जगात ज्या ठिकाणी अध्यात्माच्या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्तीमुळे समाजाचा खरा विकास होईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर तालुक्यातील अध्यात्मिक कार्यक्रमात केले. गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी आयोजित योगीराज गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच कर्जमाफीकडून कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी आणि बळीराजाच्या जीवनात परिवर्तन यावे, या करता खऱ्या आम्हाला शक्ती दे, असा अशिर्वाद देखील त्यांनी परमपूज्य गंगागिरी महाराजांकडे मागितला.

या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, गंगागिरी महाराजांनी शक्ती आणि भक्तीची जोपासना करत आमच्यामध्ये उर्जा प्रज्वलित राहील, अशा प्रकारचा हरिनाम सप्ताह अखंडपणे १७० वर्षांपासून सुरु ठेवला आहे. खरोखरच हे एक जगातलं आश्चर्य आहे. १९ व्या शतकात सप्ताहाची सुरुवात झाली, तो आजच्या घडीला ही सुरु आहे. शतकामागून शतके जातील तरीही हा सप्ताह अशाच प्रकारे सुरु राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस पुढे म्हणाले की, भक्तीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आपली मानवता जिवंत आहे. या भक्तीच्या माध्यमातून अनेक घटक एकत्र येऊन अखंड हरिनामाच्या सप्ताहात रुपांतर झाले. या सप्ताहाचे प्रमुख गंगागिरीजी महाराज तसेच रामगिरीजी महाराज यांच्यामुळे आपल्याला एक नवी उमेद मिळते. गुरुंच्या माध्यमातून मिळणारे अध्यात्मिक ज्ञान हे चिरंतन टिकणारे असते, असेही ते म्हणाले.

मनुष्याला केवळ लौकीक ज्ञान आणि भौतिक संपत्ती प्राप्त होऊन फायदा नाही, कारण ज्यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे त्यांना रात्री झोप येत नाही. मात्र बळीराजा हा आपला शेतीत राबून रक्ताचं पाणी करतो, त्याच्याकडे भौतिक संपत्ती नसली तरी हरिनामाचा जप केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप येते. त्याला बाकीची चिंता करण्याची गरज नाही कारण त्याला माहिती आहे, मी मेहनत करतो तर माझा हरी माझी चिंता करतोय, ही ताकद केवळ अध्यात्मामध्ये आहे.

गुरुंनी आपल्याला जे आशिर्वाद आणि ज्ञान दिले आहे त्या ज्ञानाची ही ताकद आहे. हेच ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्याला आज्ञानापासून ज्ञानाकडे आणि शांतीकडे नेते. ही शांती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्तीला हरीनामाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होईल हे ज्ञान देण्याचे महत्वाचे कार्य गंगागिरी महाराज यांनी केले. गंगागिरी महाराजांच्या ‘ सरला’ या बेटाच्या विकासासाठीच्या प्रस्तावाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन प्रस्तावाच्या मंजूरीसाठी मी स्वत: प्रयत्न करील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरुपात ८ मिनिटांमध्ये १० लाख भक्तांना बुंदीचे लाडू वाटण्याचा आणि एकाचवेळी १० लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा असे दोन जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना यावेळी प्रदान करण्यात आले.