काश्मीरमध्ये ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’वर – किंबहुना कोणत्याही सुरक्षादलांवर- एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा आणि निंदनीय हल्ला १४ फेब्रुवारीला झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे, ठिकठिकाणी काश्मीरविषयक चर्चा  सुरू झाल्या. घरादारापर्यंत या चर्चा येऊन ठेपल्या असताना, खरे वाचनप्रेमी काश्मीरबद्दलही ‘वाचलं पाहिजे’ असाच विचार करणार, हे ओळखून काही पुस्तकांची यादी करण्याचा हा एक प्रयत्न. ही यादी शक्यतोवर विविधांगी असावी, अशी काळजी इथं घेण्यात आली असली तरीही हा प्रयत्न अर्थातच अपुरा ठरेल. वाचकांनीही इथल्या या यादीत नसलेल्या, पण काश्मीरविषयी महत्त्वाच्या अशा पुस्तकांची  माहिती त्यांना असल्यास जरूर कळवावी.

सिद्धार्थ गिगू आणि वरद शर्मा यांनी सिद्ध केलेलं  ‘द लाँग ड्रीम ऑफ होम – द पर्सिक्यूशन, एग्झाइल अँड एक्सोडस ऑफ कश्मीरी पंडित्स’ (ब्लूम्सबरी इंडिया, ऑक्टोबर २०१६) हे पुस्तक, १९९० मध्ये राहती घरं सोडून परागंदा व्हावं लागलेल्या काश्मिरी पंडितांना तब्बल २५ वर्षांनी बोलतं करतं.. अनेकांच्या पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या मांडतं. या विलापकथांतून ‘घरा’ची – काश्मीर खोऱ्याची याद ताजी होते. ‘असं नव्हतं माझं काश्मीर’ ही शोकांतिका वाचकांवर ठसते.  काश्मीर असं नव्हतं हे खरं; पण ते तसं का झालं?

यासाठी इतिहासाची साक्ष काढावी लागते. या संदर्भात ए. जी. नूरानी यांच्या ‘द कश्मीर डिस्प्यूट : १९४७-२०१२’ च्या दोन खंडांवरून (तूलिका बुक्स, २०१३) काही वाद झाले, पण तितकं मूलगामी काम अन्य कोणीही केलेलं नाही. नूरानी हे कायद्याच्या जाणकारीनं इतिहास लिहिणारे. त्यांचे हे दोन खंड वाचणं अवघड वाटणार असेल, तर ‘आर्टिकल ३७० : अ कॉन्स्टिटय़ूशनल हिस्टरी ऑफ जम्मू अँड कश्मीर’ हे २०११ सालचं पुस्तक (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) नूरानी यांचंच आहे. एकंदर नूरानी हे बैठक मारून, अभ्यासूपणे वाचण्याचे लेखक. तसं वाचन करायचं नसेल, तर दोन जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या आजही मिळतात..  ही पुस्तकं आता भाजपमध्ये असलेले एम. जे. अकबर यांची आहेत. ते राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. ‘कश्मीर बिहाइंड द व्हेल’  (१९९१) आणि  त्याआधीचं ‘इंडिया : द सीज विदिन’ (१९८५) ही पुस्तकं त्यांनी संतुलितपणेच लिहिली होती.  (दोन्ही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या : रोली बुक्स)  ही पुस्तकं इतिहासाची कल्पना येण्यापुरती ठीक.

काश्मीरविषयीची अनेक वाचनीय पुस्तकं पत्रकारांनीच लिहिलेली असावीत, हा योगायोग नव्हे.  बशारत पीर हे मूळचे काश्मिरी आणि आता अमेरिकेत स्थायिक, ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या ‘ओपीनियन एडिटर’पदी कार्यरत. त्यांचं ‘कर्फ्यूड नाइट’ हे पुस्तक (व्हिंटाज बुक्स, २०११) गेल्या दशकभरात गाजलं. हे पुस्तक आत्मपर असलं तरी ते आत्मचरित्रवजा नाही, ती कादंबरी तर नाहीच पण त्याचा बाज लेखसंग्रह किंवा रिपोर्ताजसारखाही नाही, हे त्याचं वैशिष्टय़. याच पुस्तकातले अनेक तपशील ‘हैदर’ या चित्रपटात – अर्थातच पुस्तकाला श्रेय देऊन- घेतलेले आहेत.

शुजात बुखारी  हे काश्मिरातच काम करणारे आणि ‘रायझिंग कश्मीर’ नावाचं वृत्तपत्र चालवणारे पत्रकार, त्यांना दहशतवादय़ांच्या गोळय़ांना बळी पडावं लागलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवडक लेखांचं संकलन- ‘ द डर्टी वॉर इन कश्मीर – फ्रंटलाइन रिपोर्ट्स’ या नावानं दिल्लीच्या लेफ्टवर्ड बुक्सनं (२०१८ साली) प्रकाशित केलं आहे.

विदेशी पत्रकार-लेखकांनी ‘अनफिनिश्ड वॉर’ वगैरे संबोधून काश्मीरच्या भडक्यात तेलच ओतणारी काही पुस्तकं लिहिली आहेत, ती भारतात सहजी मिळतही नाहीत आणि ती मिळाली नाहीत म्हणून फार काही बिघडतही नाही- कारण हे लोक काश्मीरच काय, काश्मीरसह अख्खा भारतच ‘परक्यां’च्या नजरेनं पाहणारे. ती नजर त्रयस्थ भले असेल, पण ‘पुलाव’ या शब्दाचाही ‘अ राइस प्रिपरेशन विथ मसालाज अँड ऑइल’ वगैरे अर्थ सांगणारा  परका त्रयस्थपणा एरवी (हॉटेलच्या मेनूकार्डावरही) नकोसाच वाटतो.

अर्थात, म्हणून काश्मीरची दुसरी बाजू पाहूच नये, असं नाही. ‘बरीड एव्हिडन्स – अननोन, अनमार्क्ड अँड मास ग्रेव्हज इन इंडियन अ‍ॅडमिनिस्टर्ड कश्मीर’ हे अहवालवजा पुस्तक, ttp://www.kashmirprocess.org/reports/graves/toc.html या संकेतस्थळवर  अख्खं  वाचता येऊ शकतं, तर काश्मीरमधल्या दबल्या आवाजांची पत्रकारांनी आणि ललितलेखकांनी केलेली (काहीशी बिनधास्तच) अभिव्यक्ती http://www.raiot.in/tag/kashmir/ या संकेतस्थळावर वाचता येते. भारतीय इंग्रजी प्रकाशकांकडून या ‘राइओट’ संकेस्थळावरच्या लेखांचं पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. पण, काश्मीरच्या- म्हणजे एका अर्थानं आपल्याही- स्थितीची जाणीव वाढू देण्यासाठी ते वाचलं पाहिजे.