ऊर्जेची बचत करण्यासाठी शहरातील पथदिवे बदलण्याची मोहीम हाती घेतली जाणार असून, या योजनेत जालना नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील १४ हजार पथदिवे एलईडी स्वरूपाचे केले जाणार आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात या योजनेच्या अनुषंगाने नुकतीच चर्चा झाली.
जालना पालिकेतील बल्ब बदलण्याच्या या योजनेसाठी निवडण्यात येणाऱ्या एजन्सीला वेगवेगळय़ा प्रकारच्या अटी टाकण्यात आल्या आहेत. बसविण्यात आलेल्या बल्बची ७ वर्षे देखभाल दुरुस्ती कंपनीने करायची आहे. एकाच वेळी ९५ टक्के बल्ब सुरू न राहिल्यास कंपनीला दंड आकारला जाईल. बल्ब चालू आहेत किंवा नाही, याची माहिती नगरपालिकेला ऑनलाइन पद्धतीने दिली जाणार आहे. दिव्यांचा प्रकाश रस्त्याच्या आकारानुसार असेल. खर्चात होणाऱ्या बचतीतून नगरपालिका कंपनीला परतफेड करणार आहे. विद्युत देयक कमी होईल. पालिकेच्या पथदिव्यांचा खर्च कमी होईल, तसेच देखभाल दुरुस्ती व मनुष्यबळावरील खर्चही कमी होण्यास मदत होणार असल्याने ही योजना हाती घेतली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी रोजी देशभरातील १०० शहरांत एलईडी पथदिवे बसविण्याचा मानस व्यक्त केला होता. या योजनेत जालना पालिकेचा समावेश करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पाणीपुरवठय़ासह जालन्यातील नगरपालिकेच्या विद्युत बिलाची चर्चा करण्यात आली. या शहराला या योजनेचा लाभ द्यावा, अशी विनंती लोणीकर यांनी केली आहे. त्यास ऊर्जामंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्रांनी सांगितले.