्पष्टपणे दिसतो. कादंबरीची नायिका अ‍ॅना वुल्फचे अनुभव संपूर्ण समाजाच्या त्रुटीबद्दल भाष्य करतात. स्त्रियांचे वैयक्तिक अनुभव हे एक प्रकारे समाजातील राजकारणाचे चित्रण असते. या दृष्टीने स्त्रीचे कोणतेही अनुभव हे केवळ तिचे ‘वैयक्तिक’ नसतात. तद्वत अ‍ॅनाचे अनुभवही केवळ तिच्या एकटीचे उरत नाहीत. ‘जे जे वैयक्तिक ते ते राजकीय’ असे स्त्रीवादाचे घोषवाक्यच आहे. ‘द गोल्डन नोटबुक’ स्त्रीच्या लैंगिकतेचा आणि पुरुषांशी तिच्या असलेल्या संबंधांचा तपशिलाने विचार करते. साठच्या दशकात वाचकांना हे धक्कादायक होते. त्यासंबंधी डोरिसने म्हटले आहे : ‘‘या कादंबरीत व्यक्त झालेल्या या विचारांबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. स्त्रिया या गोष्टी कित्येक वर्षे सांगत आल्या आहेत, पण आतापर्यंत कोणी त्यांच्याकडे लक्ष दिले?’’

मात्र, या कादंबरीला स्त्रीवादी म्हणणे डोरिसला मान्य नव्हते. ‘स्त्रीवादी’ या शिक्क्याने कुलूपबंद होऊन बसण्यास तिचा नकार होता. असे असले तरी, या कादंबरीतील चित्रण स्त्रीवादी संकल्पनांशी पूर्णपणे सुसंगत आहे. स्त्रीवादी नाही म्हणणे म्हणजे स्त्रीवाद नाकारणे नव्हे. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर पुढे अनेक वर्षांनी डोरिसने असे उद्गार काढले होते की, ‘‘मी स्त्रीवादी आहे, कारण स्त्रिया दुय्यम नागरिक समजल्या जातात.’’ डोरिसने त्या वेळी स्त्रीवादाचा शिक्का नाकारला असला, तरी बहुसंख्य वाचकांनी आणि समीक्षकांनी ही कादंबरी स्त्रीवादी म्हणूनच वाचली. लैंगिक स्वातंत्र्याच्या कल्पनांविषयी गोंधळलेल्या त्या काळात तिने तरुण स्त्रियांना आवाज दिला.

कादंबरीची नायिका अ‍ॅनाचा मॅक्सशी घटस्फोट झाला आहे. आपली शाळकरी मुलगी जॅनेटला घेऊन ती एकटी राहते. तिची ‘फ्रण्टियर्स ऑफ वॉर’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली असून त्यातून मिळणाऱ्या मानधनातून तिचा चरितार्थ चालू असतो. तिचे घर मोठे आहे आणि ती त्यात पुरुष सहचर ठेवून घेते. तिच्या आयुष्याला समांतर अशी एक कादंबरी ती ‘यलो नोटबुक’मध्ये लिहिते आहे. त्या कादंबरीची नायिका एला ही घटस्फोटित आहे. तिला एक मुलगा आहे. तीदेखील लेखिका आहे. एका फॅशन मासिकात ती काम करते. अ‍ॅनाप्रमाणे तीदेखील लैंगिक स्वातंत्र्य उपभोगणारी मुक्त स्त्री आहे. एक मनोविकारतज्ज्ञ डॉ. पॉल तिच्या आयुष्यात काही वर्षे येतो, पण अखेरीस न सांगता तो तिला सोडून जातो. ती त्याच्यात भावनिकदृष्टय़ा गुंतली होती, त्यामुळे तिला नैराश्य व एकटेपणा येतो. त्यानंतरही अनेक पुरुष थोडय़ा काळापुरते तिच्या आयुष्यात येतात. आपले वैवाहिक जीवन दु:खी आहे, बायकोशी पटत नाही, ती दुसऱ्या गावी गेली आहे आदी बहाणा करून बायकोबरोबर सतत राहून कंटाळलेले पुरुष अशा एकटय़ा राहणाऱ्या स्त्रीकडे बदल म्हणून येतात, हे एलाच्या लक्षात आले आहे. सुरुवातीला हा आपला विजय आहे असे एलाला वाटते; पण नंतर याची तिला लाज वाटते. अ‍ॅनाचाही अनुभव असाच आहे. ती स्पष्टपणे म्हणते की, ‘बरेचसे इंग्रज पुरुष हे खरे पुरुष नाहीत. जे काही थोडे खरे आहेत ते अप्रामाणिक आणि अनेकींशी संबंध ठेवणारे आहेत. बरेच पुरुष हे बायकोशी अरेरावीने वागणारे, त्यांना आनंद न देऊ शकणारे, त्यांच्यावर मालकी गाजवणारे, स्वार्थी, मुलांची पर्वा न करणारे, तरुण स्त्रियांच्या मागे लागणारे असतात.’

कादंबरीतल्या अ‍ॅनाने लिहिलेली कथा वाचताना खरे तर ती कथा आपण तीन पातळ्यांवर वाचतो आहोत असा अनुभव येतो. कादंबरीतल्या अ‍ॅना, एला यांच्यासारखेच बरेचसे खुद्द लेखिका डोरिसचेही जीवन आहे. आपल्या दुसऱ्या नवऱ्याला सोडून पीटर नावाच्या मुलाला घेऊन डोरिस तरुणपणीच आफ्रिकेतून लंडनला स्थायिक झाली. आफ्रिकेतील अनुभवांवर ‘द ग्रास इज सिंगिंग’ (१९५०) ही तिची कादंबरी प्रसिद्ध झाली होती. तिनेही मुक्त जीवनाचा आनंद आयुष्यभर घेतला.

‘द गोल्डन नोटबुक’मधील अ‍ॅना स्त्री म्हणून नेहमीच आपले हक्क शाबूत ठेवताना दिसते. ‘जर आपण प्रेम केलेला पुरुष आपल्याला समाधान देऊ शकला नाही, तर त्या स्त्रीला दुसऱ्या पुरुषाकडे जाण्याचा हक्क आहे,’ हे तिचे उद्गार अनेकांना धक्कादायक वाटण्याचा तो काळ होता. अ‍ॅना आपल्या मासिक स्रावाबद्दल, त्या वेळी अंगाला येणाऱ्या विशिष्ट वासाबद्दल खुलेपणाने बोलते. स्त्री-पुरुष संबंधांतील अत्युच्च आनंदाबद्दलच्या शक्याशक्यतेची चर्चा करते. पुरुषांइतकेच मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य स्त्रीलादेखील आहे याबद्दल तिच्या मनात कोणताही किंतु नाही आणि पुरुषांबद्दल मनात रागही नाही. परस्परसंबंधांमधील आनंद उपभोगण्याची गरज दोघांनाही आहे ही तिची भावना आहे. पारंपरिक स्त्रीप्रमाणे ती आपल्या आवडत्या पुरुषासाठी स्वयंपाक व कॉफी करताना दिसते. ती एक बुद्धिमान स्त्री आहे. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून, हावभावांतून त्या व्यक्तीच्या अंत:प्रेरणा समजू शकण्याची सर्जनशील लेखकाकडे असलेली अफाट शक्ती अ‍ॅनाकडे आहे, म्हणून ती प्रत्येकाला अंतर्बाह्य़ समजून घेऊ शकते. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व दृष्टी गमावलेल्या टॉमीला आणि नवरा व मुले सोडून आलेल्या मरियनला ती समजून घेऊ शकते.

सोल ग्रीन या साम्यवादी पक्ष सोडून लंडनला आलेल्या अमेरिकी लेखकाशी अ‍ॅनाच्या संवादातून आणि संबंधांतून त्याच्या दुभंग, त्रिभंग व्यक्तित्वाला तिने बरोब्बर जोखले आहे. पण याच मानसिक प्रक्रियेतून अ‍ॅनाने स्वत:लाही सोलून काढले आहे. प्रेमात असलेली मालकी हक्काची भावना तिलाही जाणवू लागली आहे. तो दुसऱ्या मैत्रिणीकडे जातो याचा तिला मत्सर वाटू लागला आहे. चोरून ती त्याची दैनंदिनी वाचते आहे. टोकाची भांडणे, टोकाचे तिरस्कार आणि त्यातून शरीराने एकत्र येण्याची नैसर्गिक प्रेरणा यांच्या प्रचंड ताणातून आलेल्या भीतीपोटी तिला मानसिक व शारीरिक विकार जाणवू लागले आहेत. अतिसंवेदनशील असलेल्या अ‍ॅनाची मन:स्थिती क्षणोक्षणी बदलते. रागाकडून प्रेमाकडे, पुन्हा दुसऱ्या क्षणी प्रेमातून रागाकडे, असे रंग ती बदलते.

सत्य आणि स्वातंत्र्याची आत्यंतिक ओढ असलेल्या या युगुलाचे आत्यंतिक नैराश्य हे केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून आलेले नाही. बाह्य़ जगातील ढासळलेल्या राजकीय आणि सामाजिक मूल्यांचाही हा परिणाम आहे. आफ्रिकेतील वंशभेदातून कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार अ‍ॅनाने पाहिले आहेत, त्याविरोधात लेखनातून आवाज उठवला आहे. साम्यवादाने सामाजिक समता येईल या भाबडय़ा आशावादाने तिने काही काळ साम्यवादी पक्षात कृतिशील सहभाग घेतला आहे. स्टॅलिनच्या कारकीर्दीतील क्रौर्य, लाखो लोकांचा मृत्यू, बुद्धिमंतांचे होणारे मानसिक खच्चीकरण हे लक्षात येऊन भ्रमनिरास झाल्यावर तिने पक्ष सोडला आहे. जगातील अनेक देशांत त्या काळी चालू असलेली युद्धे, राज्यक्रांत्या, हिंसक कारवाया, वांशिक लढे, शीतयुद्ध या साऱ्याचा परिणाम तिच्या मनातील भय-भावनेत, मानसिक संतुलन ढळण्यात आणि नैराश्याचे झटके येण्यामध्ये दिसतो.

पण अ‍ॅना हळूहळू त्यातून सावरतेही. कादंबरीच्या शेवटच्या भागात तिच्यात होणारा बदल दिसू लागतो. स्वत:तील विचारी अ‍ॅना तिला सापडते. आपल्यातील दुभंगलेपण संपवणारी, आपण आहोत तसे जगण्यातला आनंद शोधणारी, आपल्या मुलीसंबंधीच्या कर्तव्याची जाणीव झालेली अ‍ॅना तिच्यातच आहे. पूर्वी आईची भूमिका आणि त्याच वेळी स्त्री म्हणून वाटणारी शारीरिक ओढ यांच्यातील संघर्षांशी ती सामना करत होती; पण आता वैफल्यातून येणारा आत्महत्येचा विचार तिच्यातील जबाबदार आई तिला दूर सारायला लावते. या शेवटच्या भागात कादंबरीतील सर्व महत्त्वाच्या घटना, व्यक्ती एखादा चित्रपट पाहावा, त्याप्रमाणे तिच्या डोळ्यांपुढून सरकत राहतात. दुसऱ्या महायुद्धाच्या छायेतील मित्रमैत्रिणींबरोबरचे तरुणपणातले आफ्रिकेतील जीवन आणि त्या वेळी जाणवलेले वंशभेदाचे राजकारण, साम्यवादी पक्षातले तिचे कटू अनुभव, तिच्या कादंबरीचा आत्मा काढून उरलेल्या भागावर चित्रपट बनवू इच्छिणाऱ्या धंदेवाईक निर्मात्याची तिने उडवलेली खिल्ली, एलाची प्रेम प्रकरणे आदी धावते संदर्भ तिच्या मनश्चक्षूंपुढे येतात. अ‍ॅनाची मैत्रीण मॉलीबरोबरच्या संवादातून सुरू झालेली कादंबरी पुन्हा दोघींच्या संवादाने संपते. मात्र, आता मॉलीचे दुसरे लग्न झाले आहे. अ‍ॅनाने लेबर पक्षाचे काम स्वीकारले आहे आणि पूर्वीप्रमाणेच ती सहचराच्या शोधात आहे..

स्त्रीच्या आयुष्याचे भेदक, पण प्रामाणिक चित्रण करणारी ही कादंबरी न उच्चारले जाणारे धीटपणे उच्चारणारी, कोणत्याही भावना न दडपता व्यक्त करणारी आणि बुद्धिवंतांच्या मनातील संभ्रम निर्भयपणे मांडणारी आहे. ही सहाशेहून अधिक पृष्ठांची बृहद्कादंबरी वाचणे हा आनंददायी बौद्धिक अनुभव आहे.

ashwinid2012@gmail.com