भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानची ‘नियंत्रण रेषा’ हा विषय. लेखक प्रा. डॉ. हॅपिमॉन जेकब. याच लेखकाचं, एक पुस्तक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालं; तर त्याच विषयावरलं दुसरं पुस्तक येत्या वर्षी, २१ जानेवारीला येणार आहे. पण दोन्ही पुस्तकांमध्ये फरक आहे! नोव्हेंबरातल्या ‘द लाइन ऑफ कंट्रोल- ट्रॅव्हलिंग विथ इंडियन अँड पाकिस्तानी आर्मीज’ या पुस्तकात (प्रकाशक: पेंग्विन) भारत-पाक सीमेवरील गोळीबार हे घुसखोरी वा अन्य कारणांखेरीज अनेकदा उभय देशांतील सैनिकांच्या गैरसमजांतून, आगळिकांतून किंवा तत्सम कारणांतूनच कसे होतात, हे साधार दाखवून दिलं आहे. भारतीय आणि पाकिस्तानी अशा दोन्ही सीमा सुरक्षा जवानांसह जेकब यांनी त्या-त्या भागातल्या नियंत्रण रेषेचा प्रवास केला, त्या अनुभवांवर या पुस्तकाचा भर आहे. पण दुसरं पुस्तक (प्रकाशक : ऑक्सफर्ड), या चकमकींच्या परिणामी उभय देशांतील संबंध कसकसे आणि किती ताणले जातात, याचा अभ्यास मांडणारं आहे.

हा, एवढाच फरक. बाकी, या चकमकी थांबतील अशी ठाम आशा जेकब यांनाही नाही. ‘आणि इसवीसन कवायतीचा कदम उचलुनी पुढे सरकला’ याप्रमाणेच सारं सुरू राहील..