डॉ. शमसुद्दिन तांबोळी

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात समाजमनावरील धर्मप्रभाव कमी होईल, असा एक अंदाज वर्तवण्यात येत असे. परंतु आज याच आयुधांचा वापर करून धर्मप्रभाव वाढताना दिसतो. अशा धार्मिक कलुषित वातावरणात सामाजिक सुधारणेचे विषय एक तर प्रलंबित राहतात किंवा अडगळीत तरी पडतात. तसेच अनेक दहशतवादी, जिहादी, अतिरेकी, मूलतत्त्ववादी संघटनांच्या अविवेकी वर्तनातून जगातील मानवी समूहांपुढे काही प्रश्न उभे राहिले आहेत. अशा अवघडलेल्या सामाजिक परिस्थितीत तर्कशुद्ध आणि निर्भीडपणे खुली चर्चा करण्याचे धारिष्टय़ कोणी केले तर तो नक्कीच कुतूहलाचा आणि स्वागताचा मुद्दा ठरतो. ‘इस्लाम अ‍ॅण्ड द फ्युचर ऑफ टॉलरन्स’ या पुस्तकात सॅम हॅरिस आणि माजिद नवाझ असाच समंजस संवाद करतात. त्यात उणीदुणी कटाक्षाने टाळतात, पण राजकीयदृष्टय़ा सोयीच्या नसणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टी मात्र ते टाळत नाहीत.

भारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लीम समाजाचा विचार करताना गेल्या काही दशकांत अनेक बाबी समोर आल्या आहेत. यात दहशतवादी संघटनांच्या काश्मीर आणि अन्यत्र होणाऱ्या कारवाया, तरुण-तरुणींना अशा गटांकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न, शहाबानो प्रकरण, तलाकबंदीला कडाडून केला गेलेला विरोध, वेळोवेळी निघणारे फतवे आणि इतर अनेक अप्रिय विषय सहजीवन आणि सुसंस्कृततेला नख लावणारे आहेत. धर्माच्या नावाखाली केला जाणारा असमंजस आग्रह अधोगती व आत्मविनाशाकडे घेऊन जातो. या पार्श्वभूमीवर हॅरिस व नवाझ यांच्यातील निर्मळ संवाद शब्दबद्ध झालेले हे पुस्तक (‘इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य’ या शीर्षकाने करुणा गोखले यांनी केलेला या पुस्तकाचा अनुवाद साधना प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे) धर्मापल्याड पाहण्याचा संदेश देते.

यातले सॅम हॅरिस हे निरिश्वरवादी अमेरिकी ख्रिश्चन आणि उच्चविद्याविभूषित, व्यासंगी प्राध्यापक आहेत; तर माजिद नवाझ हे पाकिस्तानी कुटुंबात वाढलेले ब्रिटनचा नागरिक आणि धर्माने कट्टर मुस्लीम- जे वयाच्या १६व्या वर्षी शिक्षण सोडून कट्टरतावाद्यांच्या प्रभावाखाली येऊन अतिरेकी संघटनेशी जोडले गेले होते. मात्र नवाझ यांचे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने समुपदेशन केले. त्यांना कट्टरतावाद्यांच्या तावडीतून सोडवले, पुन्हा उच्चशिक्षणास प्रवृत्त केले. यामुळे नवाझ यांच्यात प्रचंड बौद्धिक परिवर्तन झाले. त्यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत नवाझ मुस्लिमांमधील कट्टरता दूर करण्यासाठी कार्यरत आहेत. पुस्तकात हॅरिस यांनी- इस्लाममधील कोणत्या संकल्पना मुस्लिमेतरांना त्रासदायक आणि कडव्या वाटतात, हे इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता अत्यंत मोकळ्या मनाने मांडले आहे. नवाझसुद्धा कोणताही अभिनिवेष न बाळगता हा संवाद सहजपणे पुढे घेऊन जातात. महत्त्वाची बाब म्हणजे, या चर्चेदरम्यान हॅरिस हे ख्रिश्चन धर्मातील विसंगतीसुद्धा सहजपणे दाखवून देतात.

तरुणांना ‘जिहाद’चे आकर्षण का?

भारतात धर्मवर्चस्वातून निर्माण झालेले तेढ आजही आहेत. हिंदू-मुस्लीम समस्या पुन:पुन्हा समाजाला वेठीस धरते. प्रयत्न करूनही परस्परांमध्ये असलेले अपसमज आणि अढी दूर होताना दिसत नाहीत. सध्या तर राजकीय वर्चस्व आणि भूतकालीन तथाकथित शत्रुत्वाचा सूड घेण्यासाठी विविध पद्धतींनी धर्मद्वेष आणि ध्रुवीकरण वाढवण्यात येत आहे. घरवापसी, लव्हजिहाद, लोकसंख्या यांसारखे मुद्दे आणि झुंडशाहीतून होणाऱ्या हत्या वगैरे प्रकार सर्वज्ञात आहेत. या क्रिया-प्रतिक्रियांतून धार्मिक सलोखा, सहिष्णुता आक्रसत आहे. सर्वसामान्यांना तणावपूर्ण वातावरणाची नेहमीच झळ बसते. याला प्रतिबंध करण्यासाठी खुली चर्चा आणि मन निर्मळ करणे हा एक उपाय आहे. अशी संवादी संस्कृती घडवण्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देते.

हॅरिस यांना वाटते की, ‘इस्लामला शांतिप्रिय धर्म म्हणणे म्हणजे अस्तित्वात नसलेली गोष्ट खरी समजण्यासारखे आहे.’ त्यावर माजिद म्हणतात, ‘इस्लाम हा धर्म शांतिप्रियही नाही व युद्धखोरसुद्धा नाही; तो एक ‘धर्म’ आहे. इतर कुठल्याही धर्माच्या पवित्र ग्रंथाप्रमाणे इस्लामच्या पवित्र ग्रंथामध्येसुद्धा काही मजकूर काहींना अत्यंत अडचणीचा आणि आक्षेपार्ह वाटू शकतो. त्याच वेळी हेदेखील खरे की, सर्वच पवित्र ग्रंथांमधील काही भाग अगदी साधेसरळ, निरुपद्रवी असतात. धर्म कधी स्वत:च्या बाजूने बोलत नाहीत, स्वत:ची वकिली करत नाहीत. कुठल्याही पवित्र ग्रंथाला किंवा पुस्तकाला स्वत:चा असा आवाज नसतो. अन्वय लावणारी व्यक्ती तिचा आवाज त्याला बहाल करत असते.’ सध्या इस्लामविषयी जे मांडले जाते, त्यावर अल्पसंख्य असणाऱ्या जिहादींचे वर्चस्व आहे. यासाठीच बहुसंख्य शांतिप्रिय मुस्लिमांनी संघटित होऊन जिहादींच्या विरोधात एकत्र आवाज उठवायला हवा, असा नवाझ यांचा आग्रह आहे.

भारतात मध्यंतरी काही तरुण अशा जिहादी गटात गेल्याची चर्चा झाली. कल्याणमधील चार तरुणांनी असा प्रयत्न केल्याचे समजले. पुण्यातील एका तरुणीला याच आरोपाखाली एटीएसने अटक केली. मुस्लीम तरुणांना अशा जिहादी गटांचे आकर्षण का आहे? याबाबत नवाझ ‘लंडन टाइम्स’च्या सर्वेक्षणाचा संदर्भ देतात. त्यात असा निष्कर्ष आहे की, ब्रिटिश मुस्लिमांतील दर सात तरुणांपैकी एकाला ‘इस्लामिक स्टेट’विषयी आत्मीयता वाटते. हा निष्कर्ष किती अचूक असेल याविषयी शंका असली, तरी इस्लामिक स्टेटला समर्थन मिळत आहे, त्यासाठी विविध गटांत छुपे वैचारिक प्रवाह अस्तित्वात आहेत, असे नवाझ नोंदवतात. ही अस्वस्थता निर्माण करणारी बाब आहे. नवाझ म्हणतात, अतिरेकी हे काही निर्वात पोकळीतून उद्भवलेले नसतात. त्यांच्यामागे काही प्रेरणा असतात. नवाझ यांच्या निरीक्षणानुसार, वंशभेद, धर्मभेदाच्या अनुभवातून काही खऱ्या-खोटय़ा गाऱ्हाण्यांच्या कथा असतात. मग धार्मिक अस्मिता आणि त्यातील संभ्रमाला खतपाणी मिळते. अशा तरुणांवर प्रभाव टाकण्यासाठी ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वे’ तयार असतातच. परिस्थितीचा खुबीने वापर करून तरुणांना इस्लामवादी किंवा जिहादी गटाकडे खेचण्यात त्यांना यश येते. शिवाय दारिद्रय़, बेरोजगारीची पार्श्वभूमी असतेच. इस्लाम जगतातील या घडामोडींचे परिणाम कमी-अधिक प्रमाणात मुस्लीम समाजाला भोगावे लागत आहेत.

एका वर्तुळात अनेक वर्तुळे..

मुस्लीम समाजात कोणते प्रवाह आहेत, याचे हॅरिस यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. त्यांनी एका वर्तुळाची कल्पना मांडली आहे. या एका वर्तुळातच अनेक वर्तुळे दिसतात. सर्वात केंद्रस्थानी असणारे वर्तुळ हे ‘जिहादीं’चे.. अर्थात इस्लामिक स्टेट, अल्-कायदा, अल्-शबाब, बोको हराम यांसारख्या गटांचे! जे इतरांना मारता मारता स्वत:ही शहीद होण्यास उत्सुक असतात. या अंतर्वर्तुळाच्या बाहेर त्याहून मोठे वर्तुळ असते ते इस्लामवाद्यांचे. ते इतरांना मारायला किंवा स्वत: मरायला उतावळे नसतात. या गटाच्या प्रेरणा राजकीय स्वरूपाच्या असतात. या वर्तुळाच्याही बाहेर एक मोठे वर्तुळ असते ते या दोन्ही गटांना नैतिक आणि आर्थिक पाठिंबा देऊन समर्थन करणाऱ्या मुस्लिमांचे. परंतु ते स्वत: सक्रिय नसतात. या वर्तुळाबाहेर त्याहून मोठे वर्तुळ असते ते तथाकथित मध्यममार्गी मुस्लिमांचे. यांना आधुनिक जीवनमूल्यांना धरून आयुष्य जगायचे असते. ते धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी असतात असेही नाही; पण इस्लामिक स्टेटसारखे जिहादी गट आपल्या धर्मश्रद्धांचे प्रतिनिधित्व करत नाहीत असे त्यांना वाटते. या वर्तुळाच्या बाहेर कोटय़वधी प्रामाणिक आणि धर्मनिरपेक्ष मुस्लीम असतात, पण ते व्यक्तच होत नाहीत.

हॅरिस यांची ही मांडणी पुढे नेताना नवाझ सांगतात, अलीकडे इस्लामवाद आणि जिहाद यांचे राजकीयीकरण झालेले अन्वयार्थ पुढे येतात, जे मूळ इस्लाम आणि जिहादमध्ये अभिप्रेत नाही. इस्लाम हासुद्धा इतर धर्माप्रमाणे जुना धर्म आहे. यात अनेक पंथ, उपपंथ (भारतात जातीसुद्धा) आणि विविध मते अस्तित्वात आहेत. इस्लामवाद म्हणजे स्वत:स मान्य असणारा एकच एक इस्लामचा अन्वयार्थ इतरांवर लादण्याची इच्छा बाळगणारा गट आहे. जो कुठल्याही पद्धतीने शरिया कायदा लागू करण्याची इच्छा बाळगतो. हा गट स्वत:च्या विस्तारासाठी योग्य संधीची वाट पाहात असतो. याउलट, क्रांतिकारी इस्लामवाद्यांना एकाच फटक्यात परिवर्तन घडवायचे असते. असा लढाऊ आणि बळाचा वापर करणारा इस्लामवाद म्हणजे जिहादी गट. नवाझ यांनी ‘जिहाद’ची शुद्ध आणि आंतरिक संघर्षांची मूळ कल्पनासुद्धा विशद केली आहे. जगातील सर्व मुस्लिमांच्या तुलनेत जिहादी हे अत्यंत अल्पसंख्य, पण तुलनेने अधिक संघटित आणि प्रबळ असतात. त्यांच्याही विविध गटांत मतभेद आणि सत्तासंघर्ष असतो. इस्लामवादीसुद्धा संख्येने कमी असले, तरी ते जिहादींना सर्वात जवळचे असतात.

मुस्लीम समाजात संख्येने मोठा असणारा पुराणमतवादी गट आहे. तो कर्मठ आणि परंपरानिष्ठ असतो. त्यांना मूलतत्त्ववादी म्हणण्यापेक्षा पुराणमतवादी म्हणणे अधिक योग्य आहे. त्यांना आधुनिक काळातील उदारमतवादी मानवी हक्क मान्य नाहीत. जसे इजिप्तमधील जनतेने उदार-धर्मनिरपेक्ष लोकशाही निवडली नसली, तरी त्यांनी ‘मुस्लीम ब्रदरहूड’ला नाकारले. या पुराणमतवादी गटाची अशी धारणा आहे की, जिहादी, इस्लामवादी हे इस्लामचे अनुचित राजकीयीकरण आहे. शासनाने इतरांवर इस्लाम लादावा असे या गटाला वाटत नाही, मात्र स्वत:च्या पद्धतीने धर्मपरंपरा पाळण्याचा त्यांचा आग्रह असतो. अनेक मुस्लीम पुराणमतवादी असूनही ते जिहाद आणि इस्लामवादाच्या विरोधात असतात. परंतु लिंगभाव समानता, परंपरेतील बदल त्यांना नको असतात. सुधारणावादी मुस्लिमांची खरी अडचण ही असते की, त्यांना या समाजाला इस्लामवाद, जिहादवाद यांच्याविरोधात उभे करतानाच त्यांच्यात मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता किंवा आधुनिक संस्कृती रुजवायची असते. सुधारणावादी गटांना निरुपद्रवी धर्मवाद्यांना जवळ करून कमालीच्या मुस्लीमद्वेष्टय़ा लोकांबरोबरही संवाद करणे अनिवार्य असते. पण अनेकांना ही शत्रुबरोबरची हातमिळवणी वाटते. त्यामुळे संवाद आणि खुली चर्चा करणे हीच किती जटिल समस्या आहे हे अधोरेखित होते.

मुस्लिमांत असाही एक छोटा गट आहे, ज्यांना आपण मुस्लीम आहोत ही आनुषंगिक बाब वाटते. समाजात मिसळताना इस्लाम ही त्यांची मुख्य ओळख ठरत नाही. हा गट आणि पुराणमतवादी धर्मनिरपेक्ष असू शकतात. उदा. भारतीय संदर्भात मुस्लीम ओळख न बाळगणारे बॅरिस्टर एम. सी. छागला, मुस्लीम ओळख बाळगणारे, नमाज अदा करणारे मौलाना आझाद आणि सुधारणावादी हमीद दलवाई हे विविध अर्थानी धर्मनिरपेक्ष असतात. अशाप्रकारे धर्मापलीकडे जाऊन स्वत:ला फक्त ‘नागरिक’ अशी ओळख घेऊन वागणारा समाज निर्माण करणे हे आव्हान असले तरी ते अशक्य कोटीतील नाही, असा नवाझ यांचा विश्वास आहे.

सहानुभूतीदार आणि सुधारणावादी

अधूनमधून ‘इस्लामोफोबिया’, अस्मितेचे राजकारण आणि सांस्कृतिक अस्सलपणाच्या मुद्दय़ांवर चर्चा होत असते. सच्चा धार्मिक कोण यावरही बोलले जाते. मात्र यात खऱ्या उदारमतवादाचा कसा विश्वासघात होतो, याची नवाझ यांनी अत्यंत तर्कशुद्ध आणि विवेकी चर्चा केली आहे.

मुस्लीम समाजाबद्दल सहानुभूती बाळगणारे मुस्लिमेतर अनेक आहेत. पण त्यांनासुद्धा उदारमतवादी किंवा सुधारणावादी मुस्लिमांपेक्षा पुराणमतवादी अधिक जवळचे वाटतात. या सहानुभूतीदारांना वाटते की, हे सुधारणावादी काही सच्चे धर्मपरायण मुस्लीम नाहीत. ते कर्मठ विचार मांडणाऱ्यांनाच खरे मुस्लीम मानतात. त्यांना ‘शुद्ध प्रतिनिधित्व’ आणि ‘सांस्कृतिक अस्मिता’ यांना धक्का लावायचा नसतो. वृत्तवाहिन्यांवरील चर्चामध्ये इस्लाम विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा मुस्लीम प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा परंपरावादी, मूलतत्त्ववादी मुस्लिमासच संधी दिली जाते. सहानुभूतीदार मिळवण्याच्या या स्पर्धेत कट्टर, हट्टाग्रही, मूलतत्त्ववादीच जिंकतात. एका अर्थाने हे सहानुभूतीदारच सुधारणावादी मुस्लिमांना निष्प्रभ करतात. नवाझ अशा सहानुभूतीदारांना ‘प्रतिगामी डावे’ संबोधतात. त्यांच्या मते, कुठल्याही अल्पसंख्य समाजाच्या सक्षमीकरणाची पहिली पायरी ही त्यातील सुधारणावाद्यांचे आवाज खुले करणे ही असते. समाज धर्मसमूहकेंद्री न होता व्यक्तिकेंद्री झाला पाहिजे, हा महत्त्वाचा दृष्टिकोन पुस्तकात मांडला आहे.

इस्लामचे अर्थविवेचन करणाऱ्या विविध पंथ आणि परंपरांचा उल्लेखही पुस्तकात आला आहे. कुराण आणि हादिसमधील काही संदर्भ देत, नवाझ यांनी ते संदर्भ एकमेकांना कसे छेद देतात याचा उलगडा केला आहे. नवाझ स्पष्टपणे मांडतात की, काही वैश्विक मूल्ये धर्मग्रंथाबाहेरची असतात- जी सर्वधर्मीयांनी कर्तव्यभावनेने पाळली पाहिजेत. सद्गुणांविषयी पूज्यभाव राखणे हा माणसाचा सहजभाव असतो, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आज जिहाद, काफीर, परधर्म-तिरस्कार ही आधुनिक घटिते ठरत असल्याने त्यात सुधारणा करण्याची निकड नवाझ निर्भीडपणे व्यक्त करतात. त्यासाठी तळागाळात सच्च्या लोकांच्या चळवळी निर्माण करणे, स्थानिक मातीत मुळे असणारी सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ उभारणे, मुस्लिमांच्या अस्मितेत सुधारणा करणे, धर्मग्रंथांच्या अनिश्चिततेवर भर देणे, इस्लामवादी विचारसरणी नामोहरम करणे, विविधतेस समर्थन देणे, विविध पद्धतींनी उदारमतवाद- धर्मनिरपेक्षता- आधुनिक मूल्ये विकसित करणे.. असे पर्याय मुस्लीम समाजाने अंगीकारले तरच समाजाचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे, असा आशावाद पुस्तकात व्यक्त केला आहे.

tambolimm@rediffmail.com