दारू पिऊन मोटार चालवत असताना मनुष्यवधास कारणीभूत झाल्याच्या आरोपातून अलीकडेच आश्चर्यकारकरीत्या ‘निदरेष’ ठरवला गेलेला अभिनेता सलमान खान याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त (२७ डिसेंबर २०१५) प्रकाशित झालेलं ‘बीइंग सलमान’ हे पुस्तक. त्याची प्रकाशनपूर्व प्रसिद्धी बरीच झाली होती. पण गेल्या आठवडय़ाभरात त्यावर कुणीही काही बोलत नाही. असं झालं, कारण हे पुस्तक कुतूहलापोटीसुद्धा विकत घेऊ नये, अशा लायकीचं आहे. असं म्हणण्यामागे जी कारणं आहेत, त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे, सलमानविषयी काय लिहायचं हे या पुस्तकात अस्पष्टच आहे. काही तरी चांगलंचुंगलं लिहायचं आणि जाड पुस्तक तयार करायचं, एवढाच हेतू या पुस्तकामागे दिसतो. ‘व्हॉट मेक्स हिम अ ‘बॅड बॉय’ ऑफ बॉलीवूड’ या पहिल्याच प्रकरणात पुस्तकाचा सूर सलमानवर जराही टीका करण्याचा असणार नाही, हे लक्षात येतं. जणू हे सारं अत्यंत समतोल पद्धतीनं लिहितोय, सलमानवर यापूर्वी झालेल्या टीकेचाही उल्लेख करतोय, पण पाहा ना या टीकेत कसं तथ्यच नाही ते- असा आव लेखक जसीम खान यांनी आणला आहे. त्यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद एकाच वेळी प्रकाशित झाला. त्यातही हा आव कायम आहे.

तरीही कुतूहल, सलमान खानबद्दलचं आकर्षण, कुणाला तरी सलमान खान आवडतो म्हणून तिला/ त्याला हे पुस्तकच भेट देणं अशी कारणं जर तुम्हाला या पुस्तकापर्यंत नेणार असतील, तर पुस्तकात नेमकं काय आहे हे आधी इथं वाचा..

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

पहिल्या प्रकरणाचा उल्लेख वर आलेलाच आहे. त्या प्रकरणात एक पानभर फोटो, सलमान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी हे एकत्र पतंग उडवतानाचा आहे. ‘हे असे आश्चर्याचे धक्के देत राहणं हा सलमानचा स्वभावच’ अशा प्रकारचं कौतुक, त्या प्रसंगाबाबत मजकुरात आहे. याच प्रकरणात ‘सलमानचे पूर्वज, पीर अखुंड साहिब यांचा दर्गा’ असंही एक छायाचित्र आहे. ते का आहे, याचा उलगडा पुढे होतो. दुर्मीळ म्हणावीत अशी छायाचित्रं पुस्तकात भरपूर आहेत. मात्र पिवळट कागदावर त्यांची छपाई योग्यरीत्या झालेली नाही.

पण पुस्तक फसायला सुरुवात होते ती दुसऱ्या प्रकरणापासून. ‘द स्टोरी मार्कड् इन अ डायरी’ हे दुसरं प्रकरण माळवा, इंदूर.. तुकोजीराव पहिले यांच्या कारकीर्दीत आलेले पठाण अशी वळणं घेत सलमान खानचे पूर्वज पीर अखुंड साहिब यांच्यापाशी पोहोचून मग होळकरांचे रिसालदार अब्दुल करीम खान यांच्यापर्यंत येतं आणि त्यांचे जावई अब्दुल लतीफ खान हे सलमानचे खापरपणजोबा, अशी मौलिक माहिती आपल्याला देतं! यानंतरचं ‘ट्रायबल कनेक्शन्स ऑफ सलमान’ हे प्रकरण, सलमानचे पठाण पूर्वज कोण-कुठले असावेत याचा शोध घेतं आणि हे सारे फार खानदानी लोक होते बरं का, असा दबदबा वाचकांमध्ये निर्माण करू पाहतं. ‘फौजी नं. २ : सलमान्स ग्रेट ग्रॅण्डफादर अब्दुल मजीद खान’ हे पाचवं प्रकरण त्या पणजोबांच्या शोधात गुंगतं. सहाव्या प्रकरणांत आजोबा अब्दुल रशीद खान हे कसे पोलिसांत होते, अशी भलावण लेखकानं केली आहे.

अखेर सातव्या प्रकरणात वाचक आणि वर्तमानकाळ यांचा जरा दुरून तरी संबंध येतो. इंदूरला वाढलेल्या सलीम खानांचं देखणेपण, त्यांचं क्रिकेट खेळणं, आईच्या प्रेमापासून ते (सलीम) वंचित असणं वगैरे सांगून मग, १९५८ साली कमल बडजात्यांच्या शादीनिमित्त इंदुरात आलेले निर्माते के. अमरनाथ यांनी रूप पाहून सलीम यांना ‘कल हमारा है ’ चित्रपटात संधी देऊ केली, अशी मुद्दय़ाची गोष्ट येते. ‘दो भाई’ (१९६९) हा सलीम यांनी लेखक म्हणून काम बजावलेला पहिला चित्रपट, असा उल्लेख येतो. ‘द फर्स्ट खान इन बॉलीवूड’ हे सलीम खान यांच्याविषयीच्या प्रकरणाचं नाव युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांच्यावर अन्याय करतं की नाही, हे ज्याचं त्यानं ठरवावं. यानंतरचं एक प्रकरण सलमानच्या जन्म व बालपणाबद्दल लिहून मग, नवव्या प्रकरणात सलमान खान यांची शाळा कुठली, वांद्रय़ात त्यांची कुणाकुणाशी मैत्री होती, हे मित्र आता सलमानबद्दल कसं खूप चांगलं काही तरी बोलताहेत, असं चऱ्हाट आहे.

ऐश्वर्या राय व कतरिना कैफ यांच्याशी सलमान कसा सभ्यपणेच वागला, हेही सांगण्याचा आटापिटा लेखकाने केला आहे. तो करणारं ‘टू गर्लफ्रेंड्स’ या नावाचं दहावं प्रकरण, त्या दोघींसह सलमान खानचे जितके फोटो आधी उपलब्ध होते, त्यांनी भरलेलं आहे.

त्यापुढल्या ‘इज सलमान गिल्टी?’ या प्रकरणात आटापिटय़ाची हद्द गाठून, काळवीट शिकार खटल्यात कसे कच्चे दुवे आहेत, अशी ‘शोधपत्रकारिता’ जसीम खान यांनी केली आहे. पाहा पाहा- गावातला एक जण म्हणतो की त्यानं मेलेलं काळवीट रात्रीच पाहिलं होतं. दुसरा म्हणतो की पाहिलं नव्हतं. बघा तुम्हीच ठरवा.. असा वृत्तवाहिन्यांना शोभणाऱ्या घायकुतीचा हा प्रकार आहे. इथवर ठीक, पण न्यायालयानं दिलेल्या निकालावर शेवटच्या वाक्यात प्रश्नचिन्ह लावण्याची संधी लेखक साधतो, तेव्हा टीव्हीवरल्या काही मिनिटांच्या बातमीपेक्षा पुस्तक गंभीर मानलं जातं हे इथं कुणाला माहीत आहे का, असा प्रश्न सलमान-चाहते नसलेल्यांना पडू शकतो.

‘सुलतान ऑफ बॉलीवूड’ हे प्रकरण मात्र, सलमानच्या चित्रपटांबद्दल आहे. ते प्रकरण सलमानची अख्खी कारकीर्द सचित्र (पोस्टर्ससह ) मांडणारं आहे आणि एकंदर सूर ‘सलमाननं भूमिकेचं सोनं केलं.. चित्रपट सलमानमुळे चालला’ किंवा ‘चित्रपट आपटला, पण त्याला बरीच अन्य कारणं आहेत’ असा आहे.  पुस्तकाच्या ‘माध्यमा’तून जनसंपर्कच करायचा होता याची बालंबाल खात्री पटते, ती इथे. अखेर, ‘आय रिसाइड इन हार्टस्, नॉट थॉट्स’ हे – सलमानच्या तोंडून वेळोवेळी निघालेल्या शब्दमोत्यांची माळ वाचकाच्या गळ्यात मारणारे प्रकरण आहे. तरीही पुस्तक संपत नाहीच. मग लेखक कसा अभ्यासूच होता हे वाचकाला पटवून देणारी लांबलचक संदर्भसाधन-सूची आहे. ही मुख्यत: फिल्मी मासिकं, वर्तमानपत्री बातम्या यांच्या संदर्भावर आधारलेली आहे किंवा मग ‘अमुकची मुलाखत’ वगैरे उल्लेख सूचीत आहेत. त्याहीनंतर, पान २०९ ते २३५ अशी चित्रपटजंत्री ‘बीवी हो तो ऐसी’पासून ‘प्रेम रतन धन पायो’पर्यंत आहे. ही फिल्मोग्राफी आदल्याच एका (चित्रपटांविषयीच्या) प्रकरणात जिरली नसती का, हा प्रश्न विचारू नये. पुस्तक प्रथमदर्शनी तरी कित्ती ‘ऑथेंटिक’ भासतं, हा त्या फिल्मोग्राफीचा उपयोग आहे अशी खूणगाठ मात्र जिज्ञासूंनी बांधण्यास हरकत नाही.

इंग्रजी ‘पुस्तकधंदा’ कुठे चालला आहे, याचा एक नमुना ‘पेंग्विन बुक्स इंडिया’नं प्रकाशित केलेल्या या पुस्तकातून मिळतो. पुस्तकांतून यापूर्वी जनसंपर्क झालेलाच नाही, असं नव्हे. पण इतका धडधडीतपणे – आणि खापरपणजोबांच्याही आधीपासूनच्या खानावळय़ा उगाळत जनसंपर्क अभियान राबवणारं हे बहुधा पहिलंच भारतीय इंग्रजी पुस्तक आहे. इतिहास उगाळण्यामागे कोणता अभ्यासू हेतू आहे, हे अजिबात स्पष्ट होत नसताना, त्या इतिहासाच्या मखरात सलमानला बसवणारं हे पुस्तक आहे.

बीइंग सलमान

  • लेखक – जसीम खान
  • प्रकाशक – पेंग्विन बुक्स इंडिया
  • पृष्ठे – ३०४ ’ किंमत – ५९९ रुपये