News Flash

तीन पिढय़ांचा कथाबंध..

‘बोंकुबाबूंचा मित्र’ ही सत्यजित रे यांची प्रसिद्ध कथा या संग्रहात आहे. ही कथा त्यांनी लिहिली होती १९६२ साली.

श्रीनिवास नार्वेकर shriniwasnarwekar@gmail.com

आजोबा उपेन्द्रकिशोर आणि वडील सुकुमार यांच्या लेखन-कार्याच्या प्रभावातून सत्यजित रे यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी कसं बनलं, हे दाखवून देणाऱ्या पुस्तकाविषयी..

‘तो चित्रपटसृष्टीतला महामानव आहे. त्याचे चित्रपट न बघणं म्हणजे या जगात सूर्य किंवा चंद्र न बघता राहणं!’- हे उद्गार आहेत जगप्रसिद्ध जपानी सिनेदिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे सत्यजित रे यांच्याबद्दल.. कुरोसावा, ल्युकास, किआरोस्तामी, टॅरॅण्टीनो, स्कॉर्सेसी, कपोला यांच्यासारख्या जगभरातल्या श्रेष्ठ चित्रकर्त्यांनाही जे नाव घेताना प्रचंड आदर वाटतो, असे सत्यजित रे!

आजघडीला सत्यजित रे या नावाबद्दल वेगळं काही सांगण्याची फार गरज नाही. चित्रपटलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संकलक, संगीतकार, चित्रकार, कथालेखक, निबंधकार, सुलेखनकार, संपादक.. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाला किती आयाम असावेत! मुलांच्या गोष्टी, किशोर कथा, गुप्तहेर कथा, विज्ञानकथा.. पथेर पांचाली, अपू त्रयी, चारुलता, नायक, देवी, शोनार किला, शतरंज के खिलाडी, अरण्येर दिनरात्री.. कथा असो किंवा चित्रपट, किती वेगवेगळ्या शैलींमध्ये लेखन केलं या माणसानं! प्रचंड काही करून ठेवलेलं आहे सत्यजित रे यांनी. तरी अजूनही जे वाचकांच्या/ रसिकांच्या समोर आलं नाही, ते आता समोर आलंय, ‘पेंग्विन रे लायब्ररी’ उपक्रमांतर्गत पेंग्विन बुक्सने प्रसिद्ध केलेल्या ‘थ्री रेज् : स्टोरीज् फ्रॉम सत्यजित रे’ या पुस्तकाच्या माध्यमातून. निमित्त सत्यजित रे यांचं जन्मशताब्दी वर्ष.

‘पेंग्विन रे लायब्ररी’ ग्रंथमालिकेतलं हे पहिलं पुस्तक. यात आजोबा उपेन्द्रकिशोर, वडील सुकुमार आणि स्वत: सत्यजित या तिन्ही रेंचं प्रकाशित व अप्रकाशित साहित्य आहे. उपेन्द्रकिशोर राय चौधरी यांनी १९१३ साली ‘संदेश’ हे बालमासिक सुरू केले. त्यापूर्वी स्वत:च्याच प्रकाशन संस्थेतर्फे ‘टुनटुनीर बोय’ (शिंपी पक्ष्याची गोष्ट) हा बालकथासंग्रह प्रकाशित केला होता. त्यात मूळ बंगालीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांच्या सत्यजित रे यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरांचा समावेश ‘थ्री रेज्’मध्ये आहे. रे अडीच वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले; तर ते सहा वर्षांचे असताना आजोबांचं निधन झालं

‘लहान असतानाच दोघेही गेल्यामुळे त्यांचा फारसा सहवास मला लाभला नाही, दोघेही मला जे काही कळत गेले, ते त्यांच्या लेखनातून, साहित्यातून आणि चित्रांतून. त्यातून त्यांच्या व्यक्तित्वाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला,’ असं रे म्हणतात. या दोघांवर त्यांनी केलेलं भाषण व लिहिलेला लेख यामध्ये आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं रे यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होण्यावर त्यांच्या आजोबा किंवा वडिलांच्या कार्यकर्तृत्वाचा कसा प्रभाव पडत गेला आणि त्यातून त्यांचा प्रवासही कसा घडत गेला, हे अगदी ठळकपणे कळत जातं.

या पुस्तकात एकूण तीन टप्पे आहेत. उपेन्द्रकिशोर, सुकुमार आणि सत्यजित.. उपेन्द्रकिशोर यांनी ‘संदेश’, ‘मुकुल’, ‘सखा’ या मासिकांमध्ये लिहिलेल्या लहानग्यांच्या गोष्टी, ज्यांचा नंतर ‘टारगेट’ मासिकासाठी रे यांनी इंग्रजी अनुवाद केला. ‘मुंगी, हत्ती आणि ब्राह्मणाचा सेवक’, ‘पिंजऱ्यातला वाघ’ या दोन कथांचं भाषांतर अप्रकाशित होतं, ते रे यांच्या टिपणवहीतून थेट यामध्ये घेतलेलं आहे. पैकी ‘मुंगी, हत्ती..’चं भाषांतर अपूर्ण आहे. पण ते अशा टप्प्यावर येऊन अपूर्ण राहिलेलं आहे की, पुढे नक्की काय नि कसं घडलं असावं, याबद्दल आपली उत्सुकता ताणून राहते. शंभर वर्षांपूर्वीच्या या कथा आजही अशी उत्सुकता ताणून धरणाऱ्या आणि आपल्या डोळ्यांत अंजन घालून जाणाऱ्या आहेत, हे या कथांचं यश. किशोर-कथालेखनामध्येही उपेन्द्रकिशोर यांनी राखलेलं वैविध्य आपल्याला खरोखरच थक्क करून जातं.

उपेन्द्रकिशोर, सुकुमार आणि स्वत: सत्यजित रे यांनी काढलेली रेखाचित्रं किंवा उपेन्द्रकिशोर यांची कथांबरोबरची चित्रं त्याच कथांच्या पुनर्मुद्रणावेळी रे यांनी स्वत:च्या शैलीत रेखाटणं (दोघांचीही चित्रं समांतरपणे आपल्या नजरेसमोर असल्यामुळे दोघांच्याही चित्रांमागचा विचार आणि त्यांची शैलीदेखील लक्षात येते), कथांच्या बंगाली शीर्षकांचे मूळ सुलेखन, प्रत्येक कथा संपताना रे यांनी वेळोवेळी विकत घेतलेल्या लाकडी नक्षीचित्रांची उमटवलेली मुद्रा, संदेश-मुकुल-सखा-साथी या मासिकांची (आर्टपेपरवरली) रंगीत मुखपृष्ठं, ‘खगम्’, ‘कॉव्‍‌र्हस (काकवंशीय)’ या कथांसाठी काढलेली सुरेख चित्रं, तिघांच्याही हस्ताक्षरांतली टिपणं या प्रत्येक बाबीतून टप्प्याटप्प्याने तिन्ही रे आपल्यासमोर उभे राहात जातात आणि त्याबरोबरच सत्यजित रे ‘घडण्या’चा प्रवासही आपल्यासमोर स्पष्ट होऊ लागतो.

‘संदेश’ मासिकात उपेन्द्रकिशोर यांची एक कथा १९१५ साली सहा भागांत प्रसिद्ध झाली होती. त्या कथेचं नाव ‘गुपी गाइन बाघा बाईन’! ही कथा या पुस्तकात दोन दुर्मीळ बाबी घेऊन येते. एक : या कथेसाठी उपेन्द्रकिशोर यांनी काढलेली चित्रं आधी म्हटल्याप्रमाणे १९६१ साली केलेल्या पुनर्मुद्रणामध्ये सत्यजित रे यांनी आपल्या शैलीत काढणं; आणि दोन : या कथेची चित्रपटसंहिता, जी आजवर अप्रकाशित होती. या प्रकाशित पटकथेमुळे पटकथेच्या अभ्यासासाठी आणखी एक ऐवज लेखक व अभ्यासकांसाठी छापील स्वरूपात खुला झाला आहे.

पुस्तकातला दुसरा टप्पा सुरू होतो, वडील सुकुमार रे यांच्यावर सत्यजित रे यांनी आकाशवाणीसाठी मूळ बंगालीमधून केलेल्या भाषणानं. या भाषणाचा अनुवाद इंद्राणी मजुमदार यांनी केला आहे. वडिलांचा चेहरा, त्यांचं प्रेम रे यांच्या मनावर पूर्णपणे ठसण्यापूर्वीच गेल्यामुळे वडिलांच्या साहित्यातून त्यांना समजून घेत जाणं आणि त्यातून स्वत:ही घडत जाणं, या भाषणातून आपल्यासमोर येतं.

आपल्याकडे त्या वेळी फारसा प्रचलित नसलेला प्रकार सुकुमार रे यांनी आपल्या साहित्यातून आणला : ‘नॉनसेन्स ऱ्हाइम्स’! यास मराठीत काहीसा चांगला साज द्यायचा झाला, तर बडबडगीत असंही म्हणू शकू. सुकुमार रे यांना भारतातले आद्य चित्रकथाकार (ग्राफिक नॉव्हेलिस्ट) म्हटलं गेलं आहे. वरवर अगदीच निर्थक वाटणाऱ्या आपल्या कवितांबरोबर ते व्यंगचित्रं काढत असत, जेणेकरून मुलांना त्याबद्दल आणखी आकर्षण वाटेल, त्यांची उत्सुकता वाढेल. प्रसंगी तर्काला सोडचिठ्ठी देऊनही लहान मुलांना तर्काच्याही पलीकडे जाऊन विचार करायला लावणाऱ्या अशा भरपूर कविता सुकुमार रे यांनी केल्या. स्वत: सुकुमार यांनी आपलं असं बरंचसं लेखन फालतू कथा, निरुद्देशी कथा अशा शीर्षकांखाली प्रसिद्ध केलं आहे. या रचनांना दहाव्या रसातल्या रचना म्हणणारा मायकेल हेमन हा लेखक त्यांना लुइस कॅरोल किंवा एडवर्ड लिअरच्या रांगेत नेऊन बसवतो. या धमाल बडबडगीतांचा सत्यजित रे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘थ्री रेज्’मध्ये आहे.

या पुस्तकातला तिसरा टप्पा आहे, सत्यजित रे यांनी स्वत:च्या मूळ बंगाली कथांचा केलेला अनुवाद आणि त्यानंतर मूळ इंग्रजीमध्येच लिहिलेल्या दोन कथा. अलीकडेच ‘नेटफ्लिक्स’वर आलेल्या ‘रे’ या वेबमालिकेमधली एक कथा या संग्रहात आहे.. ‘बिपीन चौधरींचा स्मृतिभ्रम’! ‘सदानंदाचं इवलंसं जग’ ही प्रसिद्ध कथा यामध्ये आहे. ‘पटोलबाबू, फिल्म स्टार’ ही एक परिचित कथा आहे. परिचित अशासाठी की, ही आपण यापूर्वी अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे टॉकिज’मध्ये दिवाकर बॅनर्जीच्या दिग्दर्शनात पाहिलेली आहे. रे यांची प्रसिद्ध काल्पनिक व्यक्तिचित्रे प्राध्यापक शोंकु, अंकल तारीणी खुरो यांची एकेक कथाही संग्रहात आहे. ‘प्राध्यापक शोंकु आणि खोका’ या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेल्या अप्रकाशित संहितेबरोबरच ‘आर्यशेखरचा जन्म नि मृत्यू’ आणि ‘बगदादची जादुई पेटी’ या अप्रकाशित कथा आहेत. सत्यजित रे यांच्या अनेक कथा स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. हा शोध काही वेळा पूर्ण होतो, काही वेळा अपूर्ण राहतो. हा शोध घेताना रे यांची लेखणी वेगवेगळ्या प्रकारची शैली वापरते आणि प्रत्येक शैली वाचकाला तेवढय़ाच रंजकतेने गुंतवून ठेवते.

१९८२ मध्ये आलेल्या स्टीव्हन स्पिलबर्गच्या ‘ई.टी.’शी प्रचंड प्रमाणात साम्य दर्शवणारी ‘बोंकुबाबूंचा मित्र’ ही सत्यजित रे यांची प्रसिद्ध कथा या संग्रहात आहे. ही कथा त्यांनी लिहिली होती १९६२ साली. त्यावर आधारित ‘द एलीअन’ नावाचा चित्रपटही ते करणार होते, हॉलीवूडमध्ये सर्वत्र त्यांनी लिहिलेली ही संहिता फिरली होती. त्यामुळेच ‘ई.टी.’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी रे यांना तक्रार करण्याचा सल्ला दिला, पण रे यांनी तसं काही केलं नाही.

आता अगदी शेवटी याच संग्रहातल्या एका कथेतली गंमत सांगितल्याशिवाय राहावत नाहीये. ‘टिपू, गणित शिक्षक आणि गुलाबी माणूस’ ही रे यांची कथा. आपल्याला शशी थरूर यांचा इंग्रजी शब्दसंग्रह ठाऊक आहेच. त्यांच्या इंग्रजीवरल्या प्रभुत्वाबाबत, त्यांच्या शब्दांच्या वापराबाबत अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं. तर या कथेत टिपूला गुलाबी माणसाचं नाव नीट उच्चारता येत नाही, तेव्हा तो त्याला म्हणतो, ‘मी उगाचच हे शब्द उच्चारण्यासाठी माझी जीभ वाकडीतिकडी का करू?’ रे यांनी स्वत:च इंग्रजीमध्ये भाषांतर केलेल्या या कथेतले हे शब्द आहेत : indefatigability, ambidextrousness आणि floccinaucinihilipication… आहे की नाही गंमत!

‘थ्री रेज्’ हा केवळ संग्रह नाही, तर एकूणच तिन्ही रेंचा सर्वव्यापी समर्थ संचार या पुस्तकातून ठळकपणे लक्षात येतो, हे संदीप रे यांच्या संपादनाचं कौशल्य आहे.

‘थ्री रेज् : स्टोरीज् फ्रॉम सत्यजित रे’

संपादन : संदीप रे

प्रकाशक : पेंग्विन बुक्स

पृष्ठे : ४७४, किंमत : ७९९ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 2:14 am

Web Title: three rays stories from satyajit ray book zws 70
Next Stories
1 बाह्य़ उसनवारीची कूळकथा..
2 झेपावत्या दशकांची गोष्ट..
3 अव-काळाचे आर्त : धडपड आणि निवड
Just Now!
X