News Flash

वादावर पडदा!

नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं.

गुजरातमधील हरिपुरा येथे १९३८ च्या फेब्रुवारीत पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींसोबत सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीचे सर्व षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्यायोग्यच कसे आहेत, ते हे पुस्तक साधार
दाखवून देतंच; शिवाय अशा सिद्धांतांना आधार देणारे अपप्रचाराचे खांबही उलथवून टाकणारी मांडणी त्यात करण्यात आली आहे..

सत्याला कधी मरण नसतं म्हणतात. नसेलही. आजच्या बनावट बातम्या आणि अपमाहितीच्या काळात त्याबाबत खात्रीनं काही बोलणं कठीणच. पण एक बाब नक्की सांगता येते, की सत्याला मरण नसलं तरी त्याला काळकोठडी अनेकदा मिळते. काही सत्यं तिथंच कायमची खितपत पडतात. क्वचितच काहींना सूर्यप्रकाश दिसतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीच्या सत्याचं असंच. १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचा मृत्यू झाला की नाही? ते विमान अपघातात गेले की अन्य कुठं त्यांचं देहावसान झालं? आजवर हे सत्य असंच अंधारात पडून होतं. बाहेर जे मिरवले जात होते ते होते षड्यंत्र सिद्धांत.

१९४९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री या नात्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुभाषचंद्र बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट सांगितलं होतं; परंतु लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना त्या कटू सत्यावर विश्वास ठेवू देत नव्हती. या लोकांमध्येही दोन प्रकार होते. काही खरोखरच भाबडे होते आणि काही राजकारणी होते. नेताजींच्या मृत्यूबाबतचं गूढ जागतं ठेवण्यामागील त्यांचे हेतू वेगवेगळे होते. नेताजींचे बंधू सुरेशचंद्र बोस, कट्टर अनुयायी एच. व्ही. कामथ यांच्यासारख्यांचा नेताजी हयात असण्यावरचा विश्वास वेगळा होता. ते आशेवर जगत होते आणि त्या आशेला मिळतील त्या खऱ्या-खोटय़ा माहितीचे टेकू देत होते. बाकीच्या मंडळींचे हेतू तेवढे सरळ नव्हते. त्यांना वैयक्तिक हेव्यादाव्यांची किनार होती. प. बंगालमधील ‘शालमारीबाबा’ म्हणजे नेताजी असं सांगणाऱ्यांचे हेतू तर स्पष्टच फसवणुकीचे होते. अनेकांसाठी नेताजींच्या मृत्यूचं गूढ हे सत्ताकारणातलं शस्त्र बनलं होतं. आजही ते अधूनमधून, सहसा निवडणुकांच्या तोंडावर उपसलं जातं. या पाश्र्वभूमीवर आशीष रे यांचं ‘लेड टू रेस्ट’ हे ताजं पुस्तक महत्त्वाचं ठरतं.

‘काय लिहिलंय?’ यापेक्षा ‘कोणी लिहिलंय?’ यावरून लिखाण जोखण्याची आपल्याकडची रीत आहे. विचारांवर हल्ले करायचे तर त्यासाठी विचार घेऊनच मैदानात उतरावं लागतं. त्यापेक्षा व्यक्तिगत शिवीगाळ केली की काम भागतं. आपल्याकडील वैचारिक वादाची ही पद्धत असल्यानं हे सांगायला हवं, की आशीष रे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ‘बीबीसी’, ‘सीएनएन’पासून ‘आनंद बझार पत्रिका’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ अशा विविध वृत्तपत्रसमूहांसाठी त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ परराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. नेताजी हा त्यांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ३० वर्षांच्या संशोधनाची फलश्रुती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना. जर्मन अर्थशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अनिता पाफ यांनी ती लिहिलीय. नेताजी ऑगस्ट १९४५ नंतरही हयात होते असे मानणाऱ्यांच्या हेतूंबाबत सहानुभूती ठेवून त्या सांगतात, की १८ ऑगस्ट १९४५ रोजी फार्मोसातल्या (आताचं तैवान) तैहोकू विमानतळावर झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला हीच आजवरच्या सर्व पुराव्यांतून समोर आलेली सुसंगत गोष्ट आहे. त्याही पुढे जाऊन त्या सांगतात, की इतिहासकार आणि नेताजींचे चरित्रकार प्रा. लिओनार्ड गॉर्डन यांनी त्या अपघातातून बचावलेल्या एका जपानी सैनिकाची मुलाखत घेतली होती. त्या वेळी त्या स्वत: तिथं होत्या. त्या सांगतात, की त्या मुलाखतीनं नेताजींच्या मृत्यूचं वास्तव लख्खपणे त्यांच्यासमोर उभं केलं. नेताजींवर हक्क सांगणाऱ्या लोकांसाठी हे सांगायलाच हवं, की डॉ. अनिता पाफ या नेताजींच्या एकुलत्या एक कन्या आहेत.

रे यांच्या या संशोधनपर पुस्तकाचे आपातत: काही विभाग पडतात. त्यात नेताजींच्या मृत्यूबाबत उठवलेल्या वावडय़ा, त्यांचे तोतये, तत्कालीन गुप्तचर संस्थांनी घातलेले घोळ यांचा समाचार घेणारा एक छोटा भाग आहे. १८ ऑगस्ट १९४५ रोजी, तसंच त्याच्या आगे आणि मागे नेमकं काय घडलं याची पुराव्यांनिशी तार्किक संगती लावणारा एक भाग आहे. नेताजींचा तेव्हा मृत्यू झालाच नव्हता, असं म्हणणाऱ्यांची भिस्त भारत सरकारकडच्या गोपनीय फायलींवर फार होती. त्या फायली सरकार खुल्या करीत नव्हते, ही त्यांच्या फायद्याचीच बाब ठरली होती. त्यातून पं. नेहरू  विरुद्ध नेताजी असा नसलेला सामना लावणंही सोपं जात होतं; किंबहुना त्या फायलींमध्ये नेहरूंवर टाकण्यासाठी काही चिखल आढळेल याकडे अनेक जण लक्ष लावून बसले होते; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली आणि कोलकात्यातील गोपनीय फायलींचं भांडार खुलं केलं आणि सगळ्याच षड्यंत्र सिद्धांतांच्या तोंडाला काळं फासलं गेलं. त्या फायलींतील पुराव्यांनी रे यांच्या संशोधनाला अधिकच बळकटी दिली. नेताजींच्या तोतयांचं बंड ज्या षड्यंत्र सिद्धांतांवर उभं आहे त्यांची, त्यांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेल्या कथित पुराव्यांची चिरफाड या पुस्तकातून करण्यात आली आहेच. या दृष्टीने अभ्यासकांसाठी हे पुस्तक मोलाचं ठरतं. परंतु हे पुस्तक तेवढय़ापुरतंच मर्यादित नाही. हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, ज्या प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून लोकांच्या मनात संशयाची भुतं जागविण्यात आली आहेत, त्यांचाही लक्ष्यभेद रे यांनी यात केला आहे. पुस्तकातील हा प्रारंभीचा भाग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने त्यातील ‘रिझन डेट्र’ हा लेखकाचा उद्देशलेख आणि त्यापुढची दोन प्रकरणं – ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’ आणि ‘एनिमी ऑफ द राज’ – लक्षणीय ठरतात.

नेताजींच्या प्रतिमेचं पुनर्लेखन सध्या जोरात सुरू आहे. विविध संकेतस्थळांपासून व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठापर्यंतच्या अनेक माध्यमांतून ते सुरू आहे. त्याचा मूळ हेतू नीट समजून घेतला पाहिजे. वरवर पाहता ते सारे नेताजींविषयीच्या पूज्यभावातून केलं जातं असं दिसेल; परंतु ते तसं नाही. त्यांना तिथं समग्र नेताजी नकोच आहेत. त्यांना ते हवे आहेत ते फक्त नेहरू आणि गांधी यांची बदनामी करण्यासाठी. त्यासाठी मग निवडक नेताजी उपयोगी पडतात. नेहरू आणि गांधी हे नेताजींचे कट्टर शत्रू ठरवले जातात. ‘गांधींनी नेताजींना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला, कारण त्यांचं नेहरूंवर प्रेम होतं.. नेताजी अध्यक्षपदी राहिले असते, तर आपोआपच पंतप्रधान बनले असते; ते गांधींना नको होतं,’ असा भलताच इतिहास सांगितला जातो. काही वर्षांपूर्वी तर नेहरूंनी नेताजींना युद्धगुन्हेगार म्हटलं होतं, असं सांगणारं एक पत्रच प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ती अर्थातच फोटोशॉपची कमाल होती. या सगळ्यात नेताजी नेमके कसे होते, त्यांचे राजकीय विचार कोणते होते हे बाजूलाच राहतं. रे यांनी ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’ या प्रकरणातून ते नीटसपणे समोर आणलं आहे.

नेताजींचं चरित्र जाणून घेताना ही बाब नीट लक्षातच घेतली जात नाही, की ते राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव टागोरांच्या बंगालचे सुपुत्र आहेत. तो प्रबोधनाचा वारसा घेऊन ते उभे आहेत. ‘आमचा वैश्विक सहिष्णुतेवरच विश्वास आहे असं नाही तर सर्व धर्म हे सत्यच आहेत असं आम्ही मानतो,’ हे शिकागोतल्या भाषणातलं विवेकानंदांचं वाक्य. त्याचा नेताजींवर प्रभाव आहे. हे सर्व लक्षात घेतलं, की मग कोलकात्याचे ‘महापौर’ असताना पालिकेत सुशिक्षित मुस्लिमांना त्यांच्या संख्येहून अधिक नोकऱ्या राखीव ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.. की सर्व कडवी असलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत मुस्लिमांच्या भावना दुखावणारं असू शकतं, तेव्हा त्यातील केवळ पहिलंच कडवं निवडावं, हा रवींद्रनाथ टागोरांचा सल्ला ते स्वीकारतात तेव्हा त्याचं नवल वाटत नाही.

त्या काळातल्या अनेक तरुणांप्रमाणेच तेही डावे, समाजवादाने भारलेले होते. बंगालमधील अनेक क्रांतिकारकांप्रमाणे त्यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता; परंतु तरीही ते म. गांधींचे अनुयायी होते. ही बाब अनेकांच्या ध्यानातच येत नाही, की गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते असले, अहिंसा ही त्यांची जीवननिष्ठा असली, तरी काँग्रेसमधील नेहरूंसह अनेक नेते अहिंसेकडे एक राजकीय शस्त्र म्हणूनच पाहत होते. वेळ येताच हाती दुसरं शस्त्र घेण्यास त्यांची ना नव्हती आणि गांधींची काँग्रेस ही एक प्रकारची वैचारिक मिसळ होती. डावे, उजवे, मधले, अहिंसावादी, क्रांतिकारी असे सर्वच त्या एका छत्राखाली होते. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, चक्रवर्ती राजगोपालाचारी, जे. कृपलानी, राजेंद्र प्रसाद यांचा उजवीकडं झुकणारा गट जसा होता, तसाच नेहरू, बोस यांचा डावीकडं झुकलेला किंवा मानवेंद्रनाथ रॉय यांचा डावा समाजवादी गटही होता. १९३८ मध्ये नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले हे डाव्यांचं यश होतं. नेताजींची अध्यक्षपदी फेरनिवड होऊ  नये ही उजव्या गटाची इच्छा होती. त्या वेळी गांधी उजव्या गटाच्या बाजूने होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पट्टाभी सीतारामय्या हे त्यांचे उमेदवार होते आणि त्यांना पटेल, राजगोपालाचारी आदींचा पाठिंबा होता; पण तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर पक्षाचं धोरण काय असावं याबाबतचा होता. नेताजींची आर्थिक धोरणं समाजवादी अंगाने जाणारी होती. त्यांना जमीनदारी पद्धती रद्द करावी, एकूणच जमीन मालकीच्या पद्धतीत सुधारणा करावी, सरकारी मालकीचे आणि नियंत्रणाखालील उद्योगधंदे उभारावेत, ही त्यांची मतं होती. युद्धकाळाचा फायदा घेऊन ब्रिटिशांविरोधात उठाव करावा, असं त्यांचं म्हणणं होतं. मतभेद त्यावरून होते. त्या निवडणुकीत ते जिंकले; पण नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला, तो सरदार पटेल, राजगोपालाचारी आदींच्या राजकारणामुळे. त्या वेळी नेहरूंनी आपली बाजू घेतली नाही, हे नेताजींचं दु:ख होतं. त्यावरून त्यांचे संबंध ताणले गेले; पण ते एवढय़ावरून संपतील इतके वरवरचे नव्हते. १९३५ मध्ये नेहरू तुरुंगात असताना परदेशात आजारी कमला नेहरूंच्या देखभालीची जबाबदारी बोस यांनी उचलली होती. कमला नेहरूंच्या निधनसमयी ते त्यांच्यासमवेतच होते. त्यांचं हे मैत्र. १९६०-६१ मध्ये नेताजींची कन्या भारतात आल्यानंतर नेहरूंच्या निवासस्थानातच का उतरते, त्याचं हे कारण आहे. याचा अर्थ नेहरू आणि नेताजी यांच्यात वाद नव्हते असा नाही. नेताजींनी फॅसिस्ट हिटलरचं साह्य़ घेणं हे नेहरूंना पटणं शक्यच नव्हतं. तेव्हा वाद होतेच, परंतु ते वैचारिक होते, धोरणांविषयीचे होते. त्यांना पंतप्रधानपदाच्या सत्तेची किनार होती असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ते दोघांचीही बदनामी करणारंच ठरतं. रे यांचं हे प्रकरण सातत्याने या गोष्टी अधोरेखित करीत जातं.

हे पुस्तक नेताजींच्या मृत्यूविषयीचे सर्व षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे कसे आहेत हे सांगतंच, पण त्या सिद्धांतांना आधार देणारे अपप्रचाराचे खांबही या प्रकरणांतून उलथवून टाकतं. नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं. त्या वादावर अखेरचा पडदा टाकतं. आजच्या ‘सत्योत्तरी सत्या’च्या काळात म्हणूनच ते मोलाचं ठरतं.

‘लेड टू रेस्ट’

लेखक : आशीष रे

प्रकाशक : रोली बुक्स, २०१८

पृष्ठे : ३१६, किंमत : ५९५ रुपये 

रवि आमले  ravi.amale@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 1:58 am

Web Title: ashis ray laid to rest book review based on subhas chandra bose death controversy
Next Stories
1 ऑर्वेलची प्रकाशवाणी : कलावंत की प्रचारक?
2 बुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..
3 सार्वत्रिक हिंसेची चिकित्सा
Just Now!
X